दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 21 ऑक्टोबर 2025; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 29 आश्विन शके 1947; तिथि : अमावस्या 17:54; नक्षत्र : चित्रा 22:58
- योग : विष्कंभ 27:15; करण : किंस्तुघ्न अहोरात्र
- सूर्य : तुळ; चंद्र : कन्या 09:35; सूर्योदय : 06:33; सूर्यास्त : 18:13
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
लक्ष्मीपूजन (सायंकाळी 06:10 ते रात्री 08:40)
दर्श अमावस्या
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – व्यवहारात स्पष्टता ठेवा. कुटुंबातील सदस्यांकडून भरघोस मदत मिळेल, त्यामुळे आर्थिक अडचणींची धग कमी जाणवेल. एखादी आवडती वस्तू किंवा नवीन कपडे भेट म्हणून मिळू शकतात. व्यापार आणि व्यवसाय अनुकूल राहील. नोकरदारांना पदोन्नतीची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होण्याची शक्यता आहे.
वृषभ – आजच्या सुविधा उद्या उपलब्ध नसतील, त्यामुळे आजच फायदा घ्या. अडचणीत आणणाऱ्या मित्रांशी चार हात लांब राहणेच चांगले. व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य राहील. जंगम आणि स्थावर अशा दोन्ही मालमत्तांमध्ये वाढ होऊ शकते. आज आरोग्याकडे लक्ष द्या.
मिथुन – इतरांच्या मदतीने काम पूर्ण कराल. अशावेळी मित्रांकडे दुर्लक्ष करणे अयोग्य ठरेल. नोकरीत काही गुंतागूंत निर्माण होईल. व्यवसाय वृद्धीसाठी अतिशय उत्तम दिवस. आज शत्रूंवर वर्चस्व गाजवाल. घरी पाहुणे येतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
कर्क – चांगल्या कामासाठी मार्ग मोकळा होईल. प्रतिष्ठित लोकांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक प्रवास यशस्वी होईल. बुद्धिमत्ता, शक्ती आणि धैर्य यामुळे यशस्वी व्हाल. व्यवसाय वाढेल आणि नफा होईल. कामाच्या ठिकाणी समाधानकारक यश मिळेल.
सिंह – कामाला प्राधान्य द्या. धार्मिक श्रद्धा फलदायी ठरतील. मोठा फायदा होईल, तुमचा सौम्य स्वभाव सहाय्यभूत ठरेल. जुन्या मित्रांना भेटाल. मात्र हाती घेतलेल्या कामावर बारकाईने लक्ष ठेवा. जोडीदाराकडून सगळ्या परिस्थितीत पाठिंबा मिळेल.
हेही वाचा – आता काय परिस्थिती आहे?
कन्या – नकारात्मक विचारांचा मोठा परिणाम कामावर होणार आहे. मनात निराधार भीती निर्माण होईल. मात्र, या गुंतागुंतीच्या गोष्टींमध्ये अडकण्याऐवजी, कामावर लक्ष केंद्रित करा. कामात सावधगिरी बाळगा. विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित प्रवास तूर्तास पुढे ढकला. आरोग्याच्या तक्रारी असतील.
तुळ – सध्या सुरू असलेल्या घडामोडी काळजीपूर्वक हाताळा. निराश होऊ नका; काळ हे सगळ्यावरचे औषध आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. व्यवसायातील अडथळे मानसिक अशांतता निर्माण करतील. शत्रूंच्या कारवाया, संततीबद्दलची चिंता आणि वाढता खर्च यामुळे अशांततेत भरच पडेल. कामातील प्रगतीत अडथळा येईल.
वृश्चिक – कुटुंबात शुभ कार्यक्रम होतील. वैवाहिक प्रेम आणि आपुलकी वाढेल. राज्यस्तरीय सन्मान मिळण्याची शक्यता आहे. हाती घेतलेले काम शांततेने करा. जीवन मौल्यवान आहे, त्यामुळे गाडी चालवताना काळजी घ्या. कामाच्या बाबतीत, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.
धनु – आत्मविश्वास तुमच्या कामात यश मिळवून देईल. भविष्यात नातेसंबंध फायदेशीर ठरतील. घर आणि व्यवसाय एकमेकांपासून वेगळे ठेवा. व्यावसायिक संबंधांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. एखादी आवडती वस्तू किंवा नवीन कपडे, दागिने भेट म्हणून मिळू शकतात.
मकर – आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. संभाषण करताना संयम ठेवा. तुमचे मन अस्वस्थ राहील. भावनांवर आधारित निर्णय घेऊ नका. त्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणालाही पैसे उधार देणे टाळा. कला क्षेत्रातील लोकांना कठोर परिश्रमानंतर यश मिळेल. सध्या व्यवसायाशी संबंधित प्रवास पुढे ढकलणे इष्ट ठरेल.
कुंभ – मन आर्थिक विकासावर केंद्रित असेल. आर्थिक बाजू मजबूत होण्याची शक्यता आहे. आर्थिक योजना यशस्वी होतील. शासनाकडून तुम्हाला व्यवसायासाठी पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. आरोग्याकडे लक्ष द्या.
हेही वाचा – मन तृप्त करणारं… रथीनम!
मीन – आर्थिक योजना यशस्वी होतील. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे.
दिनविशेष
नोबेल पारितोषिकांचे प्रणेते आल्फ्रेड नोबेल
टीम अवांतर
नोबेल, आल्फ्रेड बेअरनार्ड हे स्वीडिश अभियंते, स्फोटकांचे संशोधक, उद्योगपती आणि प्रख्यात नोबेल पारितोषिकांचे प्रणेते. त्यांनी डायनामाइट तसेच इतर शक्तिमान स्फोटक पदार्थ शोधून काढले. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे 21 ऑक्टोबर 1833 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांनी त्यांना स्वीडन, जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिकेत शिक्षणासाठी पाठविले. त्यामुळे त्यांना स्वीडिश, रशियन, फ्रेंच, इंग्रजी आणि जर्मन भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यासोबतच साहित्य, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान या विषयांची आवड होती. अमेरिकेहून परतल्यावर ते प्रथम वडिलांच्या रशियातील सेंट पीटर्झबर्ग येथील कारखान्यात रुजू झाले, परंतु तो लवकरच बंद पडला आणि ते स्वीडनला परतले. या कारखान्यात त्यांनी स्फोटक द्रव्यांचा विशेषतः नायट्रोग्लिसरीनचा अभ्यास केला. नायट्रोग्लिसरीनचे संशोधक ए. सोब्रेअरो यांचेशी पॅरिसमध्ये त्यांचा परिचय झाला होता. नायट्रोग्लिसरीन नावाच्या स्फोटक पदार्थाला त्यानी 1866मध्ये घनरूप मिळवून दिले, हाच ‘डायनामाईट’. कीझेलगूर या सच्छिद्र मृत्तिकेत नायट्रोग्लिसरीन शोषित करून त्यापासून डायनामाइट बनवितात. हे हाताळण्यास सुरक्षित असते. या शोधाचे पेटंट ब्रिटनमध्ये 1867 मध्ये तर अमेरिकेत 1868 मध्ये त्यांनी मिळविले. नोबेल यांनी बनविलेल्या स्फोटकांचा वापर शस्त्रांबरोबरच तेलाच्या विहिरी खोदणे, खनिजांचे उत्खनन करणे, रेल्वे तसेच रस्त्यांसाठी बोगदे खोदणे, कालव्यांचे रुंदीकरण यासाठी जगभरात केला जाऊ लागला. त्यानंतर बॅलिस्टाइट या धूर न होणाऱ्या स्फोटकाचा शोध त्यांनी लावला व त्याचे एकस्व 1888 मध्ये मिळविले. हे डायनामाइटपेक्षा जास्त शक्तिशाली होते. केवळ पेटविल्याने जी स्फोटके उडत नाहीत, त्यांचा स्फोट घडविण्यासाठी उपयोगी पडतील अशा विस्फोटकांचा (डिटोनेटर) शोधही त्यांनी लावला. याशिवाय विद्युत् रसायनशास्त्र, प्रकाशकी, धातुविज्ञान इत्यादी क्षेत्रांतही उपयोगी पडेल, असे काही संशोधन त्यांनी केले. त्यांनी सुमारे 355 पेटंट मिळविले. त्यांचे 10 डिसेंबर 1896 रोजी निधन झाले. आपल्या संपत्तीचा विनियोग मौलिक आणि मानवी हितसंवर्धक कार्यासाठी पारितोषिके देण्याकरिता व्हावा, अशी व्यवस्था त्यांनी मृत्यूपत्रात करून ठेवली. मृत्यूपत्रानुसार त्यांनी आपली 94 टक्के संपत्ती जागतिक पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पारितोषिक देण्यासाठी ठेवली होती.


