दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 18 जुलै 2025; वार : शुक्रवार
भारतीय सौर : 27 आषाढ शके 1947; तिथि : अष्टमी 17:01; नक्षत्र : अश्विनी 26:13
योग : सुकर्मा 06:47; करण : तैतिल 27:53
सूर्य : कर्क; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:10; सूर्यास्त : 19:19
पक्ष : कृष्ण; ऋतू : ग्रीष्म; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थोडा थकवा जाणवू शकतो. घरात काही बदलांमुळे भावनिक बनाल. काही प्रभावशाली व्यक्तींची भेट होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या दिवस साधारण राहील. व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.
वृषभ – आरोग्याच्या छोट्यामोठ्या कुरबुरी राहतील. त्यामुळे काळजी घ्या. स्वतःला सर्जनशील कामात व्यग्र ठेवा. आर्थिक बचतीचा विचार करा. दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. व्यावसायिकांना नवीन सौदे मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल.
मिथुन – कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळू शकते. वरिष्ठ तुमच्या कल्पनांनी प्रभावित होतील. मुलांच्या शिक्षण साहित्यावर अचानक काही खर्च करावा लागू शकतो. कुटुंबाची परिस्थिती आहे, त्यापेक्षा अधिक सुधारेल. व्यवसायात गुंतवलेल्या पैशांचा योग्य परतावा मिळणे अपेक्षित आहे.
कर्क – एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी मित्रांकडून मदत मिळू शकते. त्यांच्या सहकार्याने व्यवसाय वाढवू शकतो. व्यवसायात प्रगती होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ प्रभावित होऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या प्रगती होईल. जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवण्याची संधी मिळेल.
सिंह – एखादी चांगली बातमी मिळू शकते. पैशांशी संबंधित कोणताही प्रश्न सोडवता येईल. नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. गरज असल्यास जवळच्या मित्रांकडून मदत घ्या. व्यवसाय विस्तार करण्यासाठी दिवस चांगला असेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
कन्या – एखादी आश्चर्यचकीत करणारी बातमी कानावर येईल. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. नशीब तुमच्या बाजूने असल्याने आर्थिक फायदा होईल. घरी अचानक पाहुणे येऊ शकतात.
हेही वाचा – गेले ते दिन गेले…
तुळ – काही कामांसाठी त्वरित पावले उचलावी लागतील. यश मिळविण्यासाठी वेळप्रसंगी विचार बदलावे लागतील. व्यक्तिमत्वात सुधारणा होईल. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. पैशांशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. जोडीदारासमवेत फार वेळ घालवता येणार नाही.
वृश्चिक – विचार व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका. आत्मविश्वासाची असणारी कमतरता तुमच्यावर भारी पडणार नाही, याची काळजी घ्या; कारण त्यामुळे समस्या आणखी कठीण होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाणार आहे.
धनु – आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक लाभ होतील. कुटुंबासोबत एखाद्या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. कलात्मक आणि सर्जनशील क्षमतांची वाहवा होईल. मात्र बोलताना शब्दांची काळजीपूर्वक निवड करा.
मकर – आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने खास असणार आहे. मेहनतीचे फळ मिळेल. कामात प्रगती होऊ शकते. मात्र जोडीदाराच्या प्रकृतीच्या कुरबुरी चिंतेचे कारण असेल. अतिशय विचारपूर्वक पैसे गुंतवा.
कुंभ – दिवसाची सुरुवात व्यायामाने करा. काही व्यावसायिकांना जवळच्या मित्राच्या मदतीने आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. वैवाहिक संबंधांमध्ये सुधारणा होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते.
मीन – आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या इतर दिवसांपेक्षा चांगला असेल. गुंतवणुकीतून पुरेसे पैसे मिळतील. नात्यांची एक नवीन सुरुवात होऊ शकते. नवीन उपक्रम आकर्षक असतील आणि त्यातून चांगला परतावा मिळेल. कुटुंबातील एखादा लहान सदस्य आज तुमच्यासोबत थोडा वेळ घालवण्याचा आग्रह धरू शकतो.
हेही वाचा – आमच्या मराठी शाळा
दिनविशेष
शाहीर अण्णाभाऊ साठे
टीम अवांतर
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात “माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतेया कायली” या लावणीमुळे अजरामर झालेले शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केले असले तरी त्यांचे शालेय शिक्षण मात्र झाले नव्हते. पुढे प्रयत्नपूर्वक त्यांनी अक्षरज्ञान मिळवले. अकलेची गोष्ट, देशभक्त घोटाळे, शेटजींचे इलेक्शन, बेकायदेशीर, पुढारी मिळाला, लोकमंत्र्यांचा दौरा ही लोकनाट्ये, जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्या कंजारी, चिरानगरची भुतं, कृष्णाकाठच्या कथा यासारखे कथासंग्रह, चित्रा, फकिरा, वारणेचा वाघ, चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ, वैजयंता यासारख्या 35 कादंबऱ्या अशा साहित्यकृती त्यांच्या हातून घडल्या. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर मराठीत चित्रपटही निघाले. अण्णा भाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सूक्ष्म होती. ज्या उपेक्षितांच्या जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभूती घेतली, त्यातील क्षणाचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात कायम जाणवत राहिला. रशियाच्या इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या निमंत्रणावरुन ते 1961 साली रशियात गेले. त्यावर त्यांनी लिहिलेले प्रवासवर्णनही लोकप्रिय झाले. लेखनाव्यतिरिक्त ते उत्तम अभिनय करत असत, हातात डफ घेऊन शाहिरी कवने मोठ्या तडफेने गात. बुलबुल, बासरी, हार्मोनियम अशी वाद्येही ते वाजवीत. दांडपट्टा फिरवीत. शिवाय, त्यांनी नवयुग, युगांतर आणि आचार्य अत्रेंच्या मराठा वर्तमानपात्रतून अनेक लेख आणि पुस्तकांची परीक्षणेही लिहिली होती. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर 22 परकीय भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे 18 जुलै 1969 रोजी निधन झाले.