दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 22 डिसेंबर 2025; वार : सोमवार
- भारतीय सौर : 01 पौष अग्रहायण शके 1947; तिथि : द्वितीया 10:51; नक्षत्र : उत्तराषाढा 29:31
- योग : ध्रुव 16:39; करण : तैतिल 23:34
- सूर्य : धनु; चंद्र : धनु 10:06; सूर्योदय : 07:06; सूर्यास्त : 18:05
- पक्ष : शुक्ल; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आज नशिबाची भक्कम साथ मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे गती घेतील. व्यवसायात नफा होण्याचे संकेत आहेत. आरोग्यात चांगली सुधारणा होईल. कौटुंबिक जीवन आणि संतती या दोन्ही आघाड्यांवर शांतता असेल.
वृषभ – व्यवसाय चांगला राहील, परंतु थोडे सावध राहण्याची गरज आहे. परिस्थिती फारशी अनुकूल दिसत नाही. त्यामुळे कोणताही धोका पत्करणे टाळा. अनावश्यक वाद किंवा अडचणीत अडकू शकता. जोडीदार आणि संततीशी संबंध सामान्य राहतील.
मिथुन – आज जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. आनंदी रहाल आणि दिवस काहीसा सुट्टी असल्यासारखा वाटेल. नोकरी, कौटुंबिक जीवन, संतती, आरोग्य आणि व्यवसाय – प्रत्येक क्षेत्रात चांगल्या गोष्टी घडतील. सकारात्मक ऊर्जा प्रबळ असेल.
कर्क – आज वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद मिळतील. तुमचे ज्ञान आणि समज वाढेल. आरोग्यात चढ उतार असेल, त्यामुळे काळजी घ्या. जोडीदार आणि संततीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा होईल. व्यवसायातही नफा होईल, पण आणखी मेहनतीची गरज आहे.
सिंह – आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी आणि सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी चांगला आहे. लेखक, कवी आणि कलाकारांना यश मिळू शकते. व्यवसाय चांगला चालेल. आरोग्य चांगले राहील, मात्र भावनिक होऊन निर्णय घेणे टाळा. जोडीदार आणि संतती ही बाजू थोडी सांभाळावी लागेल.
हेही वाचा – गेट-टुगेदर… आयुष्याला नवसंजीवनी देणारं!
कन्या – मन थोडे अस्वस्थ आणि बेचैन असू शकते. खर्च वाढू शकतो. अनावश्यक काळजी टाळा. अर्थात, जोडीदार आणि संतती यांचा भक्कम पाठिंबा मिळेल. व्यवसायातील परिस्थिती चांगली राहील.
तुळ – कुटुंबात काही वाद होऊ शकतात. त्यामुळे सावध भूमिका घ्या. जमीन, घर किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. व्यवसायही फायदेशीर ठरेल. आरोग्य चांगले राहील. जोडीदार आणि संतती यांच्याकडून एखादी भेटवस्तू मिळेल.
वृश्चिक – आज उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. जुन्या कामातूनही उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. जोडीदार आणि संततीकडून भरपूर लाड होतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. व्यवसाय फायदेशीर असेल.
धनु – धाडसाचे फळ मिळेल. आजपर्यंत केलेल्या कष्टाचे चीज होईल. तुमचा व्यवसाय मजबूत होईल. कुटुंब आणि प्रियजनांकडून पाठिंबा मिळेल. आरोग्य चांगले राहील. संततीकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल.
मकर – आज आर्थिक लाभ होण्याची चांगली शक्यता आहे. व्यवसायही फायदेशीर ठरेल. कुटुंबाकडून एखादी खूप मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. आरोग्य चांगले राहील. जोडीदार आणि संततीशी संबंधित गोष्टींबाबत घेतलेले निर्णय योग्य ठरतील.
कुंभ – सकारात्मक ऊर्जा प्रबळ असेल. प्रियजनांपासून आणि संततीपासून काही काळासाठी कामानिमित्त लांब राहायला लागेल. त्यामुळे एकटेपणाची भावना प्रबळ होईल. व्यवसाय चांगला राहील. भूतकाळातील घटनांचा विचार करीत बसलात तर, नैराश्याने प्रकृतीवर परिणाम होईल.
हेही वाचा – आरूच्या ‘त्या’ फोटोंवरून रणकंदन…
मीन – आज व्यवसायाची परिस्थिती चांगली राहील. सरकारी बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये विजय मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र, तोंडावर ताबा ठेवा, शब्दाने शब्द वाढून वाद होण्याची शक्यता आहे.
दिनविशेष
भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन
टीम अवांतर
भारतीय गणितज्ज्ञ आणि संख्या सिद्धांत या विषयातील कार्याकरिता विशेष प्रसिद्ध असणारे श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तंजावर जिल्ह्यातील एरोड येथे झाला. त्यांनी प्रारंभी स्वतःच त्रिकोणमितीचा अभ्यास केला आणि वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी लेनर्ड ऑयलर यांनी पूर्वसूचित केलेली त्रिज्या (Radius) आणि कोज्या (Cosine) यांसंबंधीची प्रमेये मांडली. 1903 मध्ये त्यांना जी. एस. कार यांचा सिनॉप्सिस ऑफ एलिमेंटरी रिझल्टस् इन प्युअर अँड ॲप्लाइड मॅथेमॅटिक्स हा ग्रंथ अभ्यासण्याची संधी मिळाली. या ग्रंथात सुमारे 6 हजार प्रमेये होती आणि ती सर्व 1860 सालापूर्वीची होती. या ग्रंथामुळे रामानुजन यांच्या कुशाग्र बुद्धीला चालना मिळाली. त्यांनी कार यांच्या ग्रंथातील प्रमेये पडताळून पाहिली, परंतु त्यापूर्वी गणितावरील चांगल्या प्रमाणभूत ग्रंथ त्यांच्या वाचनात न आल्याने त्यांना प्रत्येक वेळी स्वतः मूलभूत संशोधन करावे लागले. या कार्यात त्यांनी अनेक नवीन बैजिक श्रेढी (Algebraic Expression) शोधून काढल्या.
1904 मध्ये कुंभकोणम् येथील गव्हर्न्मेंट कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळाला आणि शिष्यवृत्तीही मिळाली. त्यांचे प्राध्यापक पी. व्ही. शेषू अय्यर यांना रामानुजन यांचे गणितातील असामान्य प्रभुत्व जाणवले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली रामानुजन यांचे वाचन आणि संशोधन सुरू झाले. पुढे 1914 मध्ये रामानुजन यांनी केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजात प्रवेश घेतला. गणिताचे प्राध्यापक सर गॉडफ्री हॅरल्ड हार्डी आणि जे. ई. लिट्लवुड यांच्या मार्गदर्शनाखाली रामानुजन यांचे निबंध इंग्लिश तसेच इतर युरोपीय नियतकालिकांत प्रकाशित झाले. इंग्लंडमधील पाच वर्षांच्या वास्तव्यात त्यांचे 21 निबंध प्रसिद्ध झाले. याखेरीज, इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये त्यांचे सुमारे 12 निबंध प्रसिद्ध झाले. त्यांच्या कार्याचा विविध देशांतील गणितज्ज्ञ आजही त्याचा अभ्यास करीत आहेत.
26 एप्रिल 1920 रोजी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. मात्र अखेरपर्यंत ते गणितातील संशोधनात मग्न होते. त्यांचे सर्व संशोधन कार्य जी. एच्. हार्डी, पी. व्ही. शेषू अय्यर आणि बी. एम्. विल्सन यांनी संपादित करून कलेक्टेड पेपर्स ऑफ श्रीनिवास रामानुजन या शीर्षकाखाली 1927 साली प्रसिद्ध केले. याशिवाय रामानुजन यांनी केलेली विविध टिपणे नोटबुक्स ऑफ श्रीनिवास रामानुजन (2 खंड, 1957) या ग्रंथाद्वारे प्रसिद्ध झाली.


