दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 28 नोव्हेंबर 2025; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 07 अग्रहायण शके 1947; तिथि : अष्टमी 24:14; नक्षत्र : शततारका 26:48
- योग : व्याघात 11:04; करण : विष्टी 12:27
- सूर्य : वृश्चिक; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:52; सूर्यास्त : 17:59
- पक्ष : शुक्ल; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
दुर्गाष्टमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा. बॉसचा मूड चांगला असल्यामुळे कामाच्या ठिकाणी आज चांगल्या गोष्टी घडतील. व्यापाऱ्यांना आज व्यापारात काहीअंशी घाटा होऊ शकतो. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. जोडीदाराचे भरभक्कम पाठबळ मिळेल.
वृषभ – एखाद्या मोठ्या कामात सहभागी व्हाल आणि तुम्हाला त्याबद्दल पारितोषिके मिळतील. वाद, संघर्ष टाळा, अन्यथा मानसिक ताण वाढू शकतो. कुटुंबातील एका सदस्याच्या आजारपणामुळे आर्थिक चिंता येऊ शकते. कुटुंबातील गरजांना पूर्ण करताना तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देऊ शकत नाहीत. परंतु, आज तुम्ही स्वतःसाठी वेळ घालवू शकाल.
मिथुन – स्वत:ची प्रगती करणाऱ्या प्रकल्पांसाठी ऊर्जा खर्च करा, त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल. या राशीतील काही बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. पत्रव्यवहार काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. कंटाळवाण्या आणि धीम्या अशा दिवशी मित्र आणि जीवनसाथी यांच्याकडून मोलाची साथ मिळेल. तब्येतीकडे लक्ष द्या.
कर्क – कामाच्या ठिकाणी जो तुमचा द्वेष करतो, त्याला एक साधे ‘हॅलो’ केलेत तर काहीतरी चांगले घडण्याची शक्यता आहे. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च कराल. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे तुमचे नातेसंबंध सुधारतील. एक चकित करणारी भेटवस्तू मिळण्याचीही शक्यता आहे.
सिंह – आज एखादा कार्यक्रम किंवा व्याख्यानाला उपस्थिती लावल्यावर प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. व्यवसायामध्ये यश दृष्टिपथात येईल. त्याच अनुषंगाने नव्या प्रकल्पांचा विचार करू शकता. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कामाची दखल घेतली जाईल. स्वार्थी आणि लगेच चिडणाऱ्या व्यक्तीला टाळा, कारण ती व्यक्ती तुम्हाला तणावात टाकू शकते.
हेही वाचा – मैं जिंदगी का साथ निभाता चला गया…
कन्या – आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. मेहनत आणि सहनशीलता या आधारे उद्दिष्ट गाठू शकाल. मनावर नियंत्रण ठेवा, कोणत्याही मोहाला बळी पडू नका. अतिशय विचारपूर्वक गुंतवणूक करा, ती भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरेल. जोडीदारासह कुटुंबाकडून पाठबळ मिळेल. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत दिवस नेहमीप्रमाणेच असेल.
तुळ – संताकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आणि आराम मिळवू देईल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. सकारात्मक स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. कोणत्याही संयुक्त व्यवसायात शक्यतो पडू नका, भागीदार आपला फायदा घेतील, काळजी घ्या.
वृश्चिक – भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असाल, म्हणून तुम्ही दुखावले जाऊ शकता. चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परिणामी तुम्ही आज एका कर्जापासून मुक्त होऊ शकतात. आठवड्याच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल.
धनु – आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा-आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. आपल्या घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतले असेल तर, आज त्यांना ते परत करा, अन्यथा ते कळीचे कारण ठरू शकते. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही.
मकर – घरातील लहान-लहान गोष्टींवर आज खूप खर्च होऊ शकतो. ज्यामुळे मानसिक तणावात येऊ शकतात. तथापि, कुटुंबीयांच्या पाठबळामुळे तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी आवडते काम केले पाहिजे, असे करण्याने तुमच्यात सकारात्मक बदल येतील.
कुंभ – अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आज अनेक नवीन आर्थिक योजना ऑफर केल्या जातील, पण कोणतेही वचन देण्याआधी संबधित योजनेच्या चांगल्या-वाईट बाबी तपासून पाहा. व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. बोलतानाही विचारपूर्वक बोला, अन्यथा मोठ्या वादात अडकू शकता.
हेही वाचा – गाडी बुला रही हैं…
मीन – चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण काही तज्ज्ञांच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा, अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली उधारी अचानकपणे परत मिळेल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल.
दिनविशेष
गायनाचार्य पंडित रामकृष्णबुवा वझे
टीम अवांतर
गायनाचार्य पंडित रामकृष्णबुवा वझे यांचा जन्म 28 नोव्हेंबर 1873 रोजी सावंतवाडी संस्थानातील ओझरे गावी झाला. त्यांचे बालपण फार कष्टात आणि हालअपेष्टांत गेले. जेमतेम मराठी चौथ्या इयत्तेपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. लहानपणापासून बुवांना गाण्याची आवड होती. त्यामुळे कागलचे गायक बळवंतराव पोहरे यांच्याकडे त्यांचे गाण्याचे प्राथमिक शिक्षण झाले. नंतर ते मालवणला गेले आणि वर्षभर विठोबाआण्णा हडप यांच्याकडे तालीम घेतली. वयाच्या बाराव्या वर्षी रामकृष्णबुवांचे लग्न झाले. त्यानंतर गवई होण्याच्या तीव्र इच्छेपोटी त्यांनी घर सोडले आणि पायी प्रवास करून इंदूर गाठले. तेथे सुप्रसिद्ध पखवाज वादक नानासाहेब पानसे यांच्याकडे ते राहिले. गाणे शिकण्याची रामकृष्णबुवांची जिद्द जाणून पानसे यांनी त्यांना ग्वाल्हेरला जाण्यास सांगितले. बुवा ग्वाल्हेरला आले आणि ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध उस्ताद निसार हुसेनखाँ यांच्याकडे गाणे शिकू लागले. माधुकरी मागून, अत्यंत कष्टाने त्यांनी ग्वाल्हेरला गानविद्या संपादन केली. नंतर अनेक गवयांच्या ते सहवासात होते. गाणे ऐकावयाचे आणि प्रसिद्ध कलावंतांची सेवा करून विद्या मिळवायची, अशी त्यांची वृत्ती होती. आपल्या भ्रमणात ते अनेक कलावंतांना ऐकून, शक्य तेथे त्यांच्याकडून बंदिशी मिळवत आणि संग्रह करीत आपली विद्या संपन्न करीत होते. त्याच अनुषंगाने ‘गायनाचार्य’ म्हणून संबोधले जाते. काही वर्षे गोव्यात राहून वझेबुवांनी अनेक शिष्य-शिष्या तयार केल्या. ‘बलवंत संगीत मंडळी’ आणि ‘ललितकलादर्श’ या नाटकमंडळांमध्ये ते संगीतगुरू म्हणून काही काळ राहिले. आयुष्याच्या अखेरीस ते पुण्यात स्थायिक झाले आणि 5 मे 1945 रोजी त्यांचे तेथेच निधन झाले. त्यांचे चिरंजीव शिवरामबुवा वझे, हरिभाऊ घांगरेकर, केशवराव भोसले, मा. दीनानाथ, बापूराव पेंढीरकर, भालचंद्र पेंढारकर, दन्नीबाई, तानीबाई, कागलकरबुवा वगैरे कलावंत मंडळींचा त्यांच्या शिष्यवर्गात समावेश होतो.


