दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 05 सप्टेंबर 2025; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 14 भाद्रपद शके 1947; तिथि : त्रयोदशी 27:12; नक्षत्र : श्रवण 23:37
- योग : शोभन 13:51; करण : कौलव 15:45
- सूर्य : सिंह; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:50
- पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
शिक्षक दिन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस चांगला जाईल. मित्रपरिवाराकडून मोठे सहकार्य मिळेल. दिनचर्या सुधारण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात नवीन पाहुण्यांच्या आगमनामुळे वातावरण आनंददायी असेल. आजूबाजूला असणाऱ्या विरोधकांच्या युक्त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रतिकूल परिस्थितीतही थोडा संयम ठेवावा लागेल. आज एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते.
वृषभ – आर्थिक समस्यांसाठी सहकाऱ्याची मदत घ्यावी लागेल. पालकांच्या आशीर्वादाने प्रलंबित काम पूर्ण होईल. कोणत्याही कायदेशीर प्रकरणापासून दूर राहणे उत्तम. बँकिंग क्षेत्रात काम करणारे जातक चांगल्या योजनेत गुंतवणूक करू शकतात. वडीलधाऱ्या व्यक्तीकडून एखादी जबाबदारी दिली जाईल, ती पूर्ण करण्यासाठी चालढकल करू नका.
मिथुन – व्यवसायात चांगले यश मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखादा जुना आजार डोकं वर काढण्याची शक्यता असल्याने ताण वाढेल. कामात जरा जास्तच व्यग्र रहाल, ज्यामुळे कौटुंबिक जीवनात समस्या वाढतील. नोकरीशी संबंधित कामासाठी कुठेतरी बाहेर जाण्याची संधी मिळू शकते.
कर्क – बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. आज जोडीदाराला कुठेतरी बाहेर घेऊन जाल. खूप दिवसांनी जुन्या मित्राची भेट होईल. संततीकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल. तुमचे काम आज तुम्हाला एक नवीन ओळख देईल. ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या लोकांनी थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे.
सिंह – आजचा दिवस सामान्य राहील. कौटुंबिक बाबी एकत्र बसून सोडवण्याला प्राधान्य द्या. परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. घरी पाहुणे आल्याने वातावरण आनंददायी असेल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल. घरी एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.
कन्या – उत्पन्नात वाढ करण्याच्या संधी उपलब्ध होतील. कामावर वरिष्ठ खूप खूश होतील. नोकरीच्या निमित्ताने काही खास लोकांच्या भेटी होतील. महत्त्वाची माहिती कोणाशीही शेअर करू नका. तसेच विरोधकाच्या प्रभावाखाली येणे टाळा. परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखाद्या चांगल्या योजनेची माहिती मिळू शकते.
हेही वाचा – आरोग्यम् धनसंपदा…
तुळ – कामासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. फक्त इतरांच्या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळा, अन्यथा समस्या वाढतील. आर्थिक अडचणी त्रास देतील. नोकरीसोबतच एखादा साइड बिझनेस सुरू करण्याचा विचार करू शकता. सहलीला जाणार असाल तर तिथे थोडी सावधगिरी बाळगा, सामान चोरीला जाण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – दिवस संमिश्र असेल. व्यवसायातील काही समस्यांमुळे तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ शकते. एखादे महत्त्वाचे काम ऐनवेळी अपूर्ण राहील, ज्यामुळे अडचणींमध्ये वाढ होईल. तब्येतीच्या काही समस्या जाणवत असतील तर, चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासात ढिलाई करणे टाळावे.
धनु – दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी व्यग्रतेमुळे आपले काम दुसऱ्यावर लादू नका. घरातील लहान मुले कशाची तरी मागणी करू शकतात. जुन्या व्यवहारांमध्ये काही समस्या येत असतील तर, त्याही दूर होतील. नोकरी करणाऱ्या जातकांना कामात चांगले यश मिळेल. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते.
मकर – दिवस आनंदाचा राहील. आज काही प्रभावशाली व्यक्तींच्या भेटी होतील. पालकांकडून वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न कराल, त्यादृष्टीने गुंतवणूक देखील करू शकता. घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती इच्छा देखील पूर्ण होईल; त्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर, त्याचा अर्ज देखील करू शकता.
कुंभ – दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. प्रत्येक काम करण्यासाठी पुढाकार घ्याल, मात्र त्यामुळे व्यग्रता वाढेल. मित्राला मदत करण्यासाठी पुढाकार घ्याल व्यवसायात केलेली नवीन भागीदारी भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना एखाद्या परीक्षेत यश हवे असेल तर त्याची तयारी करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.
मीन – आजचा दिवस काही समस्या घेऊन येऊ शकतो. दूर राहणाऱ्या नातेवाईकासोबत कोणतीही महत्त्वाची माहिती शेअर करू नका. व्यवसायात सुरू असलेल्या समस्यांपासून बऱ्याच प्रमाणात आराम मिळेल. जोडीदारासोबत थोडा वेळ घालवल्याने दोघांमधील सामंजस्य आणखी वाढेल. समाजात तुमची विश्वासार्हता आणि आदर वाढेल.
हेही वाचा – पालकांची जबाबदारी : शालेय सहली अन् स्नेहसंमेलन
दिनविशेष
तत्वचिंतक आणि शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
टीम अवांतर
भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि पाश्चात्त्य जगाला भारतीय तत्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर तत्वचिंतक अशी ओळख असणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला. तिरुत्तनी येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. उच्च शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन महाविद्यालयामध्ये झाले. नंतर चेन्नईचे प्रेसिडेन्सी महाविद्यालय, म्हैसूर विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठाचे ‘राजे पंचम जॉर्ज अध्यासन’ या ठिकाणी तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्याच वेळी ते ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर महाविद्यालयामध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचे प्राध्यापक होते. नंतर वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठाचे बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू होते. तसेच लंडन येथे ‘पौरस्त्य धर्म आणि नीतिशास्त्र’ यांचे प्राध्यापक (Spalding Professor) होते. 1931 ते 39 पर्यंत ते राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते. भारताचे रशियातील राजदूत म्हणून 1949 ते 1952 पर्यंत त्यांनी काम पाहिले. त्यावेळी आपली नेहमीची प्रथा मोडून स्टालिनने त्यांना मुद्दाम बोलावून त्यांची भेट घेतली होती. धर्म आणि तत्वज्ञान याप्रमाणेच शिक्षण हाही राधाकृष्णन् यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. शिक्षणाने व्यक्तीला आत्मभान आले पाहिजे तसेच त्याला आपल्या विचारांची दिशा ठरविता आली पाहिजे, असे त्यांचे मत होते. स्वतंत्र भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी तसेच या आदर्श शिक्षकाच्या सन्मानार्थ भारतात सर्वत्र त्यांचा जन्मदिन (5 सप्टेंबर) हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जाते. राधाकृष्णन् यांना अनेक मानसन्मान देऊन गौरविण्यात आले. अखिल भारतीय तत्वज्ञान परिषद आणि अखिल भारतीय शिक्षण परिषद यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. ऑक्सफर्ड येथील ऑप्टन व्याख्यानमाला तसेच हिबर्ट व्याख्यानमालेत व्याख्यान देण्याचा बहुमान त्यांना लाभला. 1954 मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांना सरकारकडून गौरविण्यात आले. 1952 ते 1967 या कालावधीत आधी भारताचे उपराष्ट्रपती आणि नंतर राष्ट्रपती होऊन त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. 16 एप्रिल 1975 रोजी त्यांचे निधन झाले.