दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 04 जुलै 2025, वार : शुक्रवार
भारतीय सौर : 13 आषाढ शके 1947, तिथि : नवमी 16:31, नक्षत्र : चित्रा 16:49
योग : शिव 19:35, करण : तैतील 29:45
सूर्य : मिथुन, चंद्र : तुला, सूर्योदय : 06:05, सूर्यास्त : 19:20
पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आरोग्यामध्ये सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. आर्थिकदृष्ट्या दिवस अनुकूल ठरेल. कामात यश मिळवण्यासाठी सकारात्मक विचार आवश्यक आहेत. नातेसंबंध सुधारतील आणि त्यामागे उत्तम संवाद हा मुख्य घटक असेल.
वृषभ – नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहणे आवश्यक आहे. नवीन मित्र बनतील. जवळच्या एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती मिळेल, त्यामुळे उत्पन्नात वाढ होऊ शकते. अनावश्यक वादात अडकू नका.
मिथुन – घरातील ज्येष्ठांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अविवाहित जातकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मने जिंकू शकाल. मुलांबरोबर वेळ घालवता येईल. त्यामुळे पालकत्वाचा एक नवीन अनुभव मिळेल.
कर्क – संयम ढळू देऊ नका. आर्थिकदृष्ट्या सावध राहण्याची गरज आहे, अन्यथा नुकसान होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे क्षण अनुभवता येतील. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. विद्यार्थी अभ्यास सोडून इतर गोष्टींमध्ये जास्त रमतील, त्यामुळे त्यांचा बराच वेळ वाया जाऊ शकतो.
सिंह – जास्त चिंता आणि तणावामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे निराशा टाळा. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे बोलणे मूड खराब करू शकते. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल. प्रियजनांसोबत सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी गोष्टी तुमच्या बाजूने होत असल्याचे दिसेल.
कन्या – मानसिक संतुलन राखण्यासाठी दिवसाची सुरुवात योग किंवा ध्यानाने करा. बचत करण्याची सवय लावून घ्या. खर्चात कपात करा. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी एखादी योजना आखाल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.
हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान
तुळ – आर्थिकदृष्ट्या काही लाभ होऊ शकतात. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. व्यवसायातील फसवणूक टाळण्यासाठी लक्ष ठेवा. कामाच्या ठिकाणी कार्यालयीन राजकारणाचे बळी ठरण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगा.
वृश्चिक – एखाद्या अशा कामात मन गुंतवा ज्यामुळे तणाव दूर होईल. व्यवसाय मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता, ज्यामध्ये जवळच्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळू शकते. काही वेळ अनुभवी लोकांच्या सहवासात घालवला तर ज्ञानात भर पडेल.
धनु – आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या भेटीगाठींमुळे आनंद होऊ शकतो. कामात झोकून देण्याच्या सवयीमुळे व्यावसायिकांना पदोन्नती आणि आर्थिक लाभ होईल, अशी चिन्हे आहेत. संध्याकाळचा वेळ जोडीदारासोबत घालवण्याचा प्रयत्न करा.
मकर – एखाद्या व्यक्तीमुळे मूड खराब होण्याची शक्यता आहे. पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मात्र समजूतदारपणा आणि शहाणपणा यामुळे नुकसानाचे फायद्यात रूपांतर कराल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायाच्या बाबतीत दिवस चांगला जाणार आहे.
कुंभ – कर्ज मागणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. अतिशय कमी वेळा भेटणाऱ्या लोकांशी संवाद साधायला हा एक चांगला दिवस आहे. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज वाहन काळजीपूर्वक चालवा. व्यवसायाच्या दृष्टीने परिस्थिती सुधारत आहे.
मीन – आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आरोग्यातही सुधारणा होईल. व्यवसायाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.
दिनविशेष
जनकवी पी. सावळाराम
निवृत्ती रावजी पाटील अर्थात ‘जनकवी’ पी. सावळाराम यांचा आज जन्मदिवस. 4 जुलै 1914 हा त्यांचा जन्मदिवस. ‘उषःकाल’ या ह. ना. आपटे यांच्या कादंबरीतील सावळ्या तांडेल या पात्राच्या नावावरून वि. स. पागे यांनी पाटील यांना सावळाराम हे नाव दिले आणि त्यांनीही आयुष्यभर हेच नाव वापरले. पुढे कविवर्य कुसुमाग्रज यांनी त्यांना ‘जनकवी’ ही उपाधी दिली. पूर्वी संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकाराम यांचे अभंग जसे लोकांना मुखोद्गत असायचे तसेच नंतरच्या काळात सावळाराम यांची गाणे जनमानसात नुसती लोकप्रियच झाली नाहीत तर, आजही त्यांच्या ओठांवर ती रूळलेली आहेत. ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला’ किंवा ‘गंगा यमुना डोळ्यात उभ्या का?’ पासून ते मानवी जीवनातील प्रत्येक प्रसंगाला, प्रत्येक नात्याला डोळ्यांसमोर ठेवून सावळाराम यांनी गीतलेखन केलेले दिसते. लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुरेल आवाजाने ही गीते घराघरांत जाऊन पोहोचली. गीत लेखनाप्रमाणेच समाजकार्याची देखील त्यांना आवड होती. त्यामुळे 1962 साली ते ठाणे नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. 1963-64मध्ये ते शिक्षण समितीचे सभासदही होते. ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजच्या उभारणीत त्यांचाही सहभाग होता. 1982 सालच्या गदिमा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय जयसिंगपूर येथे 1985मध्ये झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. 22 डिसेंबर 1997 रोजी त्यांचे निधन झाले.
हेही वाचा – विठ्ठल दर्शनाची आस, वारी आणि मी