दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 03 ऑक्टोबर 2025; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 11 आश्विन शके 1947; तिथि : एकादशी 18:32; नक्षत्र : श्रवण 09:33
- योग : धृति 21:45; करण : वणिज 06:57, बव 29:56
- सूर्य : कन्या; चंद्र : मकर 21:26; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:27
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
पाशांकुशा एकादशी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – वाहने काळजीपूर्वक चालवा. कोणाकडूनही कोणत्याही कारणाने पैसे उधार घेऊ नका. शेअर बाजारात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. काही प्रमाणात उत्पन्न मिळाल्याने आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. संततीच्या इच्छा पूर्ण कराल, परंतु जोडीदाराशी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. त्यामुळे परिस्थिती काळजीपूर्वक हाताळावी लागेल.
वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये नाव कमावण्याचा असेल. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळाली तर, अवश्य करा. वडिलोपार्जित मालमत्तेच्या समस्येमुळे ताण वाढेल, त्यामुळे डोळे आणि कान उघडे ठेवा. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका. कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळू शकतात.
मिथुन – आज घरातील आणि बाहेरील कामांवर लक्ष केंद्रित कराल. खर्च वाढू शकतो. आतापर्यंत तुमच्या प्रगतीती येणारे सगळे अडथळे दूर होतील. आईने सांगितलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला वाईट वाटू शकते. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
कर्क – आजचा दिवस संमिश्र असेल. भागीदारीत काम करणे चांगले राहील, परंतु त्यासाठी कामांचे नियोजन केले पाहिजे. सरकारी बाबींमध्ये हलगर्जीपणा केल्यास समस्या वाढू शकतात. व्यवसायात मोठी रक्कम गुंतवण्याचा प्रयत्न कराल. शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा समस्या वाढू शकतात.
सिंह – आज कामात वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल. विद्युत उपकरणे हाताळताना सावधगिरी बाळगा. कोणत्याही कामासाठी इतरांवर अवलंबून राहण्याचे टाळा. सासरच्या व्यक्तीशी संपर्क साधण्याची संधी मिळेल. त्याचा भविष्यात चांगला फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळख मिळेल. तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात.
हेही वाचा – मायाळू आणि उबदार… आज्जी!
कन्या – शत्रूंना ओळखण्याची आवश्यकता आहे. आरोग्य बिघडल्यामुळे तुम्हाला मोठा त्रास होईल. कामात सावधगिरी बाळगा, तसेच बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात स्पर्धात्मक भावना कायम राहील. प्रवासाचा बेत आखू शकता. जुन्या मित्राला भेटल्याने आनंद मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी सुसंवाद राहील.
तुळ – आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने अतिशय चांगला असेल. एखाद्या प्रकल्पात भेडसावणाऱ्या समस्या दूर होतील. घाईघाईने किंवा भावनिक निर्णय घेण्याचे टाळा. अनावश्यक राग संपूर्ण कुटुंबाला त्रास देऊ शकतो. प्रवासादरम्यान तुम्हाला एखादी महत्त्वाची माहिती मिळू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याचा विवाह ठरण्याची चिन्हे आहेत.
वृश्चिक – आजचा दिवस खास असेल. आज उत्तम मूडमध्ये असाल. तुमचे धाडस आणि शौर्य वाढेल. कामाच्या ठिकाणी काही तांत्रिक समस्या उद्भवू शकतात. तथापि, नोकरीत अडचणींचा सामना कराव्या लागणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. अविवाहितांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे.
धनु – धोकादायक कामे किंवा अतिसाहस करणे आज टाळा. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. मेजवानीचा योग आहे, मात्र पोटाची काळजी घ्यावी लागेल. जास्त खर्च करण्याची सवय आर्थिक समस्या वाढवू शकते. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. जोडीदाराचा भक्कम पाठिंबा आणि सहवास मिळेल. घरी अचानक पाहुणे येऊ शकतात.
मकर – आज दिवसाची सुरुवात चांगली होईल. उत्पन्न आणि खर्च यात संतुलन राखा. आध्यात्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. सुखसोयी वाढतील आणि काहीतरी नवीन करून पाहण्याची इच्छा वाटेल. जोडीदार खांद्याला खांदा लावून उभा राहील. पालकांच्या आशीर्वादाने, कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते.
कुंभ – आज खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. एखाद्या मित्राला मदत कराल. दुसरी नोकरी मिळाल्याचा आनंद साजरा कराल. नातेवाईकांच्या घरी एखाद्या छोट्याशा कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. वडील तुम्हाला काही जबाबदारी देतील, त्यात आळस करू नका.
हेही वाचा – हत्ती… सम्राटांच्या ऐश्वर्याचे प्रतीक
मीन – आज प्रतिस्पर्धींना पराभूत करण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक पातळीवर तणावाचा सामना करावा लागेल. सभोवतालच्या लोकांचा तुमच्या विचारांवर पडणारा प्रभाव टाळा आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. प्रलंबित आर्थिक बाबी पूर्ण होतील. कर्ज फेडण्याचा प्रयत्न कराल. शारीरिक समस्या उद्भवू शकतात, त्यासाठी चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
दिनविशेष
शिवणयंत्राचे जनक इलियास होवे
टीम अवांतर
शिवणयंत्राचा शोध लावणारे इलियास होवे यांचा जन्म 9 जुलै 1819 रोजी झाला. 1935 साली ते अमेरिकेतील एका कापड कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाले. इलियास होवे यांच्या आधी अनेकांनी शिवणयंत्र बनवण्याचा प्रयत्न केला होता. होवे यांनी शिवणयंत्र तयार केले खरे, पण जेव्हा जेव्हा त्यांनी ते चालवायचा प्रयत्न केला, त्या प्रत्येक वेळी त्यातील धागा तुटायचा. त्यानंतर इलियास यांनी मशिनची बारकाईने तपासणी केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, केवळ सुईमुळेच हा धागा तुटतोय, त्यानंतर त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करून सुई आणि धागा यांचा मेळ घातला आणि शिवण यंत्राचा जन्म झाला. 10 सप्टेंबर 1846 मध्ये त्यांना शिवण यंत्राचे पहिले पेटंट मिळाले. त्याच वर्षी त्यांना शिवणयंत्रातील लॉकस्टिच डिझाइनसाठी अमेरिकेचा पहिला पेटंट पुरस्कार मिळाला. पण दुर्दैवाने अमेरिकेतील एकही व्यक्ती हे यंत्र घेण्यास तयार नव्हती. त्यानंतर होवे यांचा भाऊ ब्रिटनला गेला आणि हे शिवणयंत्र त्यांनी 250 पाऊंडला विकले. त्यानंतर 1851 मध्ये त्यांनी जिपरचा शोध लावला आणि त्याचे पेटंट देखील घेतले. 3 ऑक्टोबर 1867 रोजी वयाच्या 48व्या वर्षी इलियास होवे यांचे निधन झाले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारतातही शिवणयंत्र आले. उषा नावाचे पहिले शिलाई मशीन भारतात कलकत्ता येथील कारखान्यात 1935मध्ये बनवण्यात आले. या शिवणयंत्राचे सर्व भाग देखील भारतातच बनवले गेले.


