Thursday, January 15, 2026

banner 468x60

Homeललितआयुष्याचा वेग आणि रहाटगाडगे…

आयुष्याचा वेग आणि रहाटगाडगे…

कितीतरी वेळ तो माझ्या मांडीवर डोके ठेवून डोळे मिटून बसला होता. मी त्याला हळूवारपणे थोपटत होतो. कोकणात येऊन दोन-तीन दिवस उलटून गेले होते आम्हाला…

“आबा, इथे आणखी काही दिवस राहू या का? इथली माणसं आणि शांतता खूप आवडली मला.”

“अरे, आपलंच तर घर आहे हे, पिढीजात चालत आलेलं! काळानुरूप मी त्याच्या इंटिरिअरमध्ये आवश्यक तेवढे बदल करून घेतले आहेत इतकंच. तू म्हणशील तितके दिवस राहू आपण…”

संध्याकाळी उन्हं कलती झाल्यावर आम्ही दोघेही किनाऱ्यावर फेरफटका मारायला गेलो. सुनसान होता तो… पूर्णपणे निर्मनुष्य… लाटांचा आवाज फक्त सोबतीला होता…

“चल आबा आपण डोंगर करू या!”

त्याच्या अचानक बोलण्याने मला हसू आले. पण त्याचा आग्रह मोडणं मला जीवावर आलं होतं. पुढच्या अर्ध्या तासात मऊशार वाळूवर मांडी घालून बसत आम्ही दोघेही डोंगर करण्यात गर्क झालो…

हेही वाचा – मनाची श्रीमंती… मित्राची अनोखी कहाणी!

घरी आल्यावर अनुसयेने मोठ्या कौतुकाने मस्त गरमागरम पिठलं, भाकरी खाऊ घातले आम्हाला. अनुसया म्हणजे अभिजितची बायको. आमच्या पश्चात आमचं घर सांभाळणाऱ्या आण्णांचा मुलगा आणि सून… जवळपास 40 वर्षांनी माझ्यासोबत कोकणात आलेल्या सौरभचे भरभरून लाड करत होते ते दोघेही जणं.

गेल्या आठवड्यातल्या शुक्रवारची गोष्ट… मी स्टडीमधून झोपायच्या खोलीत जायच्या तयारीत असताना दारावर टकटक झाली. सौरभ आत आला आणि म्हणाला, “आबा, येऊ का रे आत?”

मी हसून म्हणालो, “या राजे. स्वागत आहे. अरे, आबाकडे यायला तुला कधीपासून परवानगी लागायला लागली? आज शुक्रवार असून देखील आपण आबाला भेटायला कसे आलात? आज वीकेंड प्रोग्राम, नाइट आऊट, लाँग ड्राइव्ह, हॅंग ऑन सोडून माझी आठवण कशी झाली राजांना?”

सौरभ मंदपणे हसलेला बघून मी समजून गेलो की, काहीतरी बिनसलं आहे. त्याला जवळ घेत मी विचारले, “काय झालं सांग बरं मला.”

“भीती वाटते आहे…”

“कसली?” मला काहीच कळत नव्हतं.

“वेगाने जाणाऱ्या आयुष्याची. दिवसा सतत मीटिंग्स, प्रेझेन्टेशन, रिपोर्ट, ऑर्डर बुक पोझिशन, ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन, फंड रिॲलोकेशन, एचआर रिलेटेड इश्यूज् वगैरे वगैरे आणि त्यानंतर लेट नाइट पार्टी, बिझनेस सर्कल मीटिंग्ज… कुठे मोकळा वेळ नाही श्वास घ्यायला आणि स्वतःसाठी जगायला! कंटाळा आला आहे, या सगळ्याचा मला. आबा या सगळ्यांपासून कुठे तरी लांब घेऊन चल मला…”

सौरभवर आलेला ताण मला प्रकर्षाने जाणवला. मी म्हणालो त्याला, “चल, तुला चालणार असेल तर कोकणात जाऊ आपल्या घरी. तिथे कोणी त्रास देणार नाही तुला… उद्या ऑफिसला जा. पुढच्या आठवड्यात तू कितपत बिझी आहेस ते बघ. तुला आठवडाभर वेळ काढणं शक्य असेल तर आपण सोमवारी पहाटे निघू या कोकण दौऱ्यावर!”

सौरभच्या खोलीत शांतता बघून मी त्याला शोधत परसदारी आलो. सौरभ रहाटगाडग्याजवळ शांतपणे बसून एकटक बघत बसलेला होता. रहाटगाडग्याने पाणी उपसून ते हौदात जमा होऊन तिथून ते नारळी पोफळीच्या बागेत बांधलेल्या पाटातून प्रत्येक झाडाच्या बुंध्याशी पोहोचत होते. पाण्याचा हा प्रवास सौरभला खूप भावला.

मला बघताच तो म्हणाला, “गुड मॉर्निंग आबा. गेले अर्धा तास मी इथे बसून पाण्याचा प्रवास बघतोय. कुठेही गडबड नाही. गोंधळ नाही. सगळं सुरळीत सुरू आहे.”

मुंबईमध्ये सौरभने व्यक्त केलेल्या भीतीचं उत्तर मला अचानकपणे या रहटगाडग्याने देऊन टाकले होते.

“सौरभ, तुला ज्या वेगाची भीती वाटते आहे तोच आणि तसाच काहीसा वेग आहे, या रहटगाडग्याच्या फिरण्याला. त्याला जोडलेले एकेक मडकं ओळीने आणि शांतपणे विहिरीत जाऊन पाणी भरून वर येऊन ते पाणी हौदात ओतत आहे. त्यांची कसलीही कुरबूर नाही. सगळं कसं नेमून दिलेले काम चोखपणे पार पडत आहे… परमेश्वराने आपल्या आयुष्याच्या विहिरीवर आपल्या देहाचं रहाटगाडगे लावलेलं असतं. त्याला कर्तव्य, जबाबदारी, नाती, वंश परंपरा, रितीरिवाज, उत्तरदायित्व, मालकी या सगळ्यांची मडकी बांधलेली असतात, जी नेमून दिलेले काम चोखपणे करत असतात. पण रहाटगाडगे कधी आणि किती वेळ फिरवायचं आणि किती वेळ थांबवायचं हे शेवटी आपल्यालाच ठरवायचं असतं. तू गरज नसताना ते चालू ठेवलंस तर, विहिरीतील पाण्याची पातळी कमी होईलच; पण जास्तीचं अनावश्यक पाणी झाडाभोवती भरलं तर त्याचा गंभीर परिणाम झाडावर होऊन काही विपरीत घडू शकते…”

मी क्षणभर थांबून सौरभच्या चेहऱ्याचे भाव बघितले, पुढे म्हणालो, “तुझ्या मनावरच्या ताब्याचं बटण आवश्यकता असेल तेव्हा तुला लावावंच लागेल, जेणेकरून तुझ्या जगण्याभोवती वाईट सवयी, वाईट विचार, वाईट संगत, पैशाचा अपव्यय, नशा, व्यसनं, वाईट दिशेने पडणारी पावलं, स्वतःहून विकत घेतलेले आजार, डोकेदुखी, वाढता ताण, निद्रानाश यांच्या रुपात अनावश्यक पाणी जमा होणार नाही. एकदा का या गोष्टींपासून तू लांब राहू शकलास तर ज्या वेगाची तुला आज भीती वाटते आहे, तोच वेग उद्या तुला हवाहवासा वाटेल. मला खात्री आहे मला काय म्हणायचे आहे, ते सर्व मी तुला प्रयत्न करून सांगितले आहे.”

हेही वाचा – सागरगोटे… आयुष्यातील चढ-उताराचे अन् सुख-दुःखाचे!

“आबा, तू ऑसम आहेस आणि म्हणूनच माझा लाडका आहेस. चल, माझ्यासोबत मला त्या शेवटच्या झाडाला भेटायचे आहे, ज्याच्यापर्यंत रहटगाडग्याने पाणी पोहोचते…”

आम्ही दोघे मग शांतपणे आमच्या दूरदूरवर पसरलेल्या वाडीत पाय दुखेस्तोवर सावकाशपणे हिंडलो. सगळ्यात शेवटच्या झाडापाशी आल्यावर सौरभला माझं म्हणणं बहुतेक पटलं. त्याची शांत, संयमी आणि समाधानी नजर अन् चेहऱ्यावर पसरलेली आनंदाची विस्तीर्ण किनारपट्टी मला बरंच काही सांगून गेली! ह्या गोष्टीला देखील आता 10 वर्षे उलटून गेली. पण तेव्हापासून आजपर्यंत त्याच्या मनाचा पाट गावच्या घराशी जोडण्यात मी यशस्वी झालो आहे. शेवटी ज्या मातीतून आपला जन्म झाला आहे, तिथल्याच स्पर्शाने जगण्याचं सोनं झालेलं कोणाला आवडणार नाही.

सतीश बर्वे
सतीश बर्वे
वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!