सिनेमांमधून मुंबईच्या सण-उत्सवांचे दर्शन होत असते. गोविंदाच्या जल्लोषापासून बाप्पाच्या दर्शनापर्यंत सर्व उत्साहात दाखवलं जातं. विशेष म्हणजे, सिनेमांमध्ये दाखविले जाणारे सण-उत्सव हे कधी सामाजिक एकतेचे रूप म्हणून दाखवले गेले तर, कधी असामाजिक अराजकता या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दाखविले गेले. खरंतर, हे सण, उत्सव आपणच निर्माण केलेत सामूहिक एकोप्यासाठी आणि सामूहिक आनंदाकरिता ना? परंतु त्यामधील ही एकत्मतेची भावना मात्र दिवसेंदिवस बीभत्स होत चाललीय, अस वाटत. दोन हात, दोन पाय, एक डोकं अशा सारख्याचं शरीराचा मनुष्य केवळ त्याच्या वैचारीक भेदामुळे एकमेकांशी वैर घेऊन बसला आहे.
अग्नी, जल, वायु, पृथ्वी, आकाश ही निसर्गातील पंचतत्व. मनुष्यरुपी चालता बोलता देह जेव्हा निष्प्राण होतो तेव्हा तो पंचतत्वात विलीन होतो असं आपण म्हणतो.
मी राहायला नागपुरला. मुंबईतील माझ्या घरातून मेट्रोच्या पुलापलीकडे पाहिले तर, हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लीम कब्रस्तान एकमेकांच्या बाजूलाच दिसतात. त्याच्याच बाजूला ख्रिश्चनांचे ग्रेव्हयार्ड पण असावे, असं वाटतं. मी जेव्हा जेव्हा मुंबईत येते तेव्हा या जागांकडे माझी हमखास नजर जातेच, कारण ते अगदी माझ्या दृष्टीक्षेपात आहे. सहज जरी खिडकीबाहेर नजर टाकली तरी, ते दृश्य दिसतं. खरंतर, वास्तवाची जाणीव करून देणारं हे चित्र आहे. मला पहिले हे माहीत नव्हतं, परंतु कधीतरी तेथील पाइपमधून धूर निघताना दिसायचा आणि नंतर हळूहळू एक जळकट, कुबट गंध हवेद्वारे घरामध्ये यायचा. तो गंध कशाचा आहे, हे जाणून घ्यायच्या प्रयत्नातूनच तिथे स्मशानभूमी आणि कब्रस्तान असल्याचा मला पता लागला.
हेही वाचा – राजयोगिनी कुंती अन् दुर्वास ऋषी
सांगायचा मुद्दा हा आहे की, मनुष्य मेल्यानंतर तिथे एकमेकांच्या बाजूला असलेल्या आपापल्या धर्मांच्या स्थानांवर कुठलीही तक्रार न करता बिनदिक्कतपणे विसावतो! का तर तो तेव्हा निष्प्राण असतो. त्याचा विचार प्रवाह थांबलेला असतो. तो तेव्हा मृत झालेला असतो. मग तो जिवंत असताना या वास्तवाचा स्वीकार करून का जगत नाही? जे काही जिवंत असताना आपल्यापाशी आहे ते नश्वर आहे, ते नष्ट होणार आहे, हे माहीत असूनही नको त्या गोष्टींकरिता का आपली मानसिक आणि शारीरिक शक्ती आपण व्यर्थ खर्ची घालतो? आहे तो क्षण महत्त्वाचा समजून जीवनाचा भरभरून आनंद का आपल्याला घेता येत नाही? हे समजायला अजून किती वेळ लागणार आहे काय माहीत?
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मी खिडकीत उभी राहून विसर्जन मिरवणुकीच्या जल्लोषाचा आनंद घेत होते, आकाशात फटाक्यांची आतषबाजी सुरू होती… ढोल पथकांचा आवाज गर्जत होता… ट्रकवरील डीजेचा कर्णकर्कश आवाज कानावर पडत होता… त्याच वेळेस एक मेट्रो कुठलाही धर्मभेद किंवा जातीभेद न करता एकत्रितपणे माणसांचा लोंढा आपल्या डब्यांमध्ये सामील करून समोरील पुलावरून धावत होती… पुलापलीकडे असलेल्या स्मशानभूमीतून कुठल्यातरी पुण्यात्म्याच्या अंत्येष्टीचा धूर तेथील चिमण्यांमधून बाहेर पडत असल्याचे दिसत होते, तर त्याच वेळेस कुठूनतरी दूरवरून अजान कानावर पडत होती…
हेही वाचा – पश्चात्तापदग्ध राजयोगिनी कुंती…
आकाशाकडे पाहिले तर भारताच्या नकाशासारखा भासणारा एक ढग हळूहळू आकाशात विरळ होताना दिसत होता आणि मी ते सर्व दृश्य पाहून अंतर्मुख झाले होते. एक अनुभव असाही जो तुम्हाला कधी ना कधी गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडतो. पंचतत्वातून आलो आहोत, पंचतत्वातच विलीन होणार आहोत, ही खूणगाठ मनाशी पक्की बांधायला इतका छोटासा अनुभवदेखील पुरेसा आहे. प्रत्येक धर्माचे रीतीरीवाज जरी वेगवेगळे असले, विचारधारा भिन्न असल्या तरी अंतिम सत्य मात्र हे एकच आहे!


