दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 07 डिसेंबर 2025; वार : रविवार
- भारतीय सौर : 16 अग्रहायण शके 1947; तिथि : तृतीया 18:25; नक्षत्र : पुनर्वसू 28:11
- योग : शुक्ल 20:07; करण : वणिज, बव 07:50, 29:08
- सूर्य : वृश्चिक; चंद्र : मिथुन 22:38; सूर्योदय : 06:57; सूर्यास्त : 18:00
- पक्ष : कृष्ण; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 08:34)
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – निरामय मानसिक आरोग्य
दिनविशेष
अभिनेता, दिग्दर्शक विनय आपटे
टीम अवांतर
मुंबई दूरदर्शनच्या छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात करणारे ‘आपटे स्कूल’चे प्रणेते, अभिनेता, दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म 17 जून 1951 या दिवशी मुंबईत झाला. राज्य नाट्य स्पर्धेच्या ‘मॅन विदाऊट शॅडो’ या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. एकांकिकांपासूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. राज्य नाट्य स्पर्धेत सलग तीन वर्षं सर्वात्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. 1972 ला मुंबईत दूरदर्शनमध्ये निर्माता म्हणून त्यांनी पाऊल ठेवलं. यानंतर त्यांनी अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती केली. ‘नाटक’, ‘गजरा’, ‘युवावाणी’ या कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या लघुनाटिकाही तुफान गाजल्या. नाविन्यांची आस असणाऱ्या विनय आपटेंनी एका मालिकेचा शेवट हा प्रेक्षकांना विचारून केला होता. नाटक, मालिका, चित्रपट एवढ्यावरच मर्यादित न राहता त्यांनी अनेक जाहिरातींचे दिग्दर्शनही केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यवाहपदाचा कारभार त्यांनी अनेक वर्षे सांभाळला होता. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक त्यांनी नवोदित कलाकारांना घेऊन केलं होतं. त्यामुळेच रंगभूमीला आणि मराठी मनोरंजनसृष्टीला अभिनेते शरद पोंक्षे मिळाले. दृक-श्राव्य माध्यमांमध्ये स्वतःची जागा तयार करीत असताना त्यांनी आपल्या आवाजाच्या गुणवैशिष्ट्यांचाही नेमकेपणाने वापर केला. आपल्या तत्वांसाठी आग्रही असणाऱ्या त्यांना गुरुस्थानी मानणारे त्यांचे अनेक शिष्य केवळ चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर निरनिराळ्या क्षेत्रात विखुरलेले आहेत. त्यांच्या आवाजात भारदस्तपणा होता. 1984 च्या ‘आशियाई गेम्स’चं त्यांनी वृत्तांकन केलं तर, ‘गांधी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकरांचं नाटक म्हणजे एखाद्या रंगकर्मीसाठी नाटकाची कार्यशाळाच. तेंडुलकरांचे संवाद, त्यातले छुपे स्तर अचूक पकडणं हे दिग्दर्शकीय दृष्टीनंही मोठं आव्हान. शब्दफेक, आवाज आणि अभिनय या त्रिसूत्रीच्या जोरावर विनय आपटेंनी या नाटकातला तरल आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आणि आपल्या चतुरस्र प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. ‘गणरंग’ या स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून नाट्यनिर्माता आणि दूरचित्रवाणीच्या क्षेत्रात त्यांनी अनेक नवनवीन प्रयोग केले. महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुकन्या कुलकर्णी यांना व्यावसायिक नाटकांत आणि दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी प्रथम संधी दिली होती. ‘मित्राची गोष्ट’, ‘घनदाट’, ‘सवाल अंधाराचा’, ‘कुसुम मनोहर लेले’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय…’ ‘रानभूल’, ‘डॅडी आय लव्ह यू’, ‘तुमचा मुलगा करतो काय?’, ‘कबड्डी कबड्डी’ अशी एकापेक्षा एक नाटके त्यांनी केली. स्वतः उत्तम दिग्दर्शक असूनही अरुण नलावडे या सहकारी मित्राने दिग्दर्शित केलेल्या ‘रानभूल’ नाटकात त्यांनी अप्रतिम अभिनय साकारला. ‘खबरदार’, ‘लालबाग परळ’ यासारख्या मराठी तर, ‘सत्याग्रह’, आरक्षण, ‘ ‘धमाल’, ‘कॉर्पोरेट’, ‘टार्गेट’, ‘इट्स ब्रेकिंग न्यूज’, ‘चांदनी बार’, ’एक चालीस की लास्ट लोकल’ यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम करून आपलं स्थान निर्माण केलं होतं. टीव्ही मालिका क्षेत्रातही त्यांनी कमाल केली. ‘आभाळमाया’ ते ‘दुर्वा’पर्यंतच्या अनेक मालिकांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. एखादी भूमिका अत्यंत समरसून कशी करायला हवी? याचं उत्तम उदाहरण म्हणजे विनय आपटे. अशा या बहुआयामी कलाकाराचा झंझावात 7 डिसेंबर 2013 रोजी शांत झाला.
हेही वाचा – Ayurveda : दिनचर्या… स्नान ते शयन!


