दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 12 ऑक्टोबर 2025; वार : रविवार
- भारतीय सौर : 20 आश्विन शके 1947; तिथि : षष्ठी 14:16; नक्षत्र : मृगशीर्ष 13:36
- योग : वरियान 10:54; करण : विष्टी 25:15
- सूर्य : कन्या; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:31; सूर्यास्त : 18:19
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – रणांगण… काळाची बंधने नाकारणारी साहित्यकृती
दिनविशेष
कवयित्री, गीतकार शांता शेळके
टीम अवांतर
मराठीतील ख्यातनाम लेखिका, कवयित्री, अनुवादक आणि गीतकार शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे झाला. लहानपणी आजोळी गेल्यावर विविध पारंपरिक गीते, ओव्या, श्लोक शांताबाईंच्या कानावर पडत. त्यामुळे कवितेची आवड, वाचनाची आवड, त्या संस्कारक्षम वयात त्यांच्यात रूजत गेली. बी.ए. झाल्याबरोबर ‘मुक्ता आणि इतर गोष्टी’ नावाचा त्यांचा एक कथासंग्रहही प्रसिद्ध झाला. याला प्रा. श्री. म. माटे यांनी प्रस्तावना लिहिली. एम्.ए. झाल्यावर सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या समीक्षक मासिकात, नंतर नवयुग या अत्रे यांच्या साप्ताहिकात आणि दैनिक मराठात दोन-तीन वर्षे काम केले. विविध प्रकारच्या लेखनाच्या अनुभवाची शिदोरी त्यांना येथे मिळाली. कविता, गीत, चित्रपटगीत, कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारात शांताबाईंची जवळपास शंभर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. धूळपाटी हे त्यांचे आत्मपर लेखनही प्रसिद्ध झाले आहे. विविध साहित्यप्रकारात विहार करूनही त्यांच पहिलं आणि खरं प्रेम राहिलं ते कवितेवरच. हळूवार भावकवितेपासून नाट्यगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते, चित्रपटगीते, प्रासंगिक गीते अशा विविध रूपातून त्यांची कविता आपल्याला भेटत असते. ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ यासारख्या लावणी लिहिणाऱ्या शांताबाई, या मराठीतील पहिल्या स्त्री लावणीकार ठरल्या. वृत्तबद्ध कविता जशी त्यांनी लिहिली, तेवढ्याच सहजतेने त्यांनी गीते, बालगीते, सुनीते आणि मुक्तछंद रचनाही केल्या. ग. दि. माडगूळकरांप्रमाणेच उत्कृष्ट भावानुकूल चित्रपट गीते लिहिणारी गीतलेखिका म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. गरजेनुसार, मागणीनुसार भालजी पेंढारकर, दिनकर द. पाटील, लता मंगेशकर, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, सलील चौधरी यांच्यासारख्या अनेक संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी चालीबरहुकूम अशी अनेक गीते लिहिली. याशिवाय जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या ‘वासवदत्ता’ आणि ‘हे बंध रेशमाचे’ या दोन्ही नाटकांसाठीही शांताबाईंनी गाणी लिहिली. सौंदर्यदृष्टी, रसिकता, मानवी मनोभूमिका आणि सहजता ही शांता शेळके यांच्या साहित्याची वैशिष्टे होत. अवतीभवतीचा सामाजिक, सांस्कृतिक अवकाश त्यांनी याच सौंदर्यदृष्टीतून आणि सहजतेतून अभिव्यक्त केला आहे. डेक्कन बालमित्र मंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचा कुसुमाग्रज पुरस्कार, ग. दि. माडगुळकर पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना लाभले आहेत. त्याबरोबरच 1996 मध्ये आळंदी येथे भरलेल्या 69 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 6 जून 2002 रोजी त्यांचे निधन झाले.
हेही वाचा – तो डंख कुरवाळला अन्…


