दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 23 नोव्हेंबर 2025; वार : रविवार
- भारतीय सौर : 02 अग्रहायण शके 1947; तिथि : तृतीया 19:24; नक्षत्र : मूळ 19:27
- योग : धृति 12:07; करण : वणिज अहोरात्र
- सूर्य : वृश्चिक; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:49; सूर्यास्त : 17:59
- पक्ष : शुक्ल; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – थंडी अन् विदर्भातील रोडगे पार्टी!
दिनविशेष
ख्यातनाम चित्रकार बाबूराव सडवेलकर
टीम अवांतर
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार बाबूराव नारायण सडवेलकर यांचा जन्म 28 जून 1928 रोजी वेंगुर्ले (सिंधुदुर्ग जिल्हा) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापूर येथील राजाराम हायस्कूलमध्ये तर, महाविद्यालयीन शिक्षण राजाराम कॉलेजमध्ये झाले. शालेय जीवनातच चित्रकार होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्या ठायी निर्माण झाली आणि त्याच प्रेरणेने त्यांनी 1950 साली मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथे उच्च कलाशिक्षणासाठी प्रवेश घेतला. 1952 मध्ये रंग आणि रेखाकला विषयाची जी. डी. आर्ट ही पदविका त्यांनी संपादन केली. त्यानंतर 1953 ते 1971 या काळात त्यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये चित्रकला विभागात अधिव्याख्याता म्हणून अध्यापन केले. याच काळात (1962-63) फुलब्राइट स्मिथमुंट उपकमांतर्गत शिष्यवृत्ती मिळवून ते अमेरिकेला गेले आणि आधुनिक कलाशिक्षण-पद्धतींचा तसेच तंत्रांचा तेथे त्यांनी अभ्यास केला. तत्पूर्वी, अधिव्याख्याता असताना ते बॉम्बे ग्रुप ऑफ आर्टिस्टचे सभासद होते. या ग्रुपतर्फे त्यांनी सहा वर्षे प्रदर्शने भरविली. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या रूपभेद या कला नियतकालिकाचे ते संपादक होते. 1967 साली महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयाच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. कला संचालक म्हणूनही त्यांची कारकीर्द भरीव आणि संस्मरणीय ठरली. 1955 ते 1974 या काळात त्यांनी स्वत:च्या चित्रांची सहा एकल प्रदर्शने (वन मॅन शो) भरविली. त्याचप्रमाणे अमेरिकेत प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड आणि न्यूयॉर्क येथे त्यांनी स्वत:च्या चित्रांची एकल प्रदर्शने भरविली. अनेक आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनांतून तसेच कलामहोत्सवांतून त्यांची चित्रे प्रदर्शित झाली. उदा. व्हेनिस, पॅरिस, साओ पाओलो येथील द्विवार्षिक प्रदर्शने त्याचप्रमाणे मॉस्को, टोकिओ, सायगाँव (हो-चि-मिन्ह) येथील त्यांची प्रदर्शने भरविली. अमेरिकेत 1950 ते 60 या दशकात बहरलेला पाश्चात्त्य ॲबस्ट्रॅक्ट चित्रकलेचा नवप्रवाह मुंबईच्या कलाक्षेत्रात रूजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. त्यांची या शैलीतील वैशिष्ट्यपूर्ण गाजलेली चित्रे म्हणजे वन वर्ल्ड (1957), लूनॅटिक (1959), द अर्थ – I (1962), इमेज ऑफ द सिटी (1963), द कॉस्मिक सिटी II (1974), फ्लाइट ऑफ द लूनर रॉक (1974), फ्लोटिंग सिटीज (1981) इत्यादी. पॉल क्ले या स्विस आधुनिक चित्रकाराचा त्यांच्यावर प्रभाव जाणवतो. व्यक्तिचित्रे रंगविण्यातही त्यांनी असामान्य प्रावीण्य मिळविले. सुरुवातीच्या काळात त्यांनी विपुल व्यक्तिचित्रे रंगविली. तैलरंगाप्रमाणेच जलरंग-माध्यमावरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. मुंबईतील अनेकविध स्थळांची शेकडो चित्रे अपारदर्शक रंगांत रंगवून त्यांनी मुंबईचे आगळेवेगळे रंगमय दर्शन घडवले. भित्तिचित्रण (म्यूरल) व भित्तिलेपचित्रण (फेस्को) तंत्रांचाही त्यांचा गाढा, सखोल व्यासंग होता. लोककला-परंपरेवर त्यांनी चित्रकथी हा अनुबोधपट तयार केला. वर्तमान चित्रसूत्र (1996) हा त्यांचा कलाविषयक लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या पाच सुवर्ण पदकांचे ते मानकरी ठरले. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, नवी दिल्ली; टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई; पंजाब नॅशनल म्युझिअम, चंडीगढ; टाऊन हॉल म्युझिअम, कोल्हापूर या संस्थांमध्ये त्यांची चित्रे कायमस्वरूपी संग्रहीत करण्यात आली आहेत. 23 नोव्हेंबर 2000 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : कामाचे नियोजन आणि पूर्तता


