शोभा भडके
भाग – 12
शिव आणि आराधना आंब्याच्या झाडाखाली आले होते. झाडाखाली एक बाज टाकलेली होती. त्यावर शिव बसला तर, आरू तिथेच शेजारी अवघडून उभी होती… तिने हिम्मत करून, “त्याच्याशी बोलायचं आहे, तेही एकट्यात!” असं बोलली तर होती. तसंही तिचा स्वभाव तसाच होता, मनात आलं ते बोलून मोकळी व्हायची… यावेळी तिने तेच केलं होतं. तिला अपेक्षित अशी सगळ्यांची रिॲक्शन बघायला मिळाली होती… आईने तर डोळ्यांनीच दटावलं होतं… बाकीचे लोक पण तिच्या तोंडाकडे पाहू लागले होते. आजपर्यंत गावात कुठल्याच मुलीने असं डायरेक्ट सगळ्यांसमोर मुलाशी एकट्यात बोलायचंय, हे म्हणण्याची हिम्मत केली नव्हती.
शिव बाजेवर बसून तिच्याकडेच पाहात होता. तिला एवढं शांत आणि नर्व्हस पाहून त्यांच्या भेटीचा पहिला दिवस आठवला… “किती बडबड करत होती! भीती तर कसलीच नव्हती चेहऱ्यावर… आणि आज किती विचार करतेय. कदाचित, त्या दिवशी अनोळखी होतो म्हणून… आणि आज पण हिने ओळखलं असेल मला… तो मनात विचार करत होता.
“बोलायचं होतं…?” शेवटी शांतता भंग त्याने विचारलं.
“हां.. बोला ना…” ती तशीच पदराशी चाळा करत होती. त्याने एक भुवई उंचावत तिच्याकडे पाहिलं… तिची पण नजर त्याच्यावरच गेली…
“का… काय?” आरू.
“तुला बोलायच होतं ना…” शिव.
“हां, ते म्हणजे तुम्ही सिया वहिनीच्या पहिल्या लग्नाबद्दल आत्ताच आमच्या घरच्यांना सांगू नका. इथं सगळे गावातले लोक जमलेले आहेत. लोकांना फक्त बोलायला आणि नाव ठेवायला पाहिजे…” ती एका दमात बोलून मोकळी झाली आणि त्याच्याकडे पाहू लागली. तो काय बोलतोय म्हणून टेन्शनमध्ये आली होती…
तो तर सुन्न झाला होता, तिचं हे बोलणं ऐकून! त्याला तर अपेक्षित नव्हतं तिचं असं बोलणं. त्याला वाटलं होतं, ती आपल्या शिक्षणाबद्दल बोलेल… कारणं जीवनने जेव्हा तिची माहिती काढली होती, तेव्हा त्याला कळलं होतं, तिचं शिक्षणाबद्दलचं प्रेम.
पण आता आश्चर्य वाटलं… तिला सियाच्या लग्नाबद्दल माहिती आहे! कदाचित रामने सांगितलं असेल…
“पण हे तर फसवणूक केल्यासारखं होइल.. आणि त्या कारणावरून तुझ्या घरचे माझ्या बहिणीला त्रास पण देऊ शकतात!” शिव.
“मी तुम्हाला खोटं बोला असं म्हणत नाही… तुम्ही फक्त आत्ता सांगू नका. कदाचित तुम्हाला सांगायची गरजच पडणार नाही… दादा स्वतः सांगेल आणि वहिनीला त्रासही होऊ देणार नाही…!”
हेही वाचा – राम आणि सियाचा होकार आला, आता पुढे काय?
“सो… तुला सगळं माहीत आहे तर! ग्रेट म्हणजे तुला आत्ता हे सांगायला हरकत नाही की, मी फक्त माझ्या बहिणीसाठी तुझ्या सोबत लग्न करत आहे.” तो म्हणाला. एक तर ती लहान आहे याची त्याला जाणीव होती, त्यात ती या लग्नाला नाईलाजाने तयार झालीय, याचीही त्याला कल्पना होती. तिने या लग्नाचं कुठल्याही प्रकारे दडपण घेऊ नये, हे त्याच्या या बोलण्यामागचं कारण होतं.
पण तिला मात्र त्याच्या या बोलण्याचा अर्थ नाही कळला आणि जास्त जोर देऊन विचारही ती करणार नव्हती… ती सुद्धा दादासाठी लग्नाला तयार झाली होती!
“हो, मी सुद्धा…” आरू.
“जायचं?” शिव.
“हो…” ती पुढे निघाली आणि तो तिच्या मागे.
इकडे राम आणि सिया पण सगळ्यात येऊन बसले; पण दोघांच्या मनात राग होता. पण सगळ्यांसमोर अजिबात तसं दाखवलं नाही. शिव आणि आरू मंडपात आले. ते दोघं आल्यावर, थोडंफार बोलून लग्नाची तारीख निश्चित केली गेली. लग्न पुण्याला करायचं ठरलं. सगळी तयारी माझी फॅमिली करणार, असं शिव म्हणाला. पण रामने त्याला रोखलं. “माझ्या बहिणीच्या लग्नासाठी काही काही स्वप्न आहेत माझी… त्यामुळे तिच्या लग्नाचा खर्च मीच करणार! तुमच्या इतकं भारी लग्न मी तिचं नाही करू शकणार, पण तिच्यासाठी काहीतरी करू शकलोय, याच समाधान…” रामचं म्हणणं सगळयांनी मान्य केलं.
लग्न महिन्याभरात होतं. त्यामुळे बरीचशी तयारी करावी लागणार होती. त्यात दोन लग्नं! सगळं कसं मॅनेज करायचं यावर बराच वेळ चर्चा झाली. लिला आजीने त्यांचे रीतिरिवाज सांगितले. मानपानाची बोलणी झाली…. सगळं व्यवस्थित झालं… पण सियाच्या घटस्पोटाबद्दल मात्र काहीच बोललं गेलं नाही! आरूच्या फॅमिलीला काहीच कल्पना नव्हती. नंतर कसं होणार, याचं टेन्शन आरूला आलं. राम पण त्याचाच विचार करत होता.
शिव जेव्हा काही तरी सांगायचं म्हणाला, तेव्हा रामला पण असंच वाटत होतं की, हा विषय एवढ्या लोकांसमोर निघू नये… आणि आरूने नकळतपणे त्याचं काम केलं. पण जेव्हा कळेल तेव्हा बघू जे होईल ते… असा विचार करून त्याने सध्या तरी चूप राहाणं आवश्यक समजलं जातं.
सरपोतदार फॅमिली पुण्याला परत आली.
राम रात्री अंगणात बाजेवर झोपला होता. तो सियाचा विचार करत होता… आज इतक्या वर्षांनंतर तिला पाहात होता… खरंतर तिला पाहून त्याला इतकं भरून येत होतं… जेव्हा तिला समोर पाहिलं, असं वाटलं होतं, सरळ जाऊन तिला मिठीत घ्यावं… आणि सांगावं “मी आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो, जेवढं अगोदर करत होतो! सांगावंस वाटत होतं… नाही विसरलो तुला एका क्षणासाठी सुद्धा! आजही रात्री एकांतात तुझ्याच आठवणी डोळ्यांसमोर असतात…” त्याने आपल्या भावनांना मोठ्या मुश्किलीने बांधून ठेवलं होतं. वर वर रुक्षपणाचा आव आणत होता तो, पण तिच्या आठवणीत कधी त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं, त्यालाही कळलं नाही. त्याने हाताने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि एक दीर्घ श्वास घेत डोळे मिटले… त्याचबरोबर त्याच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग आला जेव्हा बोलण्यासाठी दोघांना एकांतात पाठवलं होतं…
तिकडे शिव आणि आराधना एका झाडाखाली बसले होते तर, तिथे जवळच असलेल्या दुसऱ्या झाडाखाली राम आणि सिया उभे होते… थोडा वेळ कोणीच कोणाशी काहीच बोलत नव्हतं, दोघेही शांतपणे आपापल्या विचारात हरवले होते. काय बोलावं, कसं बोलावं…. दोघांच्या मनाचा नुसता गोंधळ उडाला होता. इतक्या वर्षांनंतर आपलं प्रेम आपल्यासामोर उभं आहे… रामच्या मनात विचार सुरू होते… समोर ती उभी होती. चेहऱ्याच्या हावभावावरून ती रागात आहे, एवढं तर त्याला समजत होतं. पण यात तिचा दोष नव्हता, याची जाणीव होती त्याला… त्याने स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून जर आपल्या प्रेमाची साथ दिली असती तर, आज तिच्यासोबत जे काही झालं ते झालं नसतं. कुठे तरी या सगळ्याला तो स्वतःला जबाबदार ठरवत होता. जे झालं ते तर तो बदलू शकत नव्हता, पण आता यापुढे तिची साथ कधीच सोडायची नाही! तिला प्रत्येक सुख द्यायचं, हाच तो विचार करत होता. तिला आत्ता समोर पाहून तो स्वतः रागात होता, हेही विसरून गेला.
“सियाSSS” त्याने एक दीर्घ श्वास घेत तिला आवाज दिला.
तिने काहीच प्रतिसाद दिला नाही… ती एकटक समोर पाहात होती. तो चालत तिच्याजवळ आला आणि त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवण्यासाठी हात पुढे केला, तिला जशी याची जाणीव झाली, तशी ती झटक्यात बाजूला झाली… त्याला पाठ करून उभी होती ती. त्याचा हात मात्र हवेतच राहिला. तो परत तिच्याजवळ येऊ लागला… तिनं एक दीर्घ श्वास घेत डोळे मिटले आणि वाढलेल्या श्वासांना कंट्रोल करत त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यांत राग होता… तो काही बोलणार तोच ती म्हणाली, “मी फक्त माझ्या भावासाठी या लग्नाला तयार झालेय… तेव्हा तुम्ही माझ्याकडून कुठलीही अपेक्षा ठेऊ नका. एकच गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर राम शिंदे… हे लग्न फक्त एक तडजोड असेल. तुम्ही तुमच्या बहिणीसाठी आणि मी माझ्या भावासाठी केलेली. फक्त एक तडजोड… ” अस म्हणून ती निघून गेली. तो मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहातच राहिला! काही क्षणांसाठी तो आरूला विसरला होता… त्याला स्वतःचाच राग येत होता. तो ना त्याच्या प्रेमासाठी काही करू शकला, ना आज आपल्या बहिणीसाठी!
किती तरी वेळ तो रात्री विचार करत पहुडला होता…
तर, इकडे एका शांत ठिकाणी आकाश आणि शिव बसले होते.
“काय मग खूश आहेस ना? सगळं तुझ्या मर्जीप्रमाणे घडतंय तर…” आकाश शिवच्या शेजारी बसून त्याच्याकडे पाहात, हसून म्हणाला.
” हं…” शिव सुस्कारा सोडत म्हणाला.
“शिव तू हे सगळं सियाच्या सुखासाठी करत आहेस, पण या सगळ्यांत तिच्या चेहऱ्यावर कुठेच आनंद दिसत नाहीये,” आकाश म्हणाला.
“रागात आहे ती सध्या. पण खात्री आहे, आज जरी ती माझ्यासाठी या लग्नाला तयार झाली, पण एक दिवस ती जिजूंना माफ करेल… कारण रागावर प्रेम हे वरचढच ठरते! …आणि तिचंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे… दोष त्यांचा नाही, डॅडींचा आहे…” शिव.
“हो पण तू अंकलना ते जमिनीचं आमिष दाखवलंस त्याचं काय? ते ती जमीन मिळवण्यासाठी वाट्टेल ते करतील आणि रामसाठी शेती म्हणजे सर्वकाही आहे. त्या दोघांच्या नात्यात पुढे प्रॉब्लेम तर येणार नाही ना?” आकाशने शंका व्यक्त केली.
सियाने जेव्हा नकार दिला होता तेव्हा, शिवने रामच्या नावे असलेली हायवे-टच जमिनीची किंमत करोडोमध्ये असल्याचं सांगितलं होतं. तसेच, हे लग्न झालं तर ती जमीन आपण मिळवू शकतो, यात आपला खूप मोठा फायदा आहे, असंही त्याने बाबांना सांगितलं होतं… शेवटी त्यानेही या लग्नातून फायदा बघितला आहे, हेच त्यांना पटवून दिलं होतं!
हेही वाचा – लग्नाची बोलणी सुरू झाली, तेवढ्यात आरू म्हणाली…
मुख्य म्हणजे, सियाला फक्त तेच समजावू शकत होते, तिचा नकार होकारात बदलू शकत होते. त्याचबरोबर त्याने त्याला आपल्याला आरू आवडतेय, हे पण जाणवून दिलं होतं. त्याचा उपयोग करून त्यांनी सियाला तयार केलं होतं.
“डोन्ट वरी… मी सगळं हॅण्डल करेन, यापुढेही!”
“पण शिव, तुला खरंच आराधना आवडते? नाही म्हणजे, त्या दिवशी ऑफिसमध्ये तू ज्या प्रकारे तिचा फोटो पाहात होतास… मला तरी ते नाटक नव्हत वाटलं,” आकाश त्याच्या डोळ्यांत पाहत म्हणाला.
“माहीत नाही… पण तिचा आवाज मनाला सुकून देतो… रखरखत्या उन्हात जशा पहिल्या पावसाच्या सरी पडल्यावर जमीन तृप्त होऊन जाते, तसंच माझं मन तिचा आवाज ऐकून शांत होतं… बाकी ती आवडत जरी असली तरी, एक बायको म्हणून मी तिचा विचार नाही करू शकत.” तो सुस्कारा सोडत म्हणाला.
“शिव…” आकाशने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
“मी ठीक आहे आकाश. आरू आता माझी जिम्मेदारी आहे. तिला कुठलीही कमी पडू देणार नाही. सियादीची मला आता चिंता नाही, राम जिजू तिची काळजी घेतील.” शिव.
“ते घेतील रे दीची काळजी, पण तुझ्यावर राग आहे त्यांचा… शेवटी त्यांचंही त्यांच्या बहिणीवर खूप प्रेम आहे,” आकाश गूढपणे म्हणाला.
“हं… आहे कल्पना. नंतर सांगेन त्यांना सगळं खरं… घेतील ते समजून. बरं, चल निघायला हवं, लेट झालाय…”
मग थोडा वेळ त्यांच्या गप्पा झाल्या आणि दोघे आपापल्या घरी निघून गेले.
क्रमशः


