दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 14 डिसेंबर 2025; वार : रविवार
- भारतीय सौर : 23 अग्रहायण शके 1947; तिथि : दशमी 18:48; नक्षत्र : हस्त 08:17
- योग : सौभाग्य 11:44; करण : बव अहोरात्र
- सूर्य : वृश्चिक; चंद्र : कन्या 21:40; सूर्योदय : 07:01; सूर्यास्त : 18:02
- पक्ष : कृष्ण; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
समांतर चित्रपट चळवळीला नवी दिशा देणारे श्याम बेनेगल
टीम अवांतर
ख्यातनाम भारतीय दिग्दर्शक आणि पटकथाकार श्याम बेनेगल यांचा जन्म 14 डिसेंबर 1934 रोजी हैदराबाद मध्ये त्रिमुलागिरी येथे झाला. श्याम बेनेगल यांचे पूर्ण नाव श्यामसुंदर श्रीधर बेनेगल असे होते. लहानपणापासूनच श्याम बेनेगल यांना चित्रपट पाहण्याची खूप आवड होती आणि त्यांच्या या छंदाला कुटुंबीयांनी प्रोत्साहन दिले. बालवयातच त्यांनी चित्रपट क्षेत्राचा ध्यास घेतला. उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातून पदवी मिळवल्यानंतर ते मुंबईमध्ये लिंटास या मोठ्या जाहिरात कंपनीमध्ये कॉपीरायटर म्हणून काम करू लागले. त्यावेळी अनेक जाहिराती आणि लघुपट बनवताना चित्रपटाच्या तांत्रिक अंगांचा त्यांना भरपूर अनुभव मिळाला. 1962मध्ये त्यांनी गुजरात सरकारसाठी महिसागर धरणाची माहिती देणारा ‘घेर बेठा गंगा’ हा गुजराती भाषेतील पहिला लघुपट बनवला. त्यानंतर त्यांनी पुण्यातील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या केंद्रीय संस्थेत काही काळ शिकवले. त्यांनी या मान्यवर संस्थेचे अध्यक्षपदही भूषविले आहे.
हेही वाचा – बॅक स्टेज… हाच योग्य निर्णय!
त्यांनी 1974 मध्ये अंकुर हा त्यांचा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटात त्यांनी साध्या सरळ कथेतून ग्रामीण भारतातील जातीयता, वर्गवर्चस्व आणि स्त्री-पुरुष भेदाभेद अन् यामुळे निर्माण झालेली मानवी मनाची गुंतागुंत सादर करीत प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त केले. अंकुर चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असे तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. अंकुरनंतर आलेल्या निशांत (1975) आणि मंथन (1976) या चित्रपटांतूनही त्यांनी ग्रामीण सामाजिक जीवनाचा पट उलगडत वास्तववादी चित्रपट निर्माण करण्याचा आपला हेतू ठोसपणे मांडला. याचबरोबर बेनेगल यांनी आजपर्यंत चरणदास चोर, भूमिका, कोंदुरा/अनुग्रहम, जुनून, कलयुग, आरोहण, मंडी, त्रिकाल, सुसमन, अंतर्नाद, सूरज का सातवा घोडा, मम्मो, सरदारी बेगम, द मेकिंग ऑफ महात्मा, समर, हरीभरी, जुबेदा, नेताजी सुभाषचंद्र बोस, वेलकम टू सज्जनपूर, वेल डन अब्बा इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सत्यजित राय आणि मृणाल सेन या महान दिग्दर्शकांनी निर्माण केलेल्या समांतर चित्रपट चळवळीतून प्रेरणा घेत श्याम बेनेगल यांनी कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपट शैलीला एकत्र आणणारा एक वेगळा मध्यम मार्ग चोखाळला आणि थबकलेल्या समांतर चित्रपट चळवळीला नवी दिशा दाखवली.
2023 साली भारताच्या राष्ट्रीय फिल्म विकास निगम (एनएफडीसी) आणि बांगलादेशच्या फिल्म विकास निगम (बीएफडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित ‘मुजीब : द मेकिंग ऑफ अ नेशन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. हा चित्रपट बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान यांच्यावर आणि बांगलादेशाची निर्मिती यावर आधारित आहे.
चित्रपट निर्माण करण्यासाठी नेहमीच मोठ्या प्रमाणावर निधी उभा करावा लागतो. बेनेगल यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी चित्रपट निर्मितीसाठी लागणारा निधी गोळा करताना नेहमी चाकोरीबाहेरचा विचार केला. सध्या चित्रपट निर्माण करण्यासाठी जी ‘क्राऊड फंडिंग’ ही कल्पना प्रचलित आहे, ती त्यांनी 1976 सालीच मंथन या चित्रपटाच्या निर्मितीसाठी वापरली होती. त्यावेळी गुजरातमधील पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्येकी दोन रुपये वर्गणी काढून त्यांचीच गोष्ट सांगणारा हा चित्रपट निर्माण केला होता.
बेनेगल यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकावर आधारित भारत एक खोज नावाची 53 भागांची मालिका दूरदर्शनसाठी दिग्दर्शित केली. उच्च निर्मितीमूल्य असलेली ही मालिका बरीच लोकप्रिय झाली. श्याम बेनेगल यांच्या पत्नी नीरा या बेनेगल यांच्या काही चित्रपटांच्या निर्मात्या आहेत. तसेच त्यांनी बेनेगल यांच्या काही चित्रपटांची वेशभूषा देखील केली आहे. तर, मुलगी पिया बेनेगल या व्यावसायिक वेशभूषाकार आहेत.
हेही वाचा – ‘आशा’ला कानबाई देवीचा आशीर्वाद!
श्याम बेनेगल यांना 2005 साली भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच चित्रपटसृष्टीत वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ (1976) आणि ‘पद्मभूषण’ (1991) पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. 2018 सालच्या ‘मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये भारतातील माहितीपट चळवळीतील अमूल्य योगदानासाठी त्यांना ‘व्ही. शांताराम लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार’ देण्यात आला. श्याम बेनेगल यांचे 23 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 90व्या वर्षी मुंबईमध्ये निधन झाले.


