दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 15 ऑक्टोबर 2025; वार : बुधवार
भारतीय सौर : 23 आश्विन शके 1947; तिथि : नवमी 10:33; नक्षत्र : पुष्य 11:59
योग : साध्य 26:56; करण : वणिज 22:29
सूर्य : कन्या; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:31; सूर्यास्त : 18:17
पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस सकारात्मक उर्जेने भरलेला असेल. त्यामुळे आज काहीतरी निराळे, वेगळे काम करावेसे वाटेल आणि तुम्ही ते कराल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर उत्पन्नही वाढेल. व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता. पालकांचे आरोग्य सुधारेल. रिकामा वेळ तुम्ही आपल्या छंदासाठी द्याल.
वृषभ – नव्या कल्पनांची पारख करण्यासाठी आज योग्य दिवस आहे. अनेक आनंदाचे क्षण अनुभवता येतील. घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. प्रलंबित कामामुळे प्रचंड व्यग्र रहाल. त्यामुळे आराम करायला फुरसत मिळणार नाही.
मिथुन – एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. कार्यक्षेत्रात कुणाशीही फार जवळीक ठेऊ नका, कारण यामुळे तुमची बदनामी होऊ शकते. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्या स्पर्धेत यश मिळवून देईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
कर्क – पैसे मिळविण्याच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि त्या लाभदायक असतील. वाईट सवयी किंवा व्यसने सोडण्याचा केवळ विचार करू नका, तर त्यावर अंमलबजावणी करा. या निर्णयात जोडीदाराची मोलाची साथ मिळेल. कला, नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील, त्यांना आपली कला उत्कृष्टपणे दाखविता येईल.
सिंह – आरोग्य चांगले राहील. जवळची एखादी व्यक्ती मोठी रक्कम उधार मागू शकते, मात्र शक्यतो उधारी देणे टाळा. कार्यक्षेत्रात उत्तम काम करण्याची इच्छा असेल तर आपल्या कामात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करा. या सोबतच नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारा. मित्रांकडून सायंकाळी एखादा बाहेर भेटण्याचा बेत आखला जाईल.
हेही वाचा – जापनीज वाइफ… अजब प्रेम की गजब कहानी!
कन्या – आत्मविश्वास वाढेल, त्यामुळे प्रगती साधता येईल. कुटुंबातील समस्या सोडविण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करा आणि त्यात यशस्वी होईपर्यंत आपल्या प्लॅनिंगबद्दल कुणाला काही सांगू नका. वैवाहिक आयुष्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या कुरबुरी हळूहळू कमी होऊ लागतील.
तुळ – आयुष्यातील सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. दुःखाच्या, संकटाच्या प्रसंगी पैसाच तुमच्या कामी येईल, त्यामुळे विचारपूर्वक गुंतवणूक करा. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून आदर आणि सहकार्य मिळेल. काहीतरी नवीन शिकण्यासाठी हीच वेळ उत्तम आहे.
वृश्चिक – आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील, पण त्यासाठी भागीदाराकडून अनेकदा तीव्र विरोध सहन करावा लागेल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. आपल्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवा, त्यामुळे एकटेपणावर मात करता येईल. मित्र आणि शत्रू यांच्यातील फरक ओळखण्याची गरज आहे.
धनु – एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेला विषाद काढून टाका. त्यामुळे मनातील नकारात्मकता कमी होईल. गुंतणुकीबाबत घरातील ज्येष्ठांसोबत बोलण्याची आवश्यकता आहे. नको त्या गोष्टींच्या मागे उगाच धावू नका, सत्यस्थितीचा विचार करण्याचा प्रयत्न करा. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी व्यावसायिक संबंधांचा उपयोग करून घ्या.
मकर – भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर, शक्य तितक्या लवकर ती दूर करणे आवश्यक आहे. कारण, त्याचा तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना खूप विचारपूर्वक गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. अनोळखी व्यक्तींना चार हात लांब ठेवणेच उत्तम असेल.
कुंभ – मानसिक तणावावर मात करू शकाल. मित्रपरिवार आणि कुटुंबीयांबरोबर एखाद्या कार्यक्रमाला जाण्याचे आयोजन कराल. प्रेमात असणाऱ्या जातकांना अपेक्षाभंगाचे दुःख सहन करावे लागेल. मोबाइल किंवा टीव्हीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ विद्यार्थी घालवतील, त्याकडे लक्ष द्या. अतिखर्चिक स्वभावामुळे जोडीदाराशी मतभेद होतील.
हेही वाचा – चंदन आणि कोळसा…
मीन – व्यवसायात आज होणारा नफा बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. स्पर्धात्मक परीक्षेला बसणाऱ्यांनी शांत मनाने परीक्षेला जावे. तुमचे प्रयत्न निश्चितपणे सकारात्मक निकाल मिळवून देतील. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी समाजापासून दूर होऊन आपले आवडते काम केले पाहिजे, असे करण्याने सकारात्मक बदल होतील.
दिनविशेष
जागतिक दर्जाच्या वेशभूषाकार भानू अथैया
टीम अवांतर
जागतिक दर्जाच्या वेशभूषाकार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भानू अथैया यांचा जन्म 28 एप्रिल 1929 रोजी कोल्हापूर येथे झाला. शांताबाई आणि अण्णासाहेब राजोपाध्ये या दाम्पत्याच्या सात अपत्यांमधील तिसरी कन्या म्हणजे भानुमती. अण्णासाहेब हे स्वतः उत्तम चित्रकार होते. भानुमतींनाही रेखाचित्रे काढण्याची आवड होती. त्यांच्या आईवडिलांनी ही कला विकसित करण्यासाठी त्यांना उत्तेजन दिले. त्यांनी तिला मुंबईला जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेमध्ये दाखल केले. तेथून आपला अभ्यासक्रम पूर्ण करून त्या सुवर्णपदक घेऊन बाहेर पडल्या. कुशाग्र बुद्धिमत्ता, अपार कष्ट करण्याची तयारी, तीव्र स्मरणशक्ती, खूप काळ एकाग्र राहाण्याची क्षमता आणि अभिजात कलेवरील मनस्वी प्रेम या गुणांमुळे त्या यशस्वीपणे काम करू लागल्या. अगदी सुरुवातीला त्यांनी लोकप्रिय मासिकांतून फॅशन सल्लागार म्हणून काम केले. त्यांनी तयार केलेली वस्त्रप्रावरणे चोखंदळ रसिकांना आवडू लागली. नंतर त्यांनी एका बुटिकमध्ये आधुनिक कपड्यांची निर्मिती सुरू केली. लवकरच उच्चभ्रू मंडळींत त्यांच्या निर्मितीची मागणी वाढली. गीतकार आणि कवी सत्येंद्र अथैया यांच्याशी भानू यांचा विवाह झाला होता. ‘श्री 420’ या चित्रपटामधील नादिरा यांच्या ‘मुड मुड के ना देख मुड मुड के…’ या नृत्यातील वेशभूषेमुळे भानू यांना खूप प्रसिद्धी मिळाली. 1956 मध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांनी भानू अथैया यांना सीआयडी या चित्रपटासाठी वेशभूषा करण्याची संधी दिली. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यातील भानूंनी तयार केलेल्या, भूमिकांना उठाव देणाऱ्या वेशभूषेचा खूप बोलबाला झाला. पुढे यातच त्यांची कारकीर्द झाली. शंभराहून जास्त चित्रपटांचा कपडेपट त्यांनी डिझाईन केला. गुरुदत्त यांचे सर्व चित्रपट, राज कपूर, यश चोप्रा, आशुतोष गोवारीकर, रिचर्ड अटेनबरो, कॉनरेड रुक्स यांच्यासारख्या नामवंत दिग्दर्शकांबरोबर मनाप्रमाणे काम करायची संधी त्यांना मिळाली. रिचर्ड अटेनबरो यांच्या महत्त्वाकांक्षी ‘गांधी’ चित्रपटाचा कपडेपट तयार करण्याचे काम भानू अथैया यांना मिळाले. या चित्रपटातील वेशभूषेकरिता भानू अथैया यांना जॉन मोलो यांच्याबरोबर सर्वोत्कृष्ट वेशभूषाकाराचा 1982 सालचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. भारतासाठी पहिले ऑस्कर मिळवणाऱ्या त्या स्त्री विजेत्या आहेत. सुमारे पन्नास वर्षे भारतीय चित्रसृष्टीकरिता त्यांनी वेशभूषाकाराचे काम केले. त्यांनी मुमताज, वैजयंतीमाला, साधना यांच्यासारख्या अभिनेत्रींसाठी डिझाईन केलेल्या साड्या आणि इतर कपडे जनसामान्यांत लोकप्रिय झाले. काही नाटके आणि दूरदर्शन मालिकांचा कपडेपटही त्यांनी तयार केला. 15 ऑक्टोबर 2020 रोजी प्रदीर्घ आजाराने मुंबईत त्यांचे निधन झाले.


