दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 26 ऑक्टोबर 2025; वार : रविवार
- भारतीय सौर : 04 कार्तिक शके 1947; तिथि : पंचमी 30:04; नक्षत्र : ज्येष्ठा 10:45
- योग : शोभन 06:44; करण : बव 16:57
- सूर्य : तुळ; चंद्र : वृश्चिक 10:45; सूर्योदय : 06:35; सूर्यास्त : 18:09
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
पांडव पंचमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
पंडित हृदयनाथ मंगेशकर
टीम अवांतर
संगीत क्षेत्रात विविध प्रयोग करणारे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1937 रोजी झाला. वडिलांचा फारसा सहवास न लाभलेल्या हृदयनाथ यांनी वंशपरंपरेने आलेला संगीत वारसा, शास्त्रीय गायनासाठी उस्ताद आमीरखाँ यांचे पत्करलेले शिष्यत्व, आपल्या समकालीन संगीतकारांच्या रचनांचा केलेला अभ्यास आणि स्वतःची स्वतंत्र प्रतिभा यामुळे सुरुवातीपासूनच हृदयनाथ मंगेशकर यांची संगीतकार म्हणून एक वेगळी शैली निर्माण झाली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी ‘निसदिन बरसत नैन हमारे’ आणि ‘बरसे बूंदिया सावन की’ या सारख्या भक्तिगीतांना स्वरसाज चढवला. संगीतकार सलील चौधरी यांना त्यांनी गुरुस्थानी मानले होते. स्त्रीस्वरातील संगीतरचना हे त्यांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यांनी संगीतबद्ध केलेली बहुसंख्य गाणी त्यांच्या भगिनी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायली आहेत. याशिवाय किशोरी आमोणकर, पद्मजा फेणाणी जोगळेकर, अनुराधा पौडवाल, ज्योत्स्ना हर्डीकर, राधा मंगेशकर तर, रवींद्र साठे, सुरेश वाडकर, महेंद्र कपूर, अरुण दाते यासारख्या गायकांना हृदयनाथ यांनी आपल्या संगीत दिग्दर्शनाखाली गाण्याची संधी दिली आहे. कोळी गीतांवर डोलायला लावणारी संगीतरचना हे देखील त्यांच्यातील संगीतकाराचे वैशिष्ट्य होते. गीतकार शांता शेळके यांच्या अनेक गीतांना हृदयनाथ यांनीच संगीत दिले आहे. ना. धों. महानोर, कवी ग्रेस, आरती प्रभू, सुरेश भट यासारख्या कविता, गाणी किंवा गझलींना अत्यंत दर्जेदार संगीत त्यांनी दिले. ‘जैत रे जैत’ हा मराठी किंवा ‘लेकीन’ या हिंदी चित्रपटाला दिलेले संगीत लोकसंगीताचा असणारा त्यांचा अभ्यास दाखवणारे आहे. संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये ‘लेकिन’ या हिंदी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार, पंडित भीमसेन जोशी आणि पंडित जसराज यांच्या हस्ते ‘पंडित’ ही पदवी, शंकराचार्यांकडून ‘भावगंधर्व’ ही पदवी, भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ पुरस्कार, सूरसिंगार यासारख्या पुरस्कारांचा समावेश आहे.


