दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 10 जानेवारी 2026; वार : शनिवार
- भारतीय सौर : 20 पौष शके 1947; तिथि : सप्तमी 08:23; नक्षत्र : हस्त 15:38
- योग : अतिगंड 16:57; करण : बालव 21:17
- सूर्य : धनु; चंद्र : कन्या 28:51; सूर्योदय : 07:13; सूर्यास्त : 18:16
- पक्ष : कृष्ण; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
कालाष्टमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कठोर परिश्रमांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. यामुळे कोणत्याही सक्रिय विरोधकांवर मात करण्यास मदत होईल. आज अनोळखी लोकांकडून पाठिंबा मिळू शकतो. मात्र अशा काही अनावश्यक समस्या उद्भवू शकतात, ज्या नफ्यावर परिणाम करतील. अध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
वृषभ – आज विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अतिउत्साह आणि घाई यामुळे अपयश येऊ शकते. काही आर्थिक आणि कौटुंबिक दबावांचा सामना करावा लागेल. दिवसाच्या पूर्वार्धात चांगली बातमी मिळू शकते. काही जुन्या मित्रांना भेटू शकता. जोडीदार आणि संतती यांच्याशी संवाद साधा, सकारात्मक प्रतिसाद मिळेल. तब्येतीकडे लक्ष द्या.
मिथुन – कुटुंबाकडे थोडे जास्त लक्ष द्यावे लागेल, कारण तिथे मतभेद किंवा संघर्ष होण्याची शक्यता आहे. शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि अनपेक्षित लाभ देखील मिळू शकेल. आर्थिक व्यवहारात मात्र सावधगिरी बाळगावी लागेल. तुमच्या कृतींना, विचारांना विरोध होऊ शकतो. सहकुंटुब सामाजिक कार्यात सहभागी होण्याने अधिक आनंद मिळेल.
कर्क – आजचा दिवस विशेष फायदे घेऊन येणारा आहे. मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. धनलाभामुळे बरेच आर्थिक प्रश्न सुटू शकतात. या काळात तुम्हाला दूरचा प्रवासही करावा लागू शकतो. मानसिक ताणामुळे मन अस्वस्थ असेल. दिवस संपण्यापूर्वी, काही अपूर्ण कामे प्राधान्याने करणे आवश्यक आहे.
सिंह – हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे मात्र महत्त्वाचे असेल. व्यवसाय आणि व्यापाराशी संबंधित नवीन अनुभव फायदेशीर ठरतील. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटल्यामुळे विविध घडामोडींची माहिती होईल, ज्याचा नजीकच्या काळात तुम्हालाच फायदा होईल.
कन्या – आज एखाद्या उत्सवात किंवा समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. दिवसभर तुम्हाला काही चांगल्या बातम्या मिळतील. ज्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त आहे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करा. आज संततीबद्दल थोडी अधिक काळजी वाटू शकते.
तुळ – आजचा दिवस कामात यश देणारा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दलचा आदर वाढेल आणि सर्व कामे एकामागून एक हातावेगळी केली जातील. पोटदुखी आणि डोळ्यांची जळजळ जाणवू शकते. या त्रासामुळे काम करणे अवघड जाईल. वेळीच औषधोपचार करा. काळाच्या बरोबरीने चालत राहिल्याने प्रगतीचे मार्ग खुले होतील.
वृश्चिक – गुंतागुंतीची कामे सहज पूर्ण होतील आणि या काळात नवीन तसेच फायदेशीर उपक्रम देखील सुरू होऊ शकतात. आरोग्य थोडेसे बिघडेल. मानसिक तणावामुळे डोकेदुखी होऊ शकते. एखाद्या सतर्क मित्रामुळे कुठल्या तरी मोठ्या समस्येत फसण्यापासून वाचू शकतात.
धनु – दिवसाच्या सुरुवातीला काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. वाहन किंवा घराशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला मित्रांकडून पाठिंबा मिळत राहील. नातेवाईकांकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. मात्र कुटुंबात अशांतता कायम राहू शकते. ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करावा लागेल. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य उंचावेल.
मकर – आजचा दिवस अत्यंत शुभ असेल. मालमत्तेबाबत सुरू असलेले कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मनोधैर्य वाढेल, कठोर परिश्रमाने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. या काळात तुम्हाला मित्रांकडूनही पाठिंबा मिळेल.
कुंभ – वादविवादात वेळ वाया घालवू नका. अनावश्यक संशयामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. नियोजित कार्यक्रम यशस्वी होतील आणि तुम्हाला आर्थिक लाभाच्या संधी देखील मिळतील. आज आई किंवा मामाकडून फायदा होण्याची शक्यता आहे. फारशी जवळीक नसलेल्या एखाद्या नातेवाईकाच्या अचानक आगमनाने कुटुंबातील अस्वस्थता वाढेल.
मीन – आजचा दिवस फायदेशीर ठरेल. खूप दिवसांपासून हव्या असलेल्या गोष्टी साध्य करण्यासाठी तुमची एखादी कृती अनुकूल ठरू शकते. अनेक कामांमधील गुंतागुंत संपत असल्याचे दिसून येईल. मतभिन्नता आणि दडपण यामुळे तुम्ही चिडचिडे आणि बैचेन व्हाल. पण आज विरोधकांवरही विजय मिळवाल.
दिनविशेष
प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. सी. आर. व्यास
टीम अवांतर
प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि संगीतज्ञ पं. चिंतामण रघुनाथ ऊर्फ सी. आर. व्यास यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1924 रोजी महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात झाला. त्यांच्या घराण्यात संस्कृत विद्वान आणि कीर्तनकारांची परंपरा होती. त्यांचे सुरुवातीचे संगीत शिक्षण किराणा घराण्याचे गायक पंडित गोविंदराव भातंब्रेकर यांच्याकडे सुरू झाले. सुमारे बारा वर्षे ही तालीम चालली. वयाच्या एकविसाव्या वर्षी ते मुंबईला आले. माटुंगा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी करताना ते ग्वाल्हेर घराण्याचे पंडित राजारामबुवा पराडकर यांच्याकडे गायन शिकू लागले. पुढे आग्रा घराण्याचे नामवंत गायक जगन्नाथबुवा पुरोहित (गुणीदास) यांच्या गायन कलेमुळे प्रभावित होऊन त्यांच्याकडूनही व्यास यांनी तालीम सुरू केली, जी जगन्नाथबुवांच्या निधनापर्यंत चालू होती. या बरोबरीनेच व्यास यांना श्रीकृष्ण रातंजनकर, चिदानंद नगरकर, के. जी. गिंडे, एस. सी. आर. भट यांच्याकडून देखील मार्गदर्शन मिळाले.
सी. आर. व्यास यांच्या गायकीवर किराणा, ग्वाल्हेर आणि आग्रा या तीनही घराण्यांचे संस्कार होते. याशिवाय त्यांनी खुल्या आणि मोकळ्या आवाजाची भावपूर्ण अशी एक स्वतंत्र वेगळी गायकी निर्माण केली. ‘गुणीजन’ या टोपणनावाने त्यांनी अनेक बंदिशी रचल्या. धनकोनी कल्याण, सगेरा, सुध-जोगिया, शिव-अभोगी, सुधरंजीनी अशा रागांची निर्मितीही त्यांनी केली. अभिजात शास्त्रीय संगीताच्या साधकांना व्यासपीठ मिळावे आणि त्याचा प्रसार व्हावा या हेतूने त्यांनी त्यांच्या गुरुंच्या स्मरणार्थ ‘गुणिदास संगीत संमेलना’ची सुरुवात केली.
हेही वाचा – जानेवारीत रंगणारी जंगी भरीत पार्टी… गोल्डन डेज ऑफ वरोरा!
सी. आर. व्यास यांना त्यांच्या सांगीतिक कार्यकर्तृत्वाबद्दल अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी काही महत्त्वाचे पुरस्कार म्हणजे संगीत नाटक अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, उस्ताद हाफीज अली पुरस्कार, महाराष्ट्र -मराठवाडा पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि मध्य प्रदेश सरकारचा मानाचा तानसेन पुरस्कार.
सी. आर. व्यास यांच्या बंदिशींचे पुस्तक ‘राग सरिता’ या नावाने प्रसिद्ध झाले. यात त्यांनी रचलेल्या नवीन रागांच्या समावेशासह त्यांनी रचलेल्या 121 बंदिशी आहेत. या पुस्तकाची सुधारित आवृत्ती 2019 मध्ये प्रकाशित झाली. यामध्ये त्यांच्या 32 नव्या बंदिशींचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या संगीताचा वारसा त्यांचे सुपुत्र सतीश (संतूर वादक) आणि सुहास (गायक) तसेच शिष्य प्रभाकर कारेकर, कुंदा वेलिंग, संजीव चिम्मलगी, अलका जोगळेकर आदींनी पुढे चालवला आहे. 10 जानेवारी 2002 रोजी सी. आर. व्यास यांचे कोलकाता येथे निधन झाले.


