दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 07 ऑक्टोबर 2025; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 15 आश्विन शके 1947; तिथि : पौर्णिमा 09:17, प्रतिपदा 29:53; नक्षत्र : रेवती 25:28
- योग : ध्रुव 09:31, व्याघात 29:34; करण : बालव 19:37
- सूर्य : कन्या; चंद्र : मीन 25:28; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:23
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
नवान्न पौर्णिमा, कार्तिक स्नानारंभ
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. पैसा बऱ्याच गोष्टींवर खर्च होऊ शकतो, त्यामुळे चांगले बजेट प्लॅन करण्याची आवश्यकता आहे. कुटुंबात पैशांवरून वाद होऊ शकतात. त्यामुळे या संदर्भात कुटुंबातील सर्व लोकांसोबत स्पष्टपणे संवाद साधा. महत्त्वाचे व्यावसायिक करार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा.
वृषभ – जुन्या मित्रांबरोबर होणाऱ्या भेटीगाठी उत्साह द्विगुणित करतील. आज कामासाठी घरातून बाहेर पडताना खूप सकारात्मक असाल, मात्र एखाद्या किमती वस्तूच्या चोरीमुळे मूड खराब होऊ शकतो. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारीपासून दूर रहा. ज्या नात्याला महत्त्व देतात त्यासाठी वेळ देणेही आवश्यक आहे, हे लक्षात घ्या.
मिथुन – दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. याशिवाय, अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही. पण, तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्यावी, अन्यथा नंतर ते आक्षेप घेतील.
कर्क – एखाद्या अनपेक्षित परिस्थितीचा सामना करावा लागेल, मात्र त्यामुळे उदास होऊ नका. मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. कामाच्या ठिकाणी जे काही उत्तम करत आहात त्यासाठी कुटुंबाकडून मिळणारे सहकार्य कारणीभूत आहे, याची जाणीव होईल.
सिंह – जीवनाची गाडी चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा असेल तर, आज पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. कामातील दबावामुळे मानसिक अशांतता आणि चिंता वाढेल. आज मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांवर विचार करा. व्यग्र दिनचर्येतून स्वतःसाठी कसा वेळ काढता येईल, या दृष्टीने प्रयत्न करा.
हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : शाळा तसेच मुलांची स्वच्छता
कन्या – शक्य तेवढा वाद, संघर्ष टाळा, अन्यथा मानसिक शांततेवर परिणाम होईल. कमिशन, लाभांश किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. कामाच्या ठिकाणी अनुकूल असे वातावरण असेल. जी गोष्ट तुमच्यासाठी योग्य नाही त्यावर अधिक वेळ घालवाल. जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी आगळेवेगळे काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल.
तुळ – आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषकरून मद्यपान करत असाल तर ते टाळणे योग्य. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. आपले विचार योग्य आहेत, हे सिद्ध करण्यासाठी जोडीदारासोबत वादावादी होऊ शकते. मात्र जोडीदार समंजसपणा दाखवून तुम्हाला शांत करेल. व्यावसायिक विषय मार्गी लावण्यासाठी मित्रांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरेल.
वृश्चिक – लोन घेण्याचा विचार करत असाल आणि बऱ्याच दिवसांपासून याच कामात व्यग्र असाल तर, आज लोनचे काम पूर्ण होईल. परंपरागत संपत्तीचे तुम्ही उत्तराधिकारी होण्याची बातमी संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल. वेळेचा सदुपयोग करणे, आवश्यक आहे. याचा भविष्यात फायदा होईल. जोडीदाराकडून भक्कम पाठिंबा मिळेल.
धनु – आर्थिक परिस्थिती आणि अडचणी ताणतणावाचे कारण ठरतील. सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे अनेक योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने कामावर परिणाम होईल, पण ही वेळही व्यवस्थित निभावून न्याल.
मकर – वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही बदलणार आहे. इतरांच्या तुमच्याकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा असतील. कोणालाही शब्द देण्यापूर्वी त्याचा आपल्या कामावर परिणाम होत नाही ना, तसेच आपल्या उदार वागण्याचा कोणी गैरफायदा घेत नाही ना, हे पाहणे गरजेचे आहे. मुलांची उत्तम कामगिरी बघून मानसिक आनंद होईल.
कुंभ – आयुष्यातल्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच सध्याचा सर्वोत्तम उपाय असेल. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरणही आनंदी असेल. कार्यालयीन काम लवकर फत्ते होतील, कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही शंभर टक्के सहकार्य मिळेल. आज एखादी चांगली बातमी समजण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – प्रगल्भ जाणीवेचा ‘मदर्स डे’
मीन – महत्त्वाच्या व्यक्ती आज आर्थिक मदत द्यायला तयार असतील. रिकाम्या वेळेत असे काम कराल ज्याचा तुम्ही नेहमी विचार करत होतात परंतु, ते काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. जोडीदार आज खांद्याला खांदा लावून तुमच्या कामात मदत करेल. ध्यानधारणा आणि योगाचा फायदा होणार आहे.
दिनविशेष
आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक केशवसुत
टीम अवांतर
आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1866 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या गावी झाला. केशवसुतांनी विद्यार्थीदशेतच काव्यलेखनास आरंभ केला असला, तरी त्यांचा मुख्य काव्यरचनाकाल 1885 ते 1905 हाच होता. या काळातील त्यांच्या अंदाजे 135 कविता उपलब्ध आहेत. काव्यरत्नावली या मासिकाचे संपादक नारायण नरसिंह फडणीस यांच्या सूचनेवरून ‘केशवसुत’ या टोपणनावाचा त्यांनी स्वीकार केला. काव्य हे त्यांचे जीवनध्येय असल्याने स्वाभाविकपणेच त्यांनी काव्यरचनेच्या नव्या वाटा चोखाळल्या. इंग्रजी अभ्यासक्रमातून आणि वि. मो. महाजनींनी विविधज्ञानविस्तारातून प्रकाशित केलेल्या भाषांतरांवरून इंग्रजी स्वच्छंदतावादी काव्य त्यांना काहीसे परिचित झाले होते. त्यातूनच त्यांनी मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्माविष्काराचे नवे, क्रांतिकारक वळण दिले. केशवसुतांनी लिहिलेल्या कवितांपैकी, ‘स्फूर्ति’, ‘कवितेचे प्रयोजन’, ‘आम्ही कोण?’ आणि ‘प्रतिभा’ या कविता महत्त्वाच्या आहेत. भृंग’, ‘पुष्पाप्रत’ आणि ‘फुलपांखरूं’ या त्यांच्या काही महत्त्वाच्या निसर्गकविता जशा आहेत त्याचप्रमाणे प्रेमविषयक आत्मनिवेदन करणाऱ्या कविताही केशवसुतांनी लिहिल्या. ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’ आणि ‘गोफण केली छान’ या कवितांमधून त्यांच्या सामाजिक विचारसरणीची मुख्य तत्त्वे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि विशाल मानवतावाद बघायला मिळतात. गूढ अनुभूती आणि तिची नावीन्यपूर्ण अभिव्यक्ती असलेली ‘झपूर्झा’ ही त्यांची कविता विशेष गाजली. त्यांच्या अन्य गूढगुंजनात्मक कवितांत ‘म्हातारी’ आणि ‘हरपले श्रेय’ यांचा समावेश होतो. शैलीच्या द्दष्टीने केशवसुतांच्या काव्यात लालित्य कमी आणि काहीशी राकट, रांगडी अभिव्यक्ती बघायला मिळते. काव्याशिवाय एक नाटकही त्यांनी लिहिले होते पण ते अप्रसिद्ध आहे. काही इंग्रजी कविताही त्यांनी रचल्या होत्या. केशवसुतांचा काव्यसंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर हरि नारायण आपटे यांनी 1916 मध्ये प्रकाशित केला. गोविंदाग्रज, बालकवी, रेंदाळकर, सोनाळकर, काव्यविहारी यासारखे कवी स्वतःला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत. ‘तुतारी-मंडळ’ या नावाचे एक मंडळही स्थापन झाले होते. 7 नोव्हेंबर 1905 रोजी प्लेगच्या साथीत त्यांचे निधन झाले.
अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, Rashi Bhavishya


