दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 30 डिसेंबर 2025; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 09 पौष शके 1947; तिथि : दशमी, एकादशी 07:51, 29:00; नक्षत्र : भरणी 27:58
- योग : सिद्ध 25:01; करण : वणिज 28:29
- सूर्य : धनु; चंद्र : मेष; सूर्योदय : 07:10; सूर्यास्त : 18:09
- पक्ष : शुक्ल; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
पुत्रदा स्मार्त एकादशी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – पर्यटन आणि मनोरंजनाशी संबंधित व्यवसाय असणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत व्यग्रतेत जाईल. त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या स्थिती मजबूत होण्याच्या संधीही उपलब्ध होतील. कौटुंबिक संबंध आणखी घट्ट होतील, ज्यामुळे विशिष्ट विषयांवर निर्णय घेणे सोपे होईल. शुभ कार्यक्रमांचे नियोजन केले जाईल.
वृषभ – उत्तम कामगिरी करत असूनही, कामाच्या ठिकाणी तुम्हाला डावलण्याचे प्रयत्न होऊ शकतात. आर्थिक स्थिती मर्यादित असल्यामुळे नवीन भागीदारीची आवश्यकता असेल आणि त्यासाठी संयम आवश्यक असेल. चांगले यश मिळवणे शक्य आहे. जोडीदाराच्या तुमच्याकडून अवास्तव अपेक्षा असल्याने नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.
मिथुन – स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणारे जातक अपेक्षेपेक्षा जास्त चांगले यश मिळवतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकारी यांच्यातील एक पूल म्हणून काम कराल. कुशल व्यवस्थापनामुळे वरिष्ठांवर तुमची वेगळी छाप पडेल. तब्येतीची काळजी घ्या, पथ्येपाणी सांभाळा. बाहेरचे खाणे शक्यतो टाळा.
कर्क – मित्रांना आर्थिक मदतीची आवश्यकता असू शकते, पूर्ण विचाराअंती निर्णय घ्या. अचानक उद्भवणाऱ्या काही अडचणींमुळे पूर्वनियोजित कार्यक्रम विस्कळीत होण्याची शक्यता आहे. शक्य असेल तर नियोजित लांबचा प्रवास पुढे ढकला. कुटुंबातील सदस्यांना नवीन व्यवस्था मान्य करण्यास पटवणे कठीण होईल.
सिंह – सरकारकडून जाहीर झालेल्या एखाद्या योजनेअंतर्गत व्यवसायासाठी मोठी मदत मिळेल. नवीन करार होण्याची शक्यता आहे. विशिष्ट योजनेवर एकमत व्हावे, यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विरोधकांना मात्र वेळीच आवर घालण्याची गरज भासेल.
कन्या – आज कुटुंबातील नातलगांचा कपटी चेहरा उघड होण्याची शक्यता आहे. आवेशात येऊन कोणतीही कृती करणे टाळा. व्यवहारचातुर्य वापरा. मुलांसोबत वेळ घालवाल, मौजमजेसाठी पैसे खर्च कराल.
तुळ – संतुलित वर्तन आणि उच्च दर्जाचे व्यवस्थापकीय कौशल्य यामुळे कठीण कामे देखील सहजतेने पूर्ण करू शकाल. कौटुंबिक जीवनात जोडीदाराशी संवाद साधणे थोडे अवघड बनू शकते. कला आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनी तुमचा संबंध वाढेल.
हेही वाचा – धुरंधर… माझ्या नजरेतून!
वृश्चिक – वेळ तुमच्या बाजूने वळत आहे, त्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते. नकारात्मक विचारांपासून आणि लोकांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करा.
धनु – कामाच्या ठिकाणी काही सहकारी गटबाजी करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. मात्र तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. त्यामुळे समस्या सोडवल्या जातील. कौटुंबिक जीवन आनंददायी राहील. तुम्हाला जुन्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागू शकतात आणि त्यामुळे आर्थिक भार वाढेल.
मकर – करूणा आणि प्रेमाशी संबंधित भावना तुमच्या कृतींवर वर्चस्व गाजवतील. कामाची गती आणि दिशा आज अचानक बदलू शकते, ज्यामुळे तुम्हाला योग्य संतुलन राखावे लागे. इतरांच्या आर्थिक ताणाचा चिंता करण्याची सवय सोडून द्या, फायदेशीर ठरेल.
कुंभ – रत्न आणि मौल्यवान धातूंच्या व्यवसायात गुंतलेल्या जातकांनी सावधगिरीने भविष्याचे बेत आखावेत. आर्थिक भागीदारी वाढेल, कामाच्या ठिकाणी नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. कौटुंबिक जीवनात नवीन व्यवस्था तयार केली जाऊ शकते.
मीन – नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असेल. अनावश्यक वादांपासून दूर राहा. तसेच इतरांची आर्थिक जबाबदारी टाळणे सध्या योग्य ठरेल. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. संततीकडून उच्च शिक्षणाच्या संदर्भात तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल.
दिनविशेष
आनंदयात्री मंगेश पाडगावकर
टीम अवांतर
आनंदयात्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगेश केशव पाडगावकर यांचा जन्म वेंगुर्ले येथे 10 मार्च 1929 रोजी झाला. मराठी आणि संस्कृत विषय घेऊन त्यांनी एमएची पदवी संपादन केली. पुढे साधना साप्ताहिकात 1953 ते 55 या काळात सह-संपादक म्हणून काम सांभाळले. त्यानंतर दोन वर्षं रुईया महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले. त्यानंतर त्यांची मुंबई आकाशवाणीवर प्रोड्युसर म्हणून नेमणूक झाली. सहा वर्षे तिथे काम केल्यानंतर त्यांनी ‘युसिस’मध्ये (युनायटेड स्टेटस इन्फर्मेशन सर्व्हिस) मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून काम केले.
धारानृत्य, जिप्सी, छोरी, विदूषक, सलाम, गझल, भटके पक्षी, बोलगाणी हे त्यांचे उल्लेखनीय कवितासंग्रह असून गझल, विदूषक, सलाम अशा कवितांमधून त्यांनी राजकीय आशयाची, उपरोधाच्या आश्रयाने समाजातील विसंगतीवर प्रहार केले. याशिवाय पाडगावकरांच्या बालकविताही प्रसिद्ध आहेत. चांदोमामा, वेडं कोकरू, अफाटराव हे त्यांचे बालकवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. काव्यवाचनाच्या कार्यक्रमाला लोकप्रियता मिळवून देणाऱ्यांमध्ये पाडगावकर हे एक महत्त्वाचे कवी होते.
हेही वाचा – आयुष्याच्या एका वळणावर… जोडीदाराची गरज!
साठहून अधिक वर्षांच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले. ‘थॉमस पेनचे राजनैतिक निबंध’ हा त्यांनी केलेला अनुवाद 1957 साली प्रकाशित झाला होता तर 2009-10 मध्ये ‘बायबल’चा अनुवाद प्रकाशित झाला. कमला सुब्रह्मण्यम या लेखिकेच्या मूळ इंग्रजी महाभारताचा पाडगांवकरांनी ‘कथारूप महाभारत’ या नावाचे दोन-खंड अनुवाद केला आहे. या दीर्घ कालावधीत त्यांनी विविध विषयांवरच्या पंचवीसहून अधिक पुस्तकांचा अनुवाद केला. ‘बोलगाणी’ हा पाडगावकर यांनी काव्यरचनेवर केलेला एक वेगळा प्रयोग आहे.
चिपळूण येथे 1992 साली झालेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 2010 साली त्यांनी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले. त्याच वर्षी ते बालकुमार साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष झाले.
‘सलाम’ या कवितासंग्रहासाठी 1980 साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल 2013 साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सन्मान असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. अशा या कवीचे 30 डिसेंबर 2015 रोजी निधन झाले.


