दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 11 ऑक्टोबर 2025; वार : शनिवार
- भारतीय सौर : 19 आश्विन शके 1947; तिथि : पंचमी 16.43; नक्षत्र : रोहिणी 15:19
- योग : व्यतिपात 14:06; करण : गरज 27:26
- सूर्य : कन्या; चंद्र : वृषभ 26:24; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:20
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस शुभ राहील. तुमच्या प्रयत्नांना सगळ्याच आघाड्यांवर यश मिळेल. त्यामुळे मानसिक ताण कमी होईल. आर्थिक बाबी अनुकूल असतील. एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. जोडीदार किंवा संततीकडून एखादी चांगली बातमी मिळेल. मात्र आज सावधगिरी बाळगा, दुखापत होण्याची शक्यता आहे.
वृषभ – प्रलंबित कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी यश आणि प्रसिद्धी मिळेल. मात्र त्याचवेळी संघर्ष होण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे संयम बाळगा. घरात आनंदी आणि शांत वातावरण असेल. नातेवाईकांशी चांगले संबंध निर्माण होतील. आरोग्य चांगले राहील. व्यवसाय रणनीती प्रभावी ठरेल. आर्थिक लाभ थोडा कमी होईल, परंतु स्थिरता राहील.
मिथुन – अध्यात्माकडे कल राहील. ध्यान आणि आध्यात्मिक साधना मनाला शांती देईल. गुप्त गोष्टींमध्ये किंवा गूढ ज्ञानात आवड वाढेल. अहंकार टाळा, बोलण्यावर संयम ठेवा. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस योग्य नाही. आरोग्य चांगले राहील.
कर्क – सकाळचा अर्धा दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो. गाडी चालवताना काळजी घ्या. सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही कामाला उशीर होईल. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. खर्च वाढतील, ज्याचा बजेटवर परिणाम होऊ शकतो.
सिंह – घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. यश निश्चित आहे, पण त्यासाठी संयम बाळगणे आवश्यक असेल. तुमच्या स्पर्धकांना मात देता येईल. आर्थिक लाभ आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून तुम्हाला फारसा पाठिंबा मिळणार नाही. शारीरिक आणि मानसिक आरोग्याला असणारे धोके टाळा.
हेही वाचा – पंचनामा : …अन् गावकरी बनले चेष्टेचा विषय!
कन्या – दिवसाची सुरुवात चिंता आणि अतिथकव्याने होईल. डोकेदुखी किंवा शरीरदुखीचा अनुभव येऊ शकेल. नवीन प्रकल्पांसाठी दिवस चांगला आहे, परंतु खर्च वाढू शकतो. कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नका. संयम बाळगा. घरात थोडासा तणाव असू शकतो. मात्र रात्रीपर्यंत तो कमी होईल.
तुळ – काहीतरी नवीन करण्याचा विचार करू शकता, परंतु सुरुवातीला निराशा पदरी पडण्याची शक्यता आहे. पालकांशी मतभेद किंवा आरोग्याच्या दृष्टीने काही समस्या उद्भवण्याचा धोका संभवतो. कागदपत्रांबाबत काळजी घ्या. पाणी आणि उंच ठिकाणांपासून दूर रहा. भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका.
वृश्चिक – हट्टी स्वभाव आणि अनियंत्रित बोलणे यामुळे नातेसंबंधांमध्ये ताण येऊ शकतो. मानसिक गोंधळाचा परिणाम कामावर होईल. धीर धरा आणि नंतर निर्णय घ्या. शांतता आणि संयम राखणे आवश्यक आहे.
धनु – नशीब तुमच्या बाजूने असेल. नोकरीत किंवा व्यवसायात यश, बढती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मनाला शांती देतील. संध्याकाळी थकवा जाणवू शकतो. भावनांमध्ये वाहून जाऊन इतरांसोबत गुपिते शेअर करू नका.
मकर – कुटुंब आणि वैवाहिक जीवनात शांती राहील. छोटीशी सहल किंवा प्रवासाचा योग आहे. आरोग्य चांगले राहील. आर्थिक लाभ आणि सन्मान मिळेल. प्रियजनांकडून चांगली बातमी मिळू शकेल.
कुंभ – दिवसाची सुरुवात उत्साहात आणि आनंदाने होईल. कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कठोर परिश्रम आर्थिक लाभ मिळवून देतील. आज एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
हेही वाचा – मायेचा रहाट…
मीन – नकारात्मक विचार टाळा. कारण मानसिक ताण आणि त्याच्याशी संबंधित आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी योग्य प्रकारे समन्वय ठेवा. संततीबद्दलच्या चिंता वाढतील. महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळा.
दिनविशेष
पद्मश्री डॉ. विजय भटकर
टीम अवांतर
भारतात पहिल्या संगणकाचा ‘परम’ चा आविष्कार करणारे डॉ. विजय भटकर यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1946 रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे झाला. त्यांनी नागपूर येथील सर विश्वेश्वरय्या रिजनल इंजिनीअरिंग कॉलेज येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी वडोदरा येथील विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आयआयटी, दिल्ली येथून पी.एचडी. प्राप्त केली. 1968 साली विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना झाली. त्या कमिशनवर भटकरांनी दहा वर्षे काम केले. याशिवाय, इंदिरा गांधींनी ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार’ साठी 1972 साली स्थापन केलेल्या महत्त्वाच्या समितीचे ते सदस्य होते. त्यांनी त्रिवेंद्रममध्ये इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट या भारतातील सर्वात मोठ्या प्रयोगशाळेची स्थापना केली. डॉ. विजय भटकर यांचे संगणक क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्वाचं असं आहे. पुणे विद्यापीठाच्याच आवारात या वैज्ञानिकानं सी-डॅक म्हणजे ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड् कॉम्प्युटिंग’ या नावाची आंतरराष्ट्रीय मान्यता पावलेली संस्था विकसित केली. ‘परम’ सुपर संगणक बनवणारा तसेच बहुभाषिक भाषांतर एकाच वेळी संगणाकाद्वारे करू शकणारं नवं तंत्र शोधून काढणारा वैज्ञानिक हीच डॉ. विजय भटकर यांची खरी ओळख बनली आहे. 1993 मध्ये डॉ. भटकर यांनी परम-800 तर 1998 मध्ये परम-1000 हे संगणक बनवले. प्रति सेकंद एक अब्ज गणिते करण्याची क्षमता हे परम संगणकाचे वैशिष्ट्य. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडतो. एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपान सोडता फक्त भारतात आहे. भटकरांनी इलेक्ट्रॉनिक्सची अनेक उपकरणे आणि प्रणाली विकसित केल्या. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण प्रणाली, उद्योगातील स्वयंचलित यंत्रणा, कोलकाता भुयारी रेल्वेची संगणकीय प्रणाली त्यांनी विकसित केल्या. घरातील एकाच वायरमधून आपल्याला फोन-टीव्ही आणि संगणक चालवता येतील, अशी ब्रॉडबँड प्रणाली विकसित केली. याखेरीज, शाळेपर्यंत न पोहोचणार्या मुलांसाठी ‘एज्युकेशन टू होम’ (ETH) ही संकल्पना मांडून त्यासाठी 1998-99 मध्ये ETH संशोधन शाळा सुरू केली. त्यांच्या सर्व कार्याची दखल घेत भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात तर महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचेही ते मानकरी ठरले . याशिवाय सन 2024 मध्ये त्यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला.


