दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 24 ऑक्टोबर 2025; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 02 कार्तिक शके 1947; तिथि : तृतीया 25:18; नक्षत्र : अनुराधा अहोरात्र
- योग : सौभाग्य 29:53; करण : तैतिल 12:02
- सूर्य : तुळ; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:34; सूर्यास्त : 18:11
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस आनंददायी आणि भाग्यशाली असेल. नफ्याच्या संधी वाढतील. याव्यतिरिक्त, नवीन संधी समोर येतील. करिअर बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. परदेशात व्यवसाय करण्याचा विचार करणाऱ्यांना आज संधी मिळू शकते. कुटुंबात प्रेम, सुसंवाद आणि आपुलकी राहील. आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल.
वृषभ – आजचा दिवस संमिश्र असेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. कामावर काहीतरी नवीन करून पाहण्याची संधी मिळेल. नवीन संपर्कांचा फायदा होईल. पैसे कमविण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. नोकरदार जातकांना आज काही चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. आरोग्य सामान्य राहील.
मिथुन – दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. काही गोष्टींमध्ये यश मिळेल, तर काही गोष्टींबाबत अडचणी उद्भवतील. कामात अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागू शकते, परंतु अंगभूत बुद्धीमुळे त्यावर मात करण्याचा मार्ग सापडेल. कौटुंबिक संबंध मजबूत होतील. दुसऱ्याच्या सल्ल्याने गुंतवणुकीचे निर्णय घेण्याचे टाळा. दिवसभर आर्थिक स्थिरता राहील.
कर्क – जुन्या योजनेतून यश मिळू शकेल. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. व्यवसायिकांनी पुढे जाण्याचा विचार करावा. नोकरदार जातकांना चांगल्या कामासाठी सन्मानित केले जाऊ शकते. कुटुंबात शांती आणि सौहार्द नांदेल. मात्र, खर्चात वाढ होईल, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा.
सिंह – आजचा दिवस उत्साह आणि उर्जेने भरलेला असेल. एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल. तसेच, नवीन संधीही मिळतील. नोकरदार जातक जे नवीन नोकरीच्या शोधत आहेत, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. पोटाच्या समस्या त्रास देऊ शकतात. त्यामुळे काळजी घ्या.
हेही वाचा – कन्फेशन कॉल…
कन्या – जबाबदाऱ्या अत्यंत काळजीपूर्वक पार पाडाव्या लागतील, त्यात चालढकल केल्यास काम धोक्यात येऊ शकते. कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक परिस्थिती सुधारेल. कोणालाही अनावश्यक सल्ला देणे टाळा, कारण यामुळे वाद होऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत, खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल.
तुळ – दिवस उत्साहाने भरलेला राहील. वेळ सर्जनशील कामांमध्ये घालवाल. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला राहील. दुसऱ्याचे वाहन उधार घेण्याचे टाळावे, कारण यामुळे काही अडचणी येऊ शकतात. अनावश्यक खर्चात वाढ होऊ शकते. दिवसाच्या उत्तरार्धात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे. कुटुंबात प्रेम आणि पाठिंब्याचे वातावरण राहील.
वृश्चिक – आज कामाच्या ताणामुळे त्रास होऊ शकतो, निरुत्साह वाटेल. एखादे काम पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न कराल, परंतु तरीही पदरी निराशाच येईल. दुसरीकडे, कामावर एक नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते. कुटुंबातील सदस्यांशी काही मतभेद उद्भवू शकतात, परंतु नंतर ते दूर होतील.
धनु – नशिबाची मोठी साथ मिळेल. अपूर्ण कामे पूर्ण झाल्याने स्वप्ने साकार होऊ शकतात. मेहनतीचे फळ मिळेल, आर्थिक परिस्थिती मजबूत राहील, तसेच आर्थिक लाभाच्या नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे कार्यक्षमता वाढेल. ज्यांच्याशी दीर्घकाळापासून मतभेद होते, ते हळूहळू कमी झालेले दिसतील.
मकर – आज नफ्याच्या सुवर्ण संधी उपलब्ध होत आहेत. अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते, त्याबद्दल बक्षीसही मिळू शकते. मात्र खर्च वाढू शकतात, म्हणून आर्थिक बाबींमध्ये संयम बाळगावा लागेल. दुसरीकडे, जुन्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल. जे भागीदारीत काम किंवा व्यवसाय करतात त्यांना फायदा होईल.
कुंभ – कुंभ राशीसाठी आजचा दिवस यशाने भरलेला असेल. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही गोष्टीत घाई करणे टाळावे, कारण यामुळे नुकसान होऊ शकते. कामातही यश मिळेल. जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.
हेही वाचा – सायकल… अपराधीपणाच्या भावनेतून सुटका!
मीन – दिवस काही बाबतीत तणावपूर्ण असू शकतो, परंतु काही बाबतीत यशाने भरलेला असू शकतो. कायदेशीर वादात अडकलेल्या जातकांच्या बाजूने निकाल लागेल. दुसरीकडे, कुटुंबातील काही सदस्यांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. नोकरदार जातकांना काहीतरी वेगळे अनुभव येतील. अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात. जोडीदाराशी काही मतभेद उद्भवू शकतात.
दिनविशेष
‘कॉमन मॅन’चे निर्माते आर.के.लक्ष्मण
टीम अवांतर
भारतीय व्यंगचित्रकार, चित्रकार रसीपुरम कृष्णस्वामी अय्यर लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1921 रोजी झाला. ते त्यांच्या ‘द कॉमन मॅन’च्या निर्मितीसाठी आणि 1951 मध्ये सुरू झालेल्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये ‘यू सेड इट’ या त्यांच्या दैनिक व्यंगचित्रासाठी प्रसिद्ध आहेत. पार्ट टाइम व्यंगचित्रकार म्हणून आर के लक्ष्मण यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, मुख्यतः स्थानिक वृत्तपत्रे आणि मासिकांसाठी काम केले. सुरुवातीला रोहन या वर्तमानपत्रासाठी आणि स्वराज्य तसेच ब्लिट्झसारख्या मासिकांसाठी ते काम करत. म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमध्ये असताना, त्यांनी आपला मोठा भाऊ आर. के. नारायण यांच्या द हिंदूमध्ये कथा चित्रित करण्यास सुरुवात केली. याशिवाय, स्थानिक वृत्तपत्रांसाठी त्यांनी राजकीय व्यंगचित्रे काढली. बंगळुरूच्या मॅजेस्टिक भागातील एम. शिवराम यांनी 1942 मध्ये एक मासिक सुरू केले; ते विनोदी, उपहासात्मक लेख आणि व्यंगचित्रांना समर्पित केले. शिवराम स्वतः कन्नड भाषेतील प्रख्यात विनोदकार होते. त्यांनी लक्ष्मण यांना प्रोत्साहन दिले. पुढे मुंबईतील फ्री प्रेस जर्नलसाठी राजकीय व्यंगचित्रकार म्हणून त्यांची पहिली पूर्णवेळ नोकरी होती. जिथे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळसाहेब ठाकरे त्यांचे व्यंगचित्रकार सहकारी होते. नंतर, ते टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपमध्ये सामील झाले आणि ‘द कॉमन मॅन’ या पात्राची निर्मिती झाली, जी नंतर प्रसिद्ध झाली आणि हाच लक्ष्मण यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. या व्यंगचित्रकाराने आपल्या मिश्कील, खुमासदार तर कधी बोचऱ्या उपरोधिक, धारदार टिप्पणीने समाजातील उणिवांवर, दोषांवर भाष्य केले. पुण्यातील सिम्बायोसिस संस्थेच्या मुख्य आवारात लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’चा 9 फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा उभारण्यात आला आहे. लक्ष्मण यांना त्यांच्या व्यंगचित्रांसाठी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांत पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार आदी महत्त्वाचे पुरस्कार आहेत. मराठा विद्यापिठाने त्यांना डी.लिट. ही सन्माननीय पदवी दिली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. 26 जानेवारी 2015 रोजी आर.के. लक्ष्मण यांचे निधन झाले.


