दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 13 जानेवारी 2026; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 23 पौष शके 1947; तिथि : दशमी 15:17; नक्षत्र : विशाखा 24:05
- योग : शूल 19:03; करण : बव 28:35
- सूर्य : धनु; चंद्र : तुळ 17:20; सूर्योदय : 07:14; सूर्यास्त : 18:18
- पक्ष : कृष्ण; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
भोगी
धनुर्मास समाप्ती
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कोणालाही मोठी आश्वासने देण्याचे टाळा. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी समन्वय राखल्याने फायदा होईल. तथापि, भावनांपेक्षा शहाणपणावर आधारावर निर्णय घ्यावे लागतील. सर्वांवर विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते.
वृषभ – नोकरदार जातक नवीन प्रकल्पांमध्ये व्यग्र राहतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा देखील होईल. घर आणि कुटुंबाशी संबंधित जबाबदाऱ्या देखील वाढू शकतात. अशा परिस्थितीत, अनुभवी व्यक्तीचा सल्ला खूप उपयुक्त ठरू शकतो. या काळात घाईघाईने निर्णय घेणे टाळा.
मिथुन – दिवस धावपळीचा असेल. प्रवासात एखाद्याला मदत करावी लागू शकते. कार्यालयीन काम आणि वैयक्तिक जीवन यात संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे असेल. या काळात काही अडथळे येऊ शकतात. परंतु समजूतदारपणा आणि संवाद कठीण परिस्थितींवर मात करण्यास मदत करू शकतात. दिवसअखेरीस, अनेक गोष्टी तुमच्या बाजूने झाल्याचे दिसून येईल.
कर्क – महत्त्वाचे निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. घाईघाईने घेतलेला निर्णय नंतर समस्या निर्माण करू शकतो. कामाच्या ठिकाणी शांत चित्ताने काम करणे फायदेशीर ठरेल. तुमचे विचार इतरांनी ओळखावेत, अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा ते त्यांच्याशी शेअर करणे हिताचे ठरेल. इतरांच्या कल्याणाचा विचार करण्यापूर्वी, स्वतःची परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे.
सिंह – सभोवतालच्या परिस्थितीकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. तुमच्या निर्णयांचा नोकरीच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामांवर परिणाम होऊ शकतो. एखादा प्रतिस्पर्धी तुमच्या योजनांवर लक्ष ठेवून असेल. म्हणून, प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचला. घाबरून जाण्याऐवजी, शांत मनाने निर्णय घ्या.
कन्या – एखाद्या प्रस्तावाबाबत निर्णय घ्यावा लागू शकतो. मात्र आज भावनांची कदर करा. त्यामुळे नंतर समस्या निर्माण होणार नाहीत. नोकरीच्या ठिकाणी काही बदल करावे लागू शकतात. हा निर्णय दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. गुंतवणुकीसाठी नवीन पद्धती वापरल्यास नफा मिळेल. भविष्यासाठी नियोजन करण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे.
तुळ – द्विधा मनस्थितीत सापडलात, तर तुमची भूमिका स्पष्ट करणे चांगले. नोकरीच्या ठिकाणी स्पष्ट संवाद फायदेशीर ठरेल. आज तुमच्या मर्यादा निश्चित करणे महत्त्वाचे आहे. कोणालाही तुमच्यावर अशा अपेक्षा लादू देऊ नका ज्या पूर्ण करणे तुम्हाला कठीण असतील. नातेसंबंध आणि काम यांच्यात संतुलन राखणे आव्हानात्मक असू शकते.
वृश्चिक – नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. सभोवतालच्या लोकांचा सल्ला आणि पाठिंबा उपयुक्त ठरेल. योजना पुढे ढकलण्याऐवजी त्यावर कृती करा. विचारपूर्वक घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल. आज केलेले प्रयत्न भविष्यासाठी एक मजबूत पाया रचू शकतात.
धनु – कामाच्या ठिकाणी थोडीशी तत्परता दाखवणे फायदेशीर ठरेल. निष्काळजीपणा किंवा आळसामुळे नुकसान होऊ शकते. याचा अर्थ, ज्या संधीची वाट पाहत आहात ती गमावू शकता. म्हणून, निर्णय घेण्यास उशीर करू नका. तुमच्या प्राधान्यांनुसार कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. विचारपूर्वक घेतलेला निर्णय तुम्हाला पुढे जाण्याची संधी देऊ शकतो.
हेही वाचा – न्याहारी… लेकीच्या हातची सुखावणारी!
मकर – जुनी आश्वासने पूर्ण करण्याची चांगली संधी मिळू शकते. एखादे काम बऱ्याच काळापासून पुढे ढकलत असाल, तर ते आजच पूर्ण करणे शहाणपणाचे आहे; जितका जास्त विलंब कराल तितक्या जास्त अडचणी नंतर निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. कठोर परिश्रम तुमचे भविष्य सोपे करतील.
कुंभ – दिनचर्येत बऱ्याच काळानंतर बदल होऊ शकतात. नवीन पद किंवा जबाबदारी देण्यात आली तर ती स्वीकारण्यास अजिबात संकोच करू नका. ही संधी प्रगतीचा मार्ग मोकळा करू शकते. सुरुवातीला तुम्हाला याचा ताण जाणवू शकतो, परंतु हळूहळू तुम्हाला या भूमिकेत आत्मविश्वास येईल. वरिष्ठांचा विश्वासही तुमचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी कारणीभूत ठरेल.
मीन – एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. लोकांमधील तुमची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेईल. मात्र तिथे दिखावा टाळणेच चांगले. तुमच्या व्यक्तिमत्त्वावर आणि कामावर विश्वास ठेवा. तुमची नम्रता आणि समजूतदारपणा तुम्हाला कामाच्या ठिकाणी वेगळे ठरवेल.
दिनविशेष
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा
टीम अवांतर
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म 13 जानेवारी 1949 रोजी पटियाला येथे झाला. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत 1966 साली ते विद्यार्थी म्हणून दाखल झाले. 1971 च्या बांगलादेश मुक्तियुद्धाच्या वेळी ते भारतीय एअर फोर्समध्ये विंग कमांडर होते. वयाची 23 वर्षे पूर्ण करण्यापूर्वीच त्यांनी मिग-21 या फायटर जेटमधून 21 वेळा उड्डाण केलं होतं. मिग व्हेरिएंट एचएस –748, कॅनबेरा, हंटर, कॅरिबू, इसकारा, किरण, अजित, मरुत आणि एचपीटी – 32 आदी विविध प्रकारच्या विमानांच्या उड्डाणांचा 1 हजार 600 तासांचा अनुभव त्यांच्या नावावर नोंदविला गेला आहे.
1982 साली त्यांची अंतराळ यात्रेसाठी निवड झाली. इस्रो आणि सोव्हिएत संघ (रशिया) यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत सोयूज टी-11 या यानातून ते 3 एप्रिल 1984 रोजी अंतराळात पोहोचले होते. अंतराळात पोहोचणारे पहिले भारतीय होण्याचा मान त्यांना मिळाला होता. सुमारे आठ दिवस ते अंतराळात होते.
हेही वाचा – सूरजच्या आयुष्यात नवा ‘उष:काल’!
सोयूज टी-11 मधील क्रू सोबत एका जॉइंट कॉन्फरन्समध्ये भारताने पहिल्यांदाच अंतराळातील आपल्या अंतराळवीरासोबत गप्पा मारल्या होत्या. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विचारलं होतं की, अंतराळातून भारत कसा दिसतोय? यावेळी उत्तर देताना राकेश शर्मा म्हणाले होते, ‘सारे जहाँ से अच्छा..’!. त्यांचे हे उद्गार त्यावेळी प्रचंड गाजले होते.
राकेश शर्मा हे सध्या कुन्नूर नावाच्या एका छोट्या गावात आपल्या पत्नीसोबत राहतात. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर अगदी साधं आयुष्य ते जगत आहेत. मात्र अंतराळ मोहिमांपासून ते नक्कीच दूर झाले नाहीयेत. ते सध्या इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी सल्लागार म्हणून मदत करत आहेत. गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदाच आपले अंतराळवीर स्वतः पाठवणार आहेत.
एरॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे ते सन्माननीय सदस्य असून इंडियन रॉकेट सोसायटीचे ते सदस्य आहेत. अशोक चक्र, ऑर्डर ऑफ लेनिन हा रशियाचा सर्वोच्च पुरस्कार, हीरो ऑफ सोव्हिएट युनियन आणि गोल्ड स्टार पदक आदी बहुमानांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.


