Tuesday, March 10, 2026

banner 468x60

Homeललितअबोली, मी अन् ती…!

अबोली, मी अन् ती…!

दिलीप कजगांवकर

गेल्या महिन्यात जयपूर–दिल्ली फ्लाइटमध्ये मला एक छान सोबत लाभली. आधुनिक राहणी, आवाजात माधुर्य, प्रसन्न आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या तरुणीचे. मीच बोलत होतो; तिकडून फक्त “हो का”, “अरे वा”, “छानच”, “सुरेख” — आणि तरीही ती ऐकत आहे, याची खात्री देणारे प्रतिसाद. मी फोन नंबर मागितला, त्याला स्पष्ट पण गोड नकार. तरीही, मी कागदावर लिहून दिलेला माझा नंबर तिने पर्समध्ये हळूच ठेवला. तेही नसे थोडके!

लगेज बेल्टवर आलेली तिची बॅग मी उचलून तिला सुपूर्द केली.

ती — थँक्स, मी अबोली.

मी — अगदी नावाप्रमाणे.

अबोली लाजली.

मी — मी प्रशांत.

ती — नावाप्रमाणे अजिबात नाही.

दोघेही खळखळून हसलो.

ती — टेक केअर, सी यू, बाय.

मी — पुण्यात आलात तर फोन करा.

निरोप घेताना डोळे पाणावले – माझे. त्यामुळेच तिच्या डोळ्यातील पाणी दिसले नसावे मला.

हेही वाचा – लग्नाचा 51वा वाढदिवस अन् वृद्धाश्रम

परवा फोनवर तोच मधुर आवाज — “मी पुढच्या आठवड्यात पुण्याला येतेय. तीन दिवस मुक्काम आहे. तुम्हाला वेळ असल्यास भेटूया.”

‘तुझ्यासाठी वेळच वेळ, मी रजा घेईन अबोली,’ मी पुटपुटलो, मनातल्या मनात.

“जरूर भेटू, मी तुमच्यासाठी वेळ नक्की काढीन,” हे मात्र स्पष्ट, तिला ऐकू येईल असे… “मुक्काम कुठे असणार?”

“माझ्या मैत्रिणीकडे.”

“तुम्ही मैत्रिणीचा अ‍ॅड्रेस पाठवा. मी घ्यायला येईन, आपण डिनरला जाऊ.”

“नको, नको,” अबोली म्हणाली.

मी नाराज झालो, फक्त क्षणभर. अबोली पुढे म्हणाली, “फक्त डिनर नाही, डिनरनंतर एखादा छानसा मराठी मुव्ही सुद्धा पाहूया.”

मला तर चक्क लॉटरी लागली होती. मी मनातल्या मनात गोड स्वप्न पाहू लागलो.

“तुमची हरकत नसेल तर, आपण एखादं नाटकही बघूया,” अबोली लाडिकपणे म्हणाली.

“वा, वा! किती रसिक आहात तुम्ही,” मी आनंदाने म्हणालो.

“पण एक विनंती आहे,” अबोली म्हणाली.

“अबोली, तुमच्यासारख्या गोड मुलीने हुकूम सोडावा, विनंती करू नये. बोला, काय हुकूम आहे?”

हेही वाचा – समीर अन् अपर्णा… दैव जाणिले कुणी?

“तुम्ही पण ना!” म्हणताना अबोली लाजली. “मी माझ्या मैत्रिणीशी तुमची ओळख करून देईन. तिचा स्वभाव आवडेल तुम्हाला. आपण तिलासुद्धा नाटक बघायला नेऊया. तुम्हाला चालेल ना?”

“का नाही? अवश्य नेऊया.”

अबोलीने अ‍ॅड्रेस पाठवला. एरिया वाचताना छातीत हलकीशी धडधड वाढली, कारण तो माझ्या घराच्या जवळपासचाच भाग वाटत होता. अबोलीची मैत्रिण मला ओळखत असेल तर?

नो, नो… माझीच सोसायटी, माझाच फ्लॅट, माझाच अ‍ॅड्रेस!

माझ्या पायाखालची जमीन सरकली. गप्पांच्या ओघात मी मुद्दामच सांगितलं होतं की, “आई–वडील माझ्यासाठी मुली बघत आहेत. मला कुणी पसंतच पडत नाही, कारण मला फक्त सुंदर नाही तर हुशारही मुलगी हवी आहे, अगदी तुमच्यासारखी.”

अबोलीची मैत्रीण माझ्या ओळखीचीच नव्हती — ती माझीच सौभाग्यवती होती.

मी मनातून खूप घाबरलो. पुढे काय होणार? ते माहीत नाही आणि त्याचा विचारही करता येत नाही. जगलो, वाचलो तर सांगेन पुढे काय झालं ते!


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!