दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 10 ऑक्टोबर 2025; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 18 आश्विन शके 1947; तिथि : चतुर्थी 19:38; नक्षत्र : कृत्तिका 17:31
- योग : सिद्धी 17:41; करण : बव 09:14, कौलव 30:07
- सूर्य : कन्या; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:21
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 08:53)
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस चांगला असेल. काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन उपक्रम सुरू करू शकाल. व्यवसाय फायदेशीर राहील. आर्थिक स्थिती मजबूत असेल. कुटुंबात शुभ घटना घडेल. आज आरोग्यही चांगले राहील.
वृषभ – एखाद्या नवीन प्रकल्पाची सुरूवात करू शकाल; व्यावसायिक भागीदारी फायदेशीर ठरेल. समाजातील आदर वाढेल. तुम्हाला एखाद्या खास कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल चिंता निर्माण होईल.
मिथुन – दिवसभरात अनावश्यक वाद टाळा. बोलण्यावर संयम ठेवा. अन्यथा, एखाद्या अडचणीत सापडू शकता. आज कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे टाळा. आर्थिक जोखीम घेण्यापासून दूर राहा. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद वाढू शकतात. स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या.
कर्क – आरोग्याची विशेष काळजी घ्या. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वडिलोपार्जित मालमत्तेवरून कौटुंबिक वाद उद्भवू शकतो. त्यामुळे सावध रहा. नवीन कामे विचारपूर्वक करा. एखाद्यावर जास्त विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते. काळजीपूर्वक वाहन चालवा.
सिंह – प्रलंबित कामे आज पूर्ण होतील, ज्यामुळे मनाला शांतता लाभेल. वरिष्ठांकडून कामाच्या ठिकाणी पाठिंबा मिळेल. प्रशासकीय क्षेत्रात असणाऱ्या जातकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांशी संपर्क होईल, संवाद साधता येईल. नवीन प्रकल्प सुरू करताना कुटुंबाकडून विशेष पाठिंबा मिळेल. जोडीदाराची तोलामोलाची साथ मिळेल.
हेही वाचा – मायेचा रहाट…
कन्या – आरोग्य चांगले राहील. मनही आनंदी असेल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता, ज्यामुळे तुम्हाला नफा होईल. मोठ्या व्यवसायात भागीदार होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही घेत असलेल्या प्रत्येक निर्णयाला कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. शुभ घटना घडण्याची शक्यता आहे.
तुळ – आरोग्याची विशेष काळजी घ्या. खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. फास्ट फूड आणि बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. कोणालाही मोठ्या प्रमाणात पैसे उधार देऊ नका. कारण ते पैसे कधीही परत मिळणार नाहीत. दीर्घकाळापासून व्यवसायात असलेल्या एखाद्या सहकाऱ्यामुळे नुकसान होऊ शकते. आजच्या दिवशी वादविवाद टाळा.
वृश्चिक – आरोग्यात बरेच चढउतार होतील. कामाच्या जास्त ताणामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवेल. एखाद्या कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागू शकतो. जवळच्या, प्रिय व्यक्तीशी वाद होऊ शकतो, कुटुंबातही मतभेद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
धनु – एखाद्या धार्मिक तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा योग येईल. त्यामुळे मन आनंदी असेल. घरातही एखादी शुभ घटना घडत. आज मन अध्यात्माकडे अधिक झुकलेले असेल. आरोग्यात चढ-उतार होईल. त्यामुळे काळजी घ्या. व्यवसायात एखादे नवीन काम तुमच्या वाट्याला येईल. आज नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता.
मकर – काही जातकांना कामानिमित्त देशाबाहेर प्रवास करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील वातावरण प्रेम आणि आपुलकीने भरलेले असेल. आज कुटुंबासह एखादा नवीन उपक्रम सुरू करू शकाल. व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. ज्यांच्याशी फार ओळख नाही अशा व्यक्तींना मोठी रक्कम कर्ज म्हणून देण्याचे टाळा.
कुंभ – स्वतःच्या आरोग्याबद्दल काळजी वाटेल, त्यामुळे मन अस्वस्थ राहील. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. वादविवाद टाळा, कारण यामुळे अपमान वाट्याला येऊ शकतो. व्यवसायात चढ-उतार येतील. कामात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे काळजी घ्या.
हेही वाचा – सुलू… हवी मायेची गुंतवणूक!
मीन – आज सावध रहा, वाहने काळजीपूर्वक वापरा. वादविवाद टाळा. कुटुंबातील किंवा समाजातील एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी तुमचा वाद होऊ शकतो. घरी एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे, मात्र आज आरोग्याची काळजी घ्या.
दिनविशेष
चीनची ‘काळी आई’ डॉ. द्वारकानाथ कोटणीस
टीम अवांतर
डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1910 रोजी सोलापूर येथे झाला. गिरणीत कारकून म्हणून काम करणाऱ्या शांताराम कोटणीस यांनी आपल्या मुलाला डॉक्टर केले. द्वारकानाथ सुरुवातीपासूनच सेवाभावी होते. ‘रुग्ण सेवा हीच ईश सेवा’ हे ब्रीद घेऊन डॉ. कोटणीसांनी सोलापूरकरांची सेवा सुरू केली. याच दरम्यान, जुलै 1937 मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले. त्याचे वृत्त संपूर्ण जगभर पसरले. त्यावेळी भारत आणि चीनचे मैत्रीपूर्ण संबंध होते. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडे चीनने मदत मागितली. नेहरूंनी पाच डॉक्टरांचे पथक चीनला पाठवले. त्यामध्ये सोलापूरचे डॉ. द्वारकानाथ कोटणीस होते. चीनच्या रणभूमीवर डॉ. कोटणीसांनी सैनिकांची सुश्रूषा सुरू केली. इकडे त्यांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले. वडिलांचे निधन झाले. तरीदेखील विचलित न होता, त्यांनी चिनी सैनिकांची सेवा सुरूच ठेवली. घनघोर लढाईत जखमी झालेल्या हजारो सैनिकांवर त्यांनी शस्त्रक्रिया केल्या. त्यांचे हे कार्य चीन सरकार आणि जनता जवळून पाहात होते. युद्ध संपले तरी कोटणीस चीनमध्ये राहिले. तिथे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या क्यो क्विंगलन या परिचारिकेशी त्यांनी प्रेमविवाह केला. त्यांना एक अपत्य झाले, त्याचे नाव त्यांनी ‘यीनहुआ’ ठेवले. यीन म्हणजे भारत आणि हुआ म्हणजे चीन अशी त्या नावाची फोड करून आपल्या मित्रमंडळींना सांगत असत. त्यांनी चीनच्या सरकारी रुग्णालयात प्रमुख म्हणून सेवा बजावली. त्याचवेळी प्लेगची साथ पसरायला सुरुवात झाली होती. मात्र प्लेगच्या लशीचा शोध लागला होता. अर्थात, त्याचे नेमके परिणाम काय होतात याची कोणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे डॉ. कोटणीस यांनी ती लस स्वतःला टोचून घेतली. स्वतःवर प्रयोग केले आणि मग इतरांना उपचार दिले. मात्र अतिश्रम, दूषित हवामान यामुळे त्यांची प्रकृती हळूहळू बिघडत गेली. त्यांना अपस्माराचे झटके येऊ लागले आणि अखेरीस 9 डिसेंबर 1942 रोजी त्यांनी वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. डॉ. कोटणीस यांनी केलेल्या अपूर्व कार्यामुळे चिनी लोक त्यांना देवदूत मानतात. जगातील 10 आंतरराष्ट्रीय व्यक्तींमध्ये चीनचा सच्चा मित्र म्हणून त्यांची गणना करण्यात आली आहे. सोलापुरकरदेखील त्यांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करतात. सोलापूर महानगरपालिकेने त्यांचे निवासस्थान सुशोभित करून आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित केले आहे. याशिवाय 1946 साली व्ही. शांताराम यांनी त्यांच्या आयुष्यावर ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’ हा चित्रपट काढला होता.



