दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 15 जुलै 2025, वार : मंगळवार
भारतीय सौर : 24 आषाढ शके 1947, तिथि : पंचमी 22:39, नक्षत्र : शततारका 06:25, पू. भाद्रपदा 29:46
योग : सौभाग्य 14:11, करण : कौलव 11:21
सूर्य : मिथुन, चंद्र : कुंभ 23:57, सूर्योदय : 06:09, सूर्यास्त : 19:19
पक्ष : कृष्ण, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – पालकांच्या आशीर्वादाने आज कामात चांगले परिणाम मिळतील. तुमच्या वर्तनाचा आणि कृतींचा इतरांवर सकारात्मक परिणाम होईल. एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर व्यवसायाशी संबंधित अनुभवी लोकांचा सल्ला नक्की घ्या. पैशाशी संबंधित कोणतेही जुने व्यवहार आज फायदेशीर ठरू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ – वैवाहिक जीवनात गोडवा राहील, ज्यामुळे मन आनंदी असेल. नोकरीत परिस्थिती सामान्य राहील. व्यावसायिक कामे थोडी मंदगतीने होतील, परंतु परिस्थिती पाहता संयम राखणे योग्य ठरेल. घरगुती वस्तू खरेदी कराल. मात्र विचारपूर्वक खर्च करा. मुलांच्या समस्यांसाठी तुमचे सहकार्य दिशादर्शक ठरेल. अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल.
मिथुन – नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. मनातील गोंधळ दूर होईल, त्यामुळे मन हलके होईल. आर्थिक घडामोडींवर लक्ष केंद्रित करा. खर्च मर्यादित करा. अनावश्यक बाबींमध्ये हस्तक्षेप करणे टाळा. एखाद्या मित्राला आर्थिक मदतीची गरज भासू शकते. मात्र व्यवहारात सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांना जुन्या शंका दूर करण्याची संधी मिळेल. त्यामुळे अभ्यासात मन लागेल.
कर्क – रोजची कामे व्यवस्थित केल्याने ती वेळेत पूर्ण होतील. कामावर लक्ष केंद्रित करणे भविष्यात फायदेशीर ठरेल. व्यावसायिकांना एखाद्या कंपनीशी भागीदारी करण्याची संधी मिळेल. नवीन प्रकल्पांवर काम सुरू होईल. आर्थिक बाबींमध्ये निर्णय हुशारीने घ्या. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला पाहिजे, तरच कठीण विषयातील रुची वाढेल.
सिंह – वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कार्यालयात एखादी नवीन जबाबदारी सोपवली जाईल. व्यवसायाच्या दृष्टीने नवीन करार होऊ शकतो. राजकीय संबंधांचा देखील फायदा होईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस असेल, शंका दूर करण्याची संधी मिळेल.
कन्या – नोकरीत कामाचा ताण राहील. सहकाऱ्यांशी सलोख्याने वागा. व्यवसायात यश मिळाल्याने पालक आनंदी होतील. उधळपट्टी टाळा. गरजांना प्राधान्य द्या. कुटुंबात सुसंवाद राखणे महत्त्वाचे आहे. एखादा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी भावंडे किंवा शिक्षकाची मदत घ्यावी.
हेही वाचा – आकाशातील चित्रा आणि स्वाती नक्षत्र
तुळ – दिवस प्रगतीचा राहील. नोकरदारांना त्यांच्या कामात भरघोस यश मिळेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरामदायी वस्तूंच्या खरेदीवर खर्च कराल. तुमच्या सल्ल्याचा मुलांना फायदा होईल. त्यामुळे नातेसंबंधांमध्ये प्रेम वाढेल. कुटुंबासमवेत वेळ घालवल्याने आनंद मिळेल.
वृश्चिक – कामे वेळेवर पूर्ण होतील. समाजात तुमची प्रतिमा सुधारेल. आज व्यवसायात नफ्याची स्थिती असू शकते. कुटुंबासाठी पैसा खर्च करावा लागेल. शिक्षकांसाठी व्यग्र दिवस असेल. मात्र जोडीदाराची घरकामात मदत मिळेल. त्यामुळे परस्पर संबंध अधिक दृढ होतील. पाहुणे येण्याची शक्यता आहे.
धनु – नोकरदार जातकांना अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल. नवीन योजना सुरू करता येईल. अनेक काळापासून भेडसावत असलेल्या आर्थिक समस्येचे निराकरण होऊ शकते. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक संबंध मधुर असतील. जोडीदारासोबत बाहेर जाण्याची संधी मिळेल.
मकर – परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. सकारात्मक विचारांनी केलेले काम यशस्वी होईल. मालमत्तेशी संबंधित व्यवहार फायदेशीर ठरू शकतात. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केल्यास यश मिळाले. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. महिला घरगुती कामात व्यग्र असतील.
कुंभ – अतिरिक्त जबाबदाऱ्या पूर्ण कराल. त्यामुळे समाजात ओळख वाढेल. फॅशन डिझायनिंगशी संबंधित जातकांना दिवस फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत राहील. एखाद्या जुन्या मित्राशी बोलणे होईल. विद्यार्थ्यांचा अभ्यासात रस वाढेल.
मीन – कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकारी यांच्यात चांगला समन्वय साधाल. मार्केटिंगच्या क्षेत्रातील जातकांना यश मिळेल. व्यवसाय पुढे नेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पैशांशी संबंधित समस्या सोडवता येतील. जोडीदाराकडून भावनिक पाठबळ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल.
दिनविशेष
गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर
टीम अवांतर
हिंदुस्थानी संगीतातील जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका मोगूबाई कुर्डीकर यांचा जन्म 15 जुलै 1904 रोजी गोव्यातील कुर्डी येथे झाला. मोगूबाई नऊ वर्षांच्या असताना त्यांच्या मातोश्री आणि गायिका जयश्रीबाई यांनी गोव्याच्याच चंद्रेश्वर भूतनाथ संगीत नाटक मंडळीत प्रवेश केला. भक्त ध्रुव, भक्त प्रल्हाद इत्यादी नाटकांमधील मोगूबाईंची कामे आणि गाणी त्याकाळी गाजली. तिथेच प्रख्यात तबलावादक लयभास्कर खाप्रूमामा पर्वतकर यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि त्यांनी मोगूबाईंना शास्त्रीय संगीताचे सुरुवातीचे धडे दिले. 1917 ते 1919 या काळात मोगूबाई, सातारकर स्त्री नाटक मंडळीत होत्या. तिथे शारदा, सुभद्रा, किंकिणी अशा यशस्वी भूमिका त्यांनी केल्या. 1919मध्ये मोगूबाई सांगलीत आल्या. मोगूबाईंची त्या वयातील गाण्याची तयारी आणि समज पाहून जयपूर घराण्याचे ख्यातनाम गायक अल्लादिया खाँ यांनी त्यांना तालीम सुरू केली. दोन वर्षांची ही तालीम नंतर खंडित झाल्याने आग्रा घराण्याचे बशीर खाँ आणि विलायत हुसेन खाँ यांची त्यांनी तालीम घेतली. 1927 ते 1932 या काळात अल्लादिया खाँसाहेबांनी आपले बंधू हैदर खाँ यांची तालीम मोगूबाईंना देवविली. अल्लादिया खाँसाहेबांनी 1934मध्ये गंडाबंधन करून मोगबाईंना तालीम सुरू केली, ती खाँसाहेबांच्या मृत्यूपर्यंत (1946), अधूनमधून व्यत्यय येत गेल्याने ही तालीम खंडित स्वरूपात दिली गेली. लयप्राधान्य हे मोगूबाईंच्या गाण्याचे खास वैशिष्ट्य असून, लयीचे अवघड प्रकारही त्या सहजतेने करून जात असत. मोगूबाईंना रसिकांकडून ‘गानतपस्विनी’ ही सन्मान्य उपाधी मिळाली. ख्यातनाम गायिका किशोरी आमोणकर या त्यांच्या कन्या आणि शिष्या होत. संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक (1968), पद्मभूषण (1974), गोव्याच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयात संगीत रिसर्च अकादमीचे पारितोषिक (1980) असे अनेक बहुमान त्यांना मिळाले. 10 फेब्रुवारी 2001 रोजी मोगूबाई यांचे मुंबई येथे निधन झाले.
हेही वाचा – नक्षत्र… मघा, फाल्गुनी, हस्त!