दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 03 सप्टेंबर 2025; वार : बुधवार
- भारतीय सौर : 12 भाद्रपद शके 1947; तिथि : एकादशी 28:21; नक्षत्र : पूर्वाषाढा 23:07
- योग : आयुष्मान 16:16; करण : वणिज 16:12
- सूर्य : सिंह; चंद्र : धनु 29:20; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:51
- पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
परिवर्तिनी एकादशी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस सामान्य राहील. धार्मिक कार्यात रस वाढेल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात, कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक जीवनात गोडवा राहील. मात्र कोणत्या तरी मानसिक तणावामुळे थकवा जाणवेल.
वृषभ – दिवस शुभ राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. उत्पन्न वाढण्याची चिन्हे आहेत, तरीही अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. डोकेदुखी किंवा थकवा येण्याची शक्यता आहे.
मिथुन – आजचा दिवस संमिश्र असेल. कामाच्या बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घ्या, कोणतीही जोखीम घेऊ नका. नवीन जबाबदाऱ्या मिळतील, त्या स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार करा. कुटुंबाशी संबंधित चिंता त्रास देतील. भूतकाळात केलेल्या चुकांबद्दल पश्चात्ताप होईल. मानसिक ताणामुळे थकवा येण्याची शक्यता आहे.
कर्क – दिवस व्यग्र राहील. मात्र त्यासाठी बाकीची कामे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू नका. वडिलधाऱ्यांच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण होतील. मालमत्तेशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांमध्ये तुमची प्रतिमा सुधारेल. मात्र अतिकामामुळे थकवा जाणवू शकतो, त्यासाठी विश्रांती घेणे आवश्यक आहे.
सिंह – मानसिक आणि शारीरिक अस्वस्थता वाटेल. कोणत्याही प्रकारची घाई टाळा. व्यवसायात नफा होईल, कार्यक्षमता सुधारेल. कुटुंब आणि जोडीदार यांची साथ मिळेल. एखाद्या मित्राची अचानक भेट होण्याची शक्यता आहे. मानसिक अशांततेसाठी योगा आणि मेडिटेशन करा. तितली आसन पायांना बळ देतं. पायांना लवचीकता देणारं आणि मजबुती देणारं आसन म्हणून हे ओळखलं जातं.
कन्या – दिवस फायदेशीर आहे. भविष्याच्या दृष्टीने काही योजना आखल्या जातील; त्यासाठी काही प्रमाणात खर्चही वाढू शकतो. जोडीदारासोबत नव्याने भावनिक बंध जोडले जातील. संततीकडून मात्र काहीशी निराशा पदरी येईल. आरोग्याच्या काही किरकोळ समस्या उद्भवू शकतात.
हेही वाचा – मला माहेर हवे… स्मिताताई आणि अंजलीचे स्नेहबंध
तुळ – दिवस सामान्य असेल. मात्र बोलण्यावर संयम आवश्यक आहे. नोकरी किंवा व्यवसायात सरकारी लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी खर्चाकडेही लक्ष द्या. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. घरात एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.
वृश्चिक – वादाचे प्रसंग टाळा, संयम ठेवा. विद्यार्थी त्यांच्या कामात व्यग्र राहतील. राजकारणात असलेल्या जातकांना फायदा होईल. कौटुंबिक स्तरावर भावंडांकडून पाठिंबा मिळेल. मात्र घरातल्याच एखाद्या सदस्याशी वाद होण्याची देखील शक्यता आहे. प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्या.
धनु – आनंददायी वातावरण असेल. त्यामुळे मनही सकारात्मक बनेल. नोकरदार जातकांना बढती आणि बदलीचे योग आहेत. कठोर परिश्रमाने केलेल्या कामाचे फळ मिळेल. घरात पूजा-पाठाचे धार्मिक कार्य आयोजित केले जाईल. संततीकडून आनंद मिळेल.
मकर – दिवस अनुकूल असेल. सगळी कामे मनाजोगती पूर्ण होतील. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. सरकारी कामे पूर्ण होऊ शकतील, भागीदारीतील व्यवसाय फायदेशीर ठरेल. घरी पाहुणे येऊ शकतात. दिवसभर उर्जावान असलात तरी, संध्याकाळनंतर थकवा येण्याची शक्यता आहे.
कुंभ – दिवस संमिश्र असेल. बोलताना नीट विचारपूर्वक शब्दांची निवड करा. व्यवसायात नफा होईल. नव्या ओळखींमुळे सामाजिक संपर्क जाळे विस्तारण्यास मदत होईल. एखाद्या शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल, मुलांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असेल. बदलत्या हवामानाचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आवश्यक ती काळजी घ्या.
मीन – एखादी चांगली बातमी मिळेल, पण त्याबाबतचा निर्णय काळजीपूर्वक घ्या. चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. याचाही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी लाभ होईल. कौटुंबिक स्तरावर मालमत्तेशी संबंधित वाद संभवतात. संततीच्या प्रगतीबाबत समाधानी असाल. तब्येतीच्या लहान-मोठ्या कुरबुरी असतील. थकवा जाणवण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – माहेर : मी आणि माझं लेकरू!
दिनविशेष
शाहीर साबळे
टीम अवांतर
कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच शाहीर साबळे यांचा जन्म 3 सप्टेंबर 1923 रोजी सातारा जिल्ह्यातील पसरणी (तालुका वाई) येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. सुरुवातीला गावीच शिक्षण झाल्यानंतर ते अमळनेर येथे मामांकडे आले. तिथेच त्यांची भेट साने गुरुजींशी झाली. देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत जनजागृती करण्यासाठी गुरुजींबरोबर ते दौरे करू लागले. तसेच राजकीय-सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार करण्यासाठी शाहिरी माध्यमाचा उपयोग करून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पुढे ‘जागृती शाहीर मंडळ’ त्यांनी काढले. 1942 साली शाहीर शंकरराव निकम यांचा प्रभाव साबळे यांच्यावर होता. निकमांकडूनच त्यांनी शाहिरी कलेचे प्रत्यक्ष धडे घेतले. हैदराबाद मुक्तिसंग्रामातही शाहिरांनी प्रचाराचे रान उठवले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी ‘जातीयवाद की समाजवाद’ (1947) हा पहिला पोवाडा लिहिला. स्वतंत्र भारतात नव्याने सुरू झालेल्या राजकारणाचा संदर्भ या पोवाड्याला होता. त्यांचा विशेष उल्लेखनीय पोवाडा म्हणजे आधुनिक मानवाची कहाणी 1977 साली पुस्तकरुपाने प्रसिद्ध झाला. त्यात त्यांनी साम्यवादाचा विचार मांडला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवामुक्ती आंदोलन यातही जनजागृतीसाठी त्यांनी प्रभावी शाहिराची भूमिका बजावली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर कवी राजा बढे यांनी रचलेले आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत शाहिर साबळे यांनी गायिले आणि या गाण्याने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. ‘आंधळं दळतंय’ हे मुक्तनाट्य लिहून त्यांनी ते रंगभूमीवर आणले. त्यांनी एकूण 14 मुक्तनाट्ये सादर केली. त्यांपैकी नऊ त्यांनी, तर पाच इतर लेखकांनी लिहिली होती. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा त्यांचा कार्यक्रम खूपच लोकप्रिय ठरला. शाहिरांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांपैकी संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, शाहीर अमर शेख पुरस्काराचे पहिले मानकरी, अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद, अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे अध्यक्षपद, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, संत नामदेव पुरस्कार, शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा सर्वश्रेष्ठ गायक पुरस्कार, कविश्रेष्ठ पी. सावळाराम पुरस्कार, महाराष्ट्ररत्न पुरस्कार, लोकशाहीर विठ्ठल उमप मृद्गंध जीवनगौरव पुरस्कार यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. याशिवाय, भारत सरकारतर्फे त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब देऊन गौरविण्यात आले. 20 मार्च 2015 रोजी त्यांचे निधन झाले.