दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 30 नोव्हेंबर 2025; वार : रविवार
- भारतीय सौर : 09 अग्रहायण शके 1947; तिथि : दशमी 29:29; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 25:10
- योग : वज्र 07:11, सिद्धी 28:21; करण : तैतिल 10:27
- सूर्य : वृश्चिक; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:53; सूर्यास्त : 17:59
- पक्ष : शुक्ल; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – Homeopathy : बदलती लाइफस्टाईल म्हणजे आजारांना निमंत्रण
दिनविशेष
आनंदयात्री कवी बा. भ. बोरकर
टीम अवांतर
मराठीतील प्रसिद्ध कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा जन्म कुडचडे (गोवा) येथे 30 नोव्हेंबर 1910 रोजी झाला. गोव्यातील खासगी आणि सरकारी हायस्कूलांत ते शिक्षक होते. काही काळ मुंबईच्या विविध वृत्तपत्रात त्यांनी नोकरी केली. 1946मध्ये गोव्याच्या स्वातंत्र्य-आंदोलनात त्यांनी भाग घेतला. ‘आमचा गोमंतक’ आणि कोकणी भाषेतील ‘पोर्जेचो आवाज’ या वृत्तपत्रांचे ते संपादक होते. आकाशवाणीच्या पुणे-पणजी केंद्रांवर, वाङ्मय विभागात, 1955 ते 1970 पर्यंत काम करून ते निवृत्त झाले. प्रतिभा हा बोरकरांचा पहिला काव्यसंग्रह महाराष्ट्र साहित्य संमेलनात प्रसिद्ध झाला. त्यानंतर जीवन संगीत, दूधसागर, आनंद भैरवी, चित्रवीणा, गीतार, चैत्रपुनव आणि कांचनसंध्या हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. सासाय हा त्यांचा कोकणी काव्यसंग्रह 1981 मध्ये प्रसिद्ध झाला. त्याला त्यावर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. त्याच वर्षी कालिदसकृत मेघदूताचा त्यांनी केलेला समवृत्त, समश्लोकी मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला. बालकवी आणि विशेषतः भा. रा. तांबे यांच्या कवितेचा प्रभाव त्यांच्यावर होता. निसर्गसौंदर्य आणि स्त्रीलावण्य यांच्यामधून बोरकरांना जीवनचैतन्याचा साक्षात्कार होतो. मावळता चंद्र, अंधारातील वाट आणि भावीण या त्यांच्या तीन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. यापैकी भावीण विशेष गाजली. तिची पाच भाषांत भाषांतरेही झाली आहेत. कागदी होड्या हा लघुनिबंधसंग्रह, चांदण्यांचे कवडसे हा त्यांचा ललितनिबंधसंग्रही प्रसिद्ध झाला. आनंदयात्री रवींद्रनाथ हे टागोरांचे चरित्रही त्यांनी लिहिले. याखेरीज, जळते रहस्य (स्टेफान त्स्वाइखच्या एका कादंबरीचा अनुवाद), बापूजींची ओझरती दर्शने, आम्ही पाहिलेले गांधीजी, काचेची किमया, माझी जीवनयात्रा, गीता-प्रवचने, ईशावास्योपनिषद ही त्यांची भाषांतरित पुस्तके आहेत. याशिवाय, गीताय, पांयजणां हे कोकणी भाषेतील काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. बोरकरांना कवितेबद्दल महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे सुवर्णपदक, भावीण कादंबरीबद्दल गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे सुवर्णपदक, आनंद भैरवी, चित्रवीणा, गीतार, आनंदयात्री रवींद्रनाथ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके, असे सन्मान लाभले. 1963 मध्ये अलाहाबादच्या साहित्यकार संसदेचे अध्यक्षपद, अखिल भारतीय कोकणी परिषदेचे अध्यक्षपद, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महाबळेश्वर येथील विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविली. 1967 साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला. स्वातंत्र्यसंग्रामात बोरकर यांनी केलेल्या कार्याबद्दल भारत सरकारतर्फे 1974 साली त्यांना ताम्रपट देण्यात आला. 8 जुलै 1984 रोजी त्यांचे निधन झाले.
हेही वाचा – गोष्ट कैकेयी आणि मंथराची… अमोल आणि सुशीलाची सुद्धा!


