प्रदीप केळूस्कर
दारावर खटखट झाली म्हणून श्रद्धाने दार उघडले… बाहेर दत्तूकाका होते…
“काय हो काका? आज सकाळीच…”
“मास्तर आसत..?”
“अजून झोपलाय तो… काल रात्री गेटमीटिंग करून आलाय… उठवू का?”
तेवढ्यात दत्तूकाकांच्या आवाजाने जागा झालेला विश्वास बाहेर आला.
“काय हो दत्तूकाका.. आज सकाळीच?”
“मास्तर.. कालच्या मीटिंगमध्ये काय ठरला संपाचा?”
“नाही हो… मालक मागण्या मान्य करत नाही आणि मागण्या मान्य केल्याशिवाय आत जायचे नाही, असे साहेबांचे म्हणणे…”
“मास्तर.. यात आमी उपाशी रवलव… दोन वरसा झाली.. संप आज मिटात, उद्या मिटात म्हणून… खायचा काय?”
“होय हो काका, मला का समजतं नाही! एवढा दीर्घ संप चालेल याची कल्पना नव्हती…”
“मग पुढे काय? सारंगअण्णा काय म्हणतत?”
“बघू… आज मी भेटायला जाणार आहे अण्णांना… त्यांना कालच्या गेटमीटिंगबद्दलही सांगायचं आहे…”
“मास्तर, जास्त वेळ काढू नकात. माज्या चेडवाचा लग्न ठरवलंय, दोन वरसा झाली… तेच्या घरची चौकशी करतत… गळ्यात तीन ग्रॅमची डवली तरी घालूक होयी आणि लग्नाचो खर्च… कपंनी बंद… पैसे खायसून हाडू?”
“बरं, मी आज म्हणतो अण्णांना… तुमचा विषय पण सांगतो… या तुम्ही…”
“उद्या येतंय मास्तर… बरी बातमी घेऊन या,” म्हणत दत्तूकाका गेले आणि विश्वास खुर्चीत धापकन बसला.
आंघोळ करून श्रद्धा बाहेर आली…
“गेले दत्तूकाका? काय म्हणत होते?”
“संप केव्हा संपणार? त्यांच्या लेकीचे लग्न ठरून दोन वर्षे झाली… त्यांच्या गावाकडील आहे मुलगा, कणकवलीजवळचा… पोलीस आहे… लग्न करायचेय पण खिशात काय तरी हवे ना!”
“या तुमच्या संपामुळे खूप लोकांचे वांधे झाले. दोन वर्षे संप..? किती कामगार आहेत तुमच्या कंपनीत?”
“सोळाशे… आणि स्टाफ वेगळा!”
“म्हणजे जवळजवळ दोन हजार कुटुंबे दोन वर्षे पगारावाचून आहेत, एका कुटुंबात पाच माणसे पकडली तर एक लाख माणसे उपाशी आहेत!”
“होय तर.. जवळपास एक लाख माणसे या संपामुळे उपाशी आहेत… दत्तू काकासारखे…”
“विश्वास.. आपली पण तीच परिस्थिती आली असती, पण माझी नोकरी आहे म्हणून! कशी का असेना, कमी पगाराची का असेना… पण त्यामुळे घरात रेशन तरी येतंय.”
“बरं… मी सारंगअण्णांकडे जाऊन येतो, संप मागे घेतात का ते विचारायला… तुझ्याकडे पन्नास रुपये असतील तर दे, बससाठी… सिगरेट्स पण संपल्यात…” श्रद्धाने पर्समधून पन्नास रुपये काढून दिले.
विश्वास बसमधून उतरला आणि पंधरा मिनिटे चालत सारंगअण्णाच्या एअर कंडिशन ऑफिसमध्ये पोहोचला. आत अण्णांच्या समोर पाच-सहा मंडळी बसली होती आणि अण्णा मोठमोठ्याने त्याच्याशी बोलत होते. विश्वास आत गेला आणि एका स्टूलवर बसला. त्याला पाहताच अण्णांनी बोलणे आवरते घेतले आणि त्याच्याकडे बघत बोलले,
“झाली काल गेटमीटिंग? कामगारांचे काय म्हणणे?”
“अण्णा… कामगार घायकुतीला आलेत… त्त्यांचा संयम संपलाय. त्यांच्या दोनवेळ जेवणाचे वांधे झालेयत… पोरीबाळींची लग्ने अडकलीयत…”
“पण त्यावेळी हेच कामगार माझ्याकडे आले होते ना? मी यांच्याकडे गेलो होतो? मी ठाणेपट्टीत दहा-बारा कंपनीत भरघोस पगारवाढ दिलीच ना? पण आता परिस्थिती बदलली… मिलचा संप फसला, डॉक्टरांची डाळ शिजली नाही तर आपले काय?”
“म्हणजे अण्णा, मिलच्या संपानंतर एवढा बदल झाला?”
“होय रे बाबा… खूपच बदल झालाय. डॉक्टर एवढे स्ट्रॉग… एवढा मिलकामगार त्यांच्यामागे… तरी संप यशस्वी झाला नाही!”
“का यशस्वी झाला नाही मिलकामगारांचा संप?”
“कारण मुंबईतील जमीन! जमिनी विकून कोट्यवधी पैसे मिळतात तर, मिल चालवायला कुणाला इंटरेस्ट आहे? आणि राज्यकर्ते… दोघांची आतून सेटलमेंट!”
“मग आपला संप? त्याचे काय होणार?”
“विश्वास… मी तुझ्या कंपनीतील संप मागे घेऊ शकत नाही, कारण माझी युनियन मुंबईतील आणखी दहा कंपनीत आहे आणि पुणे, नाशिक भागांतही आहे… हा संप फसला तर इतर कंपनीत त्याचा परिणाम होईल… मला माझी युनियन सुरू ठेवायची आहे आणि त्यावर माझी डाळ-चावल आहे!”
“म्हणजे अण्णा, तुमच्या स्वार्थासाठी आमच्या कपंनीतील कामगारांना उपाशी ठेवणार? केवढे हे पाप?”
“जीवो जिवश्य जीवनम… हा डार्विनचा सिद्धांत तुला माहीत असेलच. अशा लाखो कामगारांच्या जीवावर आमचे बंगले उभे राहतात…”
“हे पाप आहे अण्णा? कामगार स्वस्थ बसणार नाहीत…”
“मग कामगारांना तू का सांगत नाहीस… संप मोडून कंपनीत जा म्हणून?”
“मला तसे सांगावेसे वाटते… पण मला हे मान्य करायला हवे की, अजूनही बऱ्याच कामगारांचा तुमच्यावर विश्वास आहे… कारण अनेक कंपन्यांत तुम्ही घसघशीत पगारवाढ दिली आहे… आणि माझ्या दृष्टीने दुसरे कारण…”
“कसले दुसरे कारण विश्वास? बोल.. स्पष्ट बोल…”
“मला माहीत आहे… तुमच्यापाशी मुंबईतील अनेक गुंड आहेत. त्यांना तुम्ही पोसताय. संप जो मोडेल त्त्यांचा तुम्ही गेम कराल…”
अण्णा मोठ्याने हसले… “तुला माहीत आहे ना सर्व.. मग गप्प बस…”
रागाने विश्वास बाहेर पडला. बस पकडून घरी आला. घराखाली एक-दोन सिगरेटी घेतल्या आणि दार उघडून घरात गेला. त्याचे डोके गरम झाले होते. अण्णा आपला हेका सोडत नव्हते… पुढे काय करावे हे त्याला कळेना! त्याची कॉलेजपासूनची डावी विचारसरणी… कामगार, त्यांचे हक्क.. याविषयी तो पोटतिडकेने बोलायचा. या कंपनीत नोकरी मिळाल्यापासून तो कामगारांच्या जवळ गेला. त्त्यांचे लहान-सहान प्रश्न सोडवू लागला. त्यामुळे तो युनियन लीडर झाला. गेली पाच वर्षे कंपनीने पगारवाढ दिली नव्हती, त्यामुळे कामगार नाराज होते, ते विश्वासबरोबर बोलत. कामगारांचे म्हणणे पडले सारंगच्या युनियनला जॉइन व्हावे, म्हणजे सारंगअण्णा मालकाला पगारवाढ द्यायला भाग पाडतील. शेवटी त्याने इतर कामगारप्रतिनिधींबरोबर सारंगअण्णांची भेट घेतली होती.
विश्वास रागाने धूमसत होता. इतक्यात श्रद्धा शाळेतून आली…
“भेटले का सारंग?”
“होय.”
“मग?”
“मग काहीच नाही. ते म्हणतात, तसा संप मागे घेऊ शकत नाही…”
“का?”
“त्त्यांची आणखी अनेक कंपन्यात युनियन आहे. त्यामुळे या कंपनीतून माघार घेतली तर, इतर कंपन्यांत परिणाम होतील…”
“पण मग कामगारांनी काय करायचं? दत्तू काकासारखेच बाकीचे! मग तू का प्रयत्न करत नाहीस संप मागे घ्यायचा?”
“मी तसं करू शकत नाही, कारण आमच्या कामगारांपैकी अनेकांना सारंगअण्णा मोठी पगारवाढ देतील, अशी आशा आहे आणि दुसरे…” विश्वास बोलता बोलता थांबला.
“दुसरे काय?”
“ही युनियन चालवाणारी माणसे सरळ नसतात, गुंड पोसत असतात हे… मी संप मागे घेण्याचा प्रयत्न केला तर, मलाच ठार मारतील ही लोक!”
“बापरे… तू नको पडूस यात. चल जेवायला, मी जेवण गरम करते…”
ते दोघे जेवण करत असताना दार वाजले म्हणून जेवणावरून उठून श्रद्धाने दार उघडले तर दत्तूकाका उभे.
“मास्तर इलेत?”
“होय, जेवत आहेत… बसा.”
दत्तूकाका आत येऊन बसले. जेवण अर्धवट टाकून विश्वास बाहेर आला.
“काका, सारंगअण्णांना भेटून आत्ताच आलो. पण त्त्यांचे संप मागे घेण्याचे मन नाही.”
“मग.. आमी काय करायचा? किती दिवस उपाशी रवायचा?”
“मी सगळं सांगून बघितलं, पण मालक अटी मान्य करत नाहीत आणि अण्णा अटी शिथिल करत नाहीत… आपलंच चुकलं, आपण उगीचच या युनियनच्या मागे धावलो…”
“पण मास्तर, माका पैशांची गरज आसा हो… माज्या चेडवाचा लगीन करुचा आसा…”
“होय काका, मला समजतंय. पण माझ्याकडे पण काहीच नाही. तुमच्यासारखा मला पण दोन वर्षे पगार नाही. श्रद्धाला शाळेत काय थोडे पैसे मिळतात, त्यावर… नशीब आम्हाला मूल नाही अजून, नाहीतर…”
“पण माका आसा ना! दोन चेडवा आसात… दोगांय लग्नाची झालीत. थोरल्याचा लगीन ठरान दोन वरसा झाली. आता ती माणसा थांबतीत काय? मास्तर, मी अण्णाका भेटाक जावं.. माजी परिस्थिती सांगतय. माज्यासारखी बरीच जणांची परिस्थिती अशीच…”
“ठीक आहे दत्तूकाका, तुम्ही अण्णांना भेटा.”
दुसऱ्या दिवशी दत्तूकाका सारंगअण्णाच्या ऑफिसमध्ये पोहोचले. दोन तास बाहेर बसल्यावर त्याना आतमध्ये घेतले.
“बोला.. कोण तुम्ही?”
“मी दत्तू सावंत. आमच्या कंपनीत संप सुरू आसा. काल विश्वासमास्तर तुमका भेटून गेले.”
“बरं.. तुम्ही त्या कंपनीत आहात. काय काम?”
“साहेब, दोन वरसा आमी भायेर आसव. दोन वरसा म्हणजे चव्विस महिने पगार नाय.. कसा जगायचं?”
हेही वाचा – लक्ष्मीव्रत… जहिराची कहाणी
“तुम्हीच मंडळी माझ्याकडे आलात ना? मी तुमच्याकडे आलो होतो काय? तुम्हाला मोठी पगारवाढ पाहिजे… पण थांबायला नको? कंपनीच्या मालकाकडे पगारवाढ मागितली. पण तो देत नाही म्हणून संप… मला काय हौस आहे संप पुकारण्याची?”
“पण अण्णा, माझी खूप कुचंबणा झाली हो. माका दोन मुली. दोघी पण लग्नाची झालीत. थोरलीचा लग्न ठरला पण, माझ्याकडे पाच पैशे नाय हो! लग्न करुचा कसा धाडस करू, सांगा?”
“या तुमच्या वैयक्तिक गोष्टी मला सांगू नका. संप केला की, हे सोसावंच लागतं. डॉक्टरनी मिलचा संप पुकारला. तुमच्याच कोकणातील कामगार देशोधडीला लागले. मी असं ऐकलं की, गिरणीकामगारांच्या मुली डान्सबारमध्ये नाच करतात म्हणे! अजून करतात… त्यांनी आपल्या बापाचे कर्ज फिटवले, असे ऐकतो मी. असं होतं…”
दत्तूकाका रागाने लाल लाल झाले. रागाने ते म्हणाले, “म्हणजे तुमचा म्हणणं, माज्या मुलींनी डान्सबारमधी नाच करुचो…”
“असं म्हणत नाही मी…”
“मग काय म्हणताय. तुमका संप मागे घेऊक जमणा नाय आणि असलो सल्लो देतास?“
रागाने दत्तूकाका बाहेर पडले. दत्तूकाका विश्वासच्या घरी आले तेव्हा तो सिगरेट ओढत बसला होता. बाजूलाच श्रद्धा मुलांचे पेपर तपासत होती. चिडलेले दत्तूकाका विश्वासला म्हणाले,
“सालो XXX माका सल्लो देता… म्हणता गिरणी कामगारांचे मुली डान्सबारमध्ये नाच करतत. तेनी बापाचा कर्ज फेडला. नालायक सालो… माका असो राग इलो, साल्याचो गळो दाबीन म्हणून…”
“शांत व्हा काका, शांत व्हा… अहो हे पुढारी असेच. त्यांना कामगार कसे राहतात याची कल्पनाच नसते. मी आणि श्रद्धाने तुमच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चाची सोय केली आहे.”
“काय?”
“होय काका… आम्ही पनवेलमध्ये एका सोसायटीत ब्लॉक बुक केला होता दोन वर्षांपूर्वी. दीड लाख भरले होते. परत पैसे भरणे जमलेच नाही. आजच आम्ही पनवेलमध्ये जाऊन ते अग्रीमेंट रद्द केले. बिल्डर खूष झाला कारण आता डबल दर झाले आहेत तिकडे. ते पैसे पंधरा दिवसांत मिळतील. तेव्हा तुम्ही मुलीच्या लग्नाचे ठरवा. तोपर्यंत पैसे येतील, लग्न होऊन जाईल.”
हेही वाचा – लक्ष्मीव्रत… जहिराच माझी ‘छकुली’
दत्तूकाका रडू लागले… “अजून देव आसा या जगात तुमच्यासारखो…”
दत्तूकाका डोळे पुसत घरी गेले. विश्वास, श्रद्धाला समाधान वाटले; कारण कितीतरी दिवसांनी दत्तूकाका हसले. समाधानाने घरी गेले.
त्या रात्री खूप दिवसांनी विश्वास गाढ झोपला. पहाटे पहाटे दारावर थापा सुरू झाल्या. एवढ्या पहाटे कोण म्हणत, श्रद्धाने दार उघडले… दत्तूकाका छाती पिटत ओरडत होते.
“काय झाले काका?”
“काय सांगा बाय.. रातीपासून माजा चेडू नायसा झाला.”
“आ.. कुठे गेली? शोधलंत का?”
एवढ्यात विश्वास बाहेर आला… “काय झालं काका?”
‘मास्तर, माज्या चेडवान फसवल्यानं माका. त्या बंडूदादाबरोबर पळणं गेला. देवळात जाऊन लगीन पण केलान.”
“अरे.. काय हे? तुम्हाला काहीच कल्पना नव्हती?”
“थोडी थोडी होती… तेचा तरी काय चूक? तीस वरसा झाली. अजून लगीन नाय. माजी कपंनी बंद. मी तेचा लगीन ठरवलंय. पण लगीन करूंक पैसो नाय. शेवटी वाट बघून बघून तेना दुसऱ्याचो हात धरल्यानं. पण ता दुसरेपणाक…”
“म्हणजे?”
“त्या बंडूदादाचा पयला लग्न झाला हो. तेका दोन झील आसात आणि तेचो मटक्याचो धंदो… चार दिवस आत, चार दिवस बाहेर…”
“अरेरे.. वाईट वाटलं.”
“आता तेका सोडूचय नाय… सोडूचय नाय… म्हणत संतापाने लाल झालेले दत्तूकाका बाहेर पडले…
त्याच दिवशी दुपारपासून टीव्हीवरील बातम्यात ठळक बातमी यायला लागली…
कामगार नेते जयवंत सारंग (अण्णा) यांचा त्यांच्या ऑफिसबाहेर पोटात सुरा खुपसून खून… खुनी दत्तू सावंत याला अटक!
मोबाइल – 9307521152/9422381299