दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 08 ऑक्टोबर 2025; वार : बुधवार
- भारतीय सौर : 16 आश्विन शके 1947; तिथि : द्वितीया 26:22; नक्षत्र : अश्विनी 22:45
- योग : हर्षण 25:32; करण : तैतिल 16:08
- सूर्य : कन्या; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:23
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी विचार आणि ऊर्जा यांचा योग्य वापर करा. विचार न करता खर्च करणे किती नुकसान करणारे असते याचा प्रत्यय येईल. व्यावसायिकांना व्यवसायाच्या निमित्ताने मनाविरुद्ध प्रवास करावा लागेल. या प्रवासामुळे मानसिक ताणही येऊ शकते. नोकरदार जातकांनी ऑफिसमध्ये फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे उत्तम.
वृषभ – आज शेअर मार्केटचा अचूक अंदाज लावता आला तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. फुरसतीचा वेळ हा निस्वार्थी कामासाठी द्या. त्यामुळे आपल्या आणि कुटुंबियांच्या आनंदात मोलाची भर पडेल. कोणत्याही व्यवसायासाठी भागीदार म्हणून पुढे जाऊ नका, भागीदारीत इतरच तुमचा फायदा घेतील. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा दिवस सर्वोत्तम असेल.
मिथुन – परदेशात एखादी गुंतवणूक असेल तर त्यातून चांगला लाभ होऊ शकतो. जोडीदाराशी झालेल्या भांडणामुळे मानसिक ताण वाढेल. मात्र अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही. तुमची कलात्मकता आणि सर्जनशीलता यामुळे एखादे कौतुकास्पद काम घडेल. विद्यार्थ्यांनी खेळण्यात इतके मग्न होऊ नका की, त्याचा परिणाम शिक्षणावर होईल.
कर्क – नव्या तंत्राचा आणि कौशल्यांचा वापर करिअरमधील प्रगतीसाठी गरजेचा आहे. प्रवास करण्याच्या दृष्टीने आज तुमची प्रकृती चांगली नाही त्यामुळे लांबचे प्रवास टाळा. भाऊ-बहिणीच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे. संततीमुळे एखादा अडचणीचा प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनावश्यक ताण दूर करून त्यांना पाठबळ द्या.
सिंह – सकारात्मक ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरा. एखाद्या पार्टीमध्ये तुमची भेट अशा व्यक्ती सोबत होऊ शकते जी आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी एखादा महत्त्वाचा सल्ला देऊ शकते. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस आहे. व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – तो डंख कुरवाळला अन्…
कन्या – प्रदीर्घ काळापासूनचे तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर करण्यासाठी जीवनशैली बदलण्याची गरज आहे आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. आज बऱ्याच आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. तुमच्या वर्चस्ववादी दृष्टिकोनामुळे सहकाऱ्यांकडून टीका होईल. दूरचे नातेवाईकांचे घरी येण्याची शक्यता आहे.
तुळ – आनंदाने परिपूर्ण असा चांगला दिवस. कोणाला पैसे उधार दिले असतील तर, ते परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. पण त्याचबरोबर अतिखर्चिक जीवनशैलीमुळे घरात तणावाचा प्रसंग निर्माण होऊ शकतो. आज उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल, मात्र त्यात अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका.
वृश्चिक – तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, गर्व यापासून मुक्त व्हाल. थकीत देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पांसाठी लागणारा निधी उभा करू शकाल. खर्चिक प्रकल्पाबाबतच्या कागदपत्रांवर सह्या करताना सुज्ञपणा दाखवा. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
धनु – करिअरविषयक संधी विस्तारण्यासाठी व्यावसायिक ताकद वापरा. इतरांपेक्षा वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वत:ला गुंतवून घ्या. आपले मत मांडताना उगाच भीती बाळगू नका, तुमच्या मताचे खूप कौतुक होऊ शकते. देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवून घ्याल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
मकर – तणावमुक्तीसाठी संततीसोबत वेळ घालवा. त्यामुळे पुन्हा नव्याने उभारी मिळाल्यासारखे वाटेल. एखाद्या मौल्यवान वस्तूंची चोरी होऊ शकते, त्यामुळे योग्य ती काळजी घ्या. अध्यात्मिक गुरू अथवा वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळेल. जोडीदारासोबत बालपणीच्या काही आठवणींना उजाळा मिळेल.
कुंभ – आजच्या दिवशी कामात प्रगती झालेली दिसून येईल. प्रवास फायदेशीर ठरेल. आयुष्य गृहीत धरून वागू नका, जीवनात योग्य काळजी घेणे गरजेचे असते, हे लक्षात असू द्या. मालमत्तेसंबंधित एखादा खटला सुरू असेल तर, त्यात विजय मिळू शकतो. धनलाभाचाही योग आहे. इतरांनी पूर्वी केलेल्या चुका माफ करून मानसिक आनंद मिळवाल.
हेही वाचा – प्रगल्भ जाणीवेचा ‘मदर्स डे’
मीन – दिवसाची सुरुवात योग साधनेने करा. असे करणे फायदेशीर असेल आणि संपूर्ण दिवस ऊर्जावान असाल. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे. त्यामुळे मिळणाऱ्या सर्व संधींचे सोने करा. काही जातकांना आज संततीच्या शिक्षणासाठी मोठा खर्च करावा लागू शकतो. एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी झालात तर नवीन मित्र भेटतील.
दिनविशेष
संपादक, लेखक शंकरराव किर्लोस्कर
टीम अवांतर
किर्लोस्कर मासिकाचे संस्थापक संपादक असणाऱ्या शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1891 रोजी सोलापूर येथे झाला. किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर हे त्यांचे काका होते. किर्लोस्कर कुटुंबीयांचे स्नेही असलेले चित्रकार श्रीपाद दामोदर सातवळेकरांमुळे लहान वयातील शंकररावांना चित्रकलेची गोडी लागली. त्यांनी लाहोरमध्ये श्रीपाद दामोदर सातवळेकरांकडे जाऊन रीतसर चित्रकला शिकायला सुरुवात केली. कालांतराने त्यांना मुंबईच्या सर जे.जे. कला विद्यालयात प्रवेशही मिळाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर, लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी स्थापलेल्या किर्लोस्करवाडी येथील किर्लोस्कर कारखान्याच्या जाहिरातींची सूत्रे त्यांनी सांभाळली. शंकरराव किर्लोस्कर यांनी सेल्स विषयाची पदवी घेतल्यावर आपल्या कारखान्याच्या उत्पादनांची जाहिरात करण्याच्या दृष्टीने 1920 साली त्यांनी ‘किर्लोस्कर खबर’ नावाने वृत्तपत्रिका सुरू केली. किर्लोस्कर कारखान्याच्या उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडामोडींचे वार्तांकन आणि गावातील लोकांनी लिहिलेल्या कथा-कविता असे या वृत्तपत्रिकेचे त्यावेळचे स्वरूप होते. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या सूचनेवरून त्यांनी ‘किर्लोस्कर खबर’ हे वृत्तपत्रिकेचे नाव बदलून ‘किर्लोस्कर’ असे नामकरण केले. पुढे किर्लोस्कर मासिकाच्या ‘स्त्री’, ‘मनोहर’ या भावंडांचाही जन्म झाला. त्याचे संपादकपदही शंकरराव किर्लोस्करांनी स्वीकारले. महाराष्ट्राच्या त्यावेळच्या नियतकालिकांच्या इतिहासात या मासिकांना विशेष प्रतिष्ठा लाभली ती शंकरराव किर्लोस्करांमुळेच. त्यांचे ‘यांत्रिक यात्रा’ हे पुस्तक खूप गाजले. शंकरराव किर्लोस्करांच्या शंवाकिनी या नावाने लिहिलेल्या आत्मचरित्रातून पाच दशकाच्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन स्पष्ट होते. याशिवाय ‘आत्मप्रभाव’, ‘टाकांच्या फेकी’, ‘यशस्वी धंद्याचा मार्ग’, ‘व्यापाराचे व्याकरण’ यासारखी पुस्तकेही त्यांनी लिहिली. ‘डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’च्या स्थापनेसाठी त्यांनी घेतलेला पुढाकार, ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’साठी त्यांनी केलेले कार्य, ‘कोयना धरण योजने’बाबत सरकारकडे केलेला पाठपुरावा यासारखे शंकररावांनी केलेले काम महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाला चालना देणारे ठरले. अशा या या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचे 1 जानेवारी 1975 रोजी निधन झाले.


