दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 05 जानेवारी 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 15 पौष शके 1947; तिथि : द्वितीया 09:56; नक्षत्र : पुष्य 13:24
- योग : विष्कंभ 22:46; करण : वणिज 20:54
- सूर्य : धनु; चंद्र : कर्क; सूर्योदय : 07:12; सूर्यास्त : 18:13
- पक्ष : कृष्ण; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आज कामासाठी चांगली ऊर्जा असेल. पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय आणि आत्मविश्वासाने भरलेले असाल. बराच काळ प्रलंबित कामे पूर्ण करण्याची इच्छा होईल. मात्र, कधी कधी घाई किंवा राग हानिकारक असू शकतो, म्हणून जरावेळ थांबून विचार करणे महत्त्वाचे आहे. आर्थिक समस्या हळूहळू सुधारतील. मात्र झोपेकडे आणि आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
वृषभ – अनावश्यक धावपळीपासून दूर राहिल्याने शांती मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मूड चांगला होईल. कामाच्या ठिकाणी गोष्टी हळूहळू होतील, पण योग्य दिशेने जाणाऱ्या असतील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या आणि अनावश्यक खर्च टाळा. नातेसंबंधांमध्ये थोडी सौम्यता बाळगली तर वातावरण सुधारेल.
मिथुन – नवीन गोष्टी शिकण्यास, लोकांना भेटण्यास आणि संवाद साधण्यास उत्सुक असाल. मित्र किंवा जुने संपर्क यामुळे चांगली संधी मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी चांगले विचार मनात येतील, परंतु एकाच वेळी जास्त गोष्टी समजून घेण्याच्या भानगडीत पडू नका. नात्यांमधील गैरसमजुतींमुळे संबंध ताणले जातील, म्हणून स्पष्टपणे बोलणे महत्वाचे आहे.
कर्क – आज भावनिकदृष्ट्या थोडे संवेदनशील असाल. छोट्या छोट्या गोष्टी त्रास देऊ शकतात, म्हणून स्वतःला शांत ठेवा. कुटुंब आणि घराशी संबंधित जबाबदाऱ्या वाढू शकतात, परंतु तुम्ही त्या चांगल्या प्रकारे हाताळाल. पैशाची जास्त काळजी करण्याची गरज नाही; फक्त खर्चावर लक्ष ठेवा. थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह – आज तुमचा आत्मविश्वास भक्कम असेल. लोक तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतील, तुमच्या सल्ल्याची कदर करतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मान्यता आणि प्रशंसा मिळू शकते. फक्त आत्मविश्वास अहंकारात बदलू नये, याची काळजी घ्या. नात्यांमध्ये थोडे प्रेम आणि आपुलकी दाखवल्याने ती आणखी मजबूत होतील. फक्त अति ताण घेणे टाळा.
कन्या – जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण तुम्ही त्या चांगल्या प्रकारे हाताळाल. कष्टाचे फळ मिळण्यास सुरुवात होईल, अर्थात त्यासाठी तुम्हाला बराच वेळ वाट बघावी लागली आहे. कामावर स्थिरता येईल, आत्मविश्वास वाढेल. आर्थिक फायदा होईल. आरोग्य सामान्य राहील.
तुळ – आज तुम्ही व्यावहारिक असाल आणि गोष्टी व्यवस्थित हाताळण्यासाठी इच्छुक असाल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी हा चांगला काळ आहे. कामावर तुमचे कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्ता दिसून येईल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल आणि खर्च नियंत्रणात येतील. नातेसंबंधांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींबद्दल जास्त विचार करणे टाळा.
वृश्चिक – अनेक गोष्टी तुम्हाला तुमच्या पद्धतीने पूर्ण करायच्या असतील. पण, आज तुम्ही चौकटीबाहेर विचार कराल. नवीन कल्पना आणि योजना मनात येतील. मित्रांकडून किंवा तुमच्या नेटवर्ककडून फायदा होऊ शकतो. फक्त हट्टीपणा किंवा संघर्ष टाळा. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. झोप आणि विश्रांतीकडे लक्ष देणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
हेही वाचा – स्वप्न : खोल… खोल… न संपणारा जिना!
धनु – शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्याचा प्रयत्न कराल, परंतु कधीकधी तुमचे मन थोडे गोंधळलेले असू शकते. नातेसंबंधांमध्ये स्पष्ट आणि मोकळेपणाने संवाद साधणे फायदेशीर ठरेल. कामात धीर धरा; घाई हानिकारक ठरेल. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील, कोणताही मोठा फायदा किंवा तोटा होणार नाही.
मकर – खोलवर विचार करण्याची क्षमता वाढेल. कामावर लक्ष केंद्रित करणे नेहमीच चांगले, परंतु भावनांवर नियंत्रण ठेवणेही महत्त्वाचे आहे. तुमचे विचार फक्त विश्वासू लोकांसोबतच शेअर करा. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. ताणतणावाचे ओझे होऊ देऊ नका. शब्दांचा सांभाळून वापर करा, वाद होऊ शकतो.
कुंभ – काहीतरी नवीन करून पाहण्यास उत्सुक असाल. एखादा नवीन प्रकल्प सुरू होऊ शकतो. तुम्ही कामावर नवीन गोष्टी शिकाल, त्यामुळे पुढचा मार्ग स्पष्ट होईल. तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल. मात्र, आहाराकडे आणि दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
मीन – आज तुम्ही भावनिक आणि कल्पनाशील असाल. प्रिय व्यक्तीने सांगितलेली एखादी गोष्ट तुमच्या हृदयाला भिडू शकते. दिवसाच्या सुरुवातीला काम थोडे मंदगतीने चालेल, परंतु नंतर त्याची गती सुधारेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि अनावश्यक चिंता सोडून द्या. आर्थिक संतुलन टिकून राहील. ध्यान आणि थोडा एकांत तुम्हाला मनःशांती देईल.
दिनविशेष
श्रेष्ठ मराठी कादंबरीकार श्री. ना. पेंडसे
टीम अवांतर
मराठीतील श्रेष्ठ कादंबरीकार श्री. ना. तथा श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म 5 जानेवारी 1913 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी झाला. मुंबईतून ते बीएस्सी झाले आणि पुढे जवळपास दशकभर ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. पुढे मुंबईच्या बेस्ट परिवहनसंस्थेत ते नोकरी करू लागले आणि उप-जनसंपर्क अधिकारी या पदावरून 1968 साली ते निवृत्त झाले.
‘खडकावरील हिरवळ’ हे पेंडसे यांचे पहिले पुस्तक. या शब्दचित्रात्मक लेखनाकडून नंतर ते कादंबरीकडे वळले. ‘एल्गार’ या त्यांच्या पहिल्याच कादंबरीला जाणत्या रसिकांचा आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर हद्दपार, गारंबीचा बापू, हत्या, यशोदा, कलंदर, रथचक्र, लव्हाळी आणि ऑक्टोपस अशा नऊ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. एल्गारपासून कलंदरपर्यंतच्या सहा कादंबऱ्यांमध्ये कोकणचा निसर्गसमृद्ध प्रदेश त्यांनी प्रभावीपणे चित्रित केल्यामुळे प्रादेशिक कादंबरीकार म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली. कादंबरीद्वारा अभिव्यक्त होणाऱ्या जीवनानुभूतीची एक अपरिहार्य गरज म्हणूनच त्या परिसराचे चित्रण त्यांच्या कादंबरीत आले. रथचक्र या कादंबरीला 1964 साली साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले.
पेंडसे यांनी नाट्यलेखनही केले. राजे मास्तर, यशोदा, गारंबीचा बापू, असं झालं आणि उजाडलं ही त्यांची नाटके त्यांच्या अनुक्रमे हद्दपार,यशोदा, गारंबीचा बापू आणि लव्हाळी या कादंबऱ्यांची नाट्यरूपे असून महापूर, संभूसांच्या चाळीत, चक्रव्यूह अशी काही स्वतंत्र नाटकेही त्यांनी लिहिली आहेत. जुम्मन हा त्यांचा कथासंग्रह ही प्रसिद्ध झाला आहे.
हेही वाचा – …अन् सिया बाबा आणि शिववर संतापली!
लेखक म्हणून अनेक सन्मान पेंडसे यांना लाभले. हद्दपार, हत्या, कलंदर या कादंबऱ्यांना तर संभूसांच्या चाळीत आणि चक्रव्यूह या नाटकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळालेले आहेत. अन्य भाषांमध्येही पेंडसे यांचे साहित्य अनुवादित झाले आहे. ‘गारंबीचा बापू’ या कादंबरीचे गुजराती, हिंदी तसेच इंग्रजी या भाषांमध्ये तर ‘हद्दपार’ गुजराती आणि इंग्रजीमधून, रथचक्र गुजराती आणि हिंदी मधून याशिवाय हत्या आणि कलंदर गुजराती भाषेतून प्रसिद्ध झाल्या आहेत.
रॉकफेलर फाऊंडेशनच्या लेखकांकरिता असलेल्या ‘प्रवास शिष्यवृत्ती’साठी फाऊंडेशनने 1955 मध्ये श्रीनांची निवड केली होती. ही शिष्यवृत्ती मिळविणारे पेंडसे हे मराठीतील (आणि भारतातीलही) पहिले साहित्यिक होते. अशा या श्रेष्ठ कादंबरीकाराचे 23 मार्च 2007 रोजी निधन झाले.


