प्रदीप केळुस्कर
भाग – 1
मी माझ्या केबिनमध्ये बसून उद्याचा अग्रलेख लिहित होतो, यावेळी मी कुणाचाही फोन घेत नाही, पण माझ्या असिस्टंटने मला कळवले, फक्त संपादकासाठी म्हणून परदेशातून एक फोन आला आहे… मी चडफडत फोन उचलला. पलीकडून एका स्त्रीचा आवाज होता…
“नमस्ते, प्रवीण बाबू बात कर रहे हैं क्या?”
“हां, आप कौन और किधर से बात कर रही हैं?”
“प्रवीण बाबू, मैं अमला शेख, दुबई से बात कर रही हूं…”
“अच्छा, लेकिन मेरे पास आप का क्या काम है?”
“प्रवीण बाबू, मैंने पता किया हैं, कि आप कोल्हापूर के सबसे मशहूर अखबार वाले हैं, मैं आप की बहन जैसी हूं…”
“यह ठीक हैं, मगर आप का काम क्या हैं?”
अमला शेखने जे सांगितलं, त्याचा गोषवारा असा…
“मी जरी दुबईतील अमला शेख असले, तरी मी हिंदुस्तानी मुलगी आहे. माझे भारतातले नाव गंगा होते… मी लहान असताना एका उरूसमध्ये आई-बाबांबरोबर फिरत असताना एका बाहुलीसाठी आईचा हात सोडला आणि पुढे धावत गेले, त्यावेळी कोणीतरी मला पकडले आणि आई-वडील अन् माझी ताटातूट झाली. मग काही दिवस मी बेशुद्ध होते. मग मला एका खोलीत ठेवले गेले. तिथे आणखी सहा मुली होत्या. काही दिवसांनी आम्हा सर्वांना इकडे दुबईत आणले गेले. 14 वर्षाची असताना शेखबरोबर माझा निकाह लावला गेला. हे शेख माझ्यापेक्षा चाळीस वर्षांनी मोठे. मी त्यांची चौथी जोरू. आता मला दोन मुली आहेत. सध्या मला पैशांची कसलीही कमी नाही. माझ्यासाठी मोठा बंगला आहे. दारासमोर गाडी आहेत. दाग-दागिने आहेत… माझ्याकडे सर्व काही आहे, पण माझी माय, माझा बाबा आणि माझा भाऊ गुंडू लांब झालेयत. त्यांना आता शोधायचे आहे.
एवढे दिवस आमचे शेख मला भारतात यायची परवानगी देत नव्हते. कारण पोलिसांची भीती! पोलिसांकडे मी हरवल्याची तक्रार दिलेली असणार… पण माझ्या मुलीने पित्याची समजूत घातली आणि शेख यांनी चार दिवसांसाठी भारतात जायची परवानगी दिली. माझी लडकी पण माझ्याबरोबर येणार आहे…
माझे गाव नेमके कोणते हे मला आठवत नाही, पण माझ्या आईचे नाव लक्ष्मी आणि बापाला सदू असं म्हणत, माझा एक वर्षाचा भाऊ होता… त्याला गुंडू म्हणून हाक मारत. माझं गाव कोल्हापूरजवळ असणार, कारण मला पळविले गेले, त्याआधी मी अंबाबाईच्या देवळात माझ्या माय-बाबाबरोबर गेल्याचे मला आठवते. तसेच, बाबाने मला मोठा तलाव दाखवला होता. आमच्या घरात थोडं-थोडं मराठी बोलत असत. पण बाजूचे सगळे कन्नड भाषा बोलत होते… आजूबाजूला तंबाखूचे आणि उसाचे मळे होते. माझ्या मुलीने गुगलवरून मराठी बोलणारे आणि अंबाबाईचे देऊळ याचा शोध घेतला तेव्हा ही माहिती मिळाली… पोलिसांना कळवायचे नसल्याने माझ्या गावाचा आणि आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी पेपरवाल्याची मदत घ्यायची ठरली. माझ्या मुलीने कोल्हापुरातील सर्वात जुन्या वृत्तपत्राचा शोध घेतला, तेव्हा या तुमच्या वर्तमानपत्राचे नाव मिळाले… त्याचे संपादक म्हणून तुम्हाला फोन केला. मला तुमची बहीण समजा.. आणि कृपया माझ्या गावाचा तसेच माझ्या आई-वडिलांचा शोध घेऊन मला कळवा. मी 20 जुलैला भारतात येत आहे.”
हेही वाचा – मला माहेर हवे… स्मिताताई आणि अंजलीचे स्नेहबंध
“ठीक आहे, एवढ्या विश्वासाने आणि एवढ्या लांबून तुम्ही मला फोन केला तर मी माझे प्रयत्न करीन,” असं म्हणून मी फोन खाली ठेवला. आता अग्रलेख लिहिण्याचा माझा मूड गेला. मी उपसंपादक गिरीशला बोलावले आणि हा अग्रलेख पूर्ण करायला सांगितला.
आता अमला शेखने सांगितलेल्या गोष्टींचे पुनरावलोकन करू लागलो –
1) कोल्हापूरजवळचे गाव असावे, कारण ती अंबाबाईच्या देवळात आणि मोठ्या तलावावर म्हणजे रंकाळ्यावर गेली असावी.
2) घरात मोडकं-तोडकं मराठी आणि आजूबाजूला कन्नड बोलत असत, म्हणजे निपाणीच्या आजूबाजूचा भाग असावा.
3) तिच्या घराच्या आजूबाजूला तंबाखूची आणि उसाची शेती होती. म्हणजे पुन्हा निपाणीचा भाग असावा.
4) अमला तिच्या आई-वडिलांबरोबर उरूसला गेली होती, तेव्हा तिला पळवले गेले. असे उरूस निपाणी-मिरज या भागांत असतात. म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती भाग असावा.
पुन्हा एकदा अमलाचा फोन आला, तेव्हा तिने आणखी माहिती दिली… अमलाची आई वखारीत विडी वळायला जायची आणि बाबा सदू कुठल्यातरी गॅरेजमध्ये काम करायचा! अमलाने एवढ्या विश्वासाने आपल्याला फोन केला, तिचे पालक शोधण्यासाठी आपण शक्यतो प्रयत्न करूया, असे मनाशीच ठरवले आणि त्यानुसार निपाणी जाऊन हरीभाऊंची भेट घेणार होतो.
हरिभाऊ हे निपाणीत छोटेसे हॉटेल चालवत होते, पण ते कथा-कादंबऱ्या लिहिणारे लेखक होते. त्यामुळे त्यांचे माझ्या कार्यालयात वारंवार येणे-जाणे होते. ऑफिसमधील जुना कर्मचारी आणि एकदम विश्वासू असलेल्या भगवानला सोबत घेऊन सकाळी नऊ वाजता मी निपाणीला रवाना झालो. तासाभरात हरिभाऊंच्या हॉटेलसमोर गाडी लावली. हरीभाऊ काऊंटरवर बसलेलेच होते. मला पाहताच त्यांना आनंद झाला.
हरीभाऊ – “काय संपादक, आज कुठे वाट चुकला?”
मी – “येऊया म्हटलं, लेखकाचं नवीन लिखाण वगैरे पाहू…”
हरीभाऊ – “माझी नवीन कादंबरी तयार आहे. दिवाळी अंकात छापणार का बोला?”
मी – “तुम्हाला माहीत आहे हरिभाऊ, मी कार्यकारी संपादक. दिवाळी अंकाची जबाबदारी जोंधळे मॅडमवर. तुम्ही तिलाच विचारा.”
हरीभाऊ – “ती तुमची जोंधळे मॅडम काही दाद देत नाही… सोडा. काय कसं काय इकडे येणे केलेत?”
मी – “हरीभाऊ, मला काल अचानक दुबईवरून फोन आला, कोणीतरी अमला शेख म्हणून…”
…आणि कालचा सर्व प्रकार हरिभाऊंना मी कथन केला.
“हरीभाऊ, एकंदर तिच्या बोलण्यावरून ती निपाणी भागातली असावी, असा माझा अंदाज आहे,” मी म्हणालो.
“आईपासून एवढी चार-पाच वर्षाची मुलगी पळवून नेली जाते आणि कुणाची तरी बेगम होते. आपल्या देशातून अशा कितीतरी मुली पळवून नेल्या असतील!” हरीभाऊंनी गंभीर विषयालाच हात घातला. “अशा बातम्या माझ्या कानावर येतात. त्यावर मी आमच्या पेपरमध्ये कधीतरी लिहिन, पण सध्या तरी या अमलाला तिचे आई-वडील भेटू दे…”
हेही वाचा – माहेर : मी आणि माझं लेकरू!
“तिची आई वखारीत काम करायची म्हणता? आणि तिचा बाबा गॅरेजमध्ये. मग त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत का?” हरीभाऊंनी विचारलं. “तिच्या बाबाचं नाव सदू आणि आईचं नाव लक्ष्मी…” मी माहिती दिली.
“म्हणजे ही सद्याची पोरगी की काय? अरे, या गॅरेजमधले सर्व लोक आमच्या हॉटेलला चहापाण्याला येतात. पण सद्या बहुतेक चार-पाच वर्षांपूर्वी मेला. पण त्याच्या बायकोचं नाव लक्ष्मी आहे का, हे माहिती नाही मला…” हरीभाऊ बोलत होते. “सद्या हा लिंगनूरचा. त्याचा पत्ता घेण्यासाठी आपल्याला लिंगूरला जावं लागेल,” हरीभाऊंनी माहिती दिली.
“हरीभाऊ मग जायचं का लिंगनूरला?”
“हो जाऊ की, आपले आनंदराव आहेत तिथे आपले मित्र. तेना सर्व गावची माहिती असणार!”
“मग चला तर हरिभाऊ…” असं म्हणून आम्ही गाडीत बसून लिंगनूरला निघालो. निपाणीपासून आठ दहा किलोमीटरवर असलेल्या लिगनूरमध्ये तंबाखू आणि उसाचे मळे दिसत होते. ‘…म्हणजे अमलाने सांगितलेले वर्णन बरोबर आहे,’ मी मनाशीच म्हणालो. अर्ध्या तासात आनंदरावांच्या घरासमोर आलो.
आनंदराव दारातील झाडांना पाणी घालत होते. हरीभाऊंना पाहताच ते मोठ्याने ओरडले… “काय लेखक आज इकडे कुणीकडे?”
हरिभाऊ – “यावं म्हटलं तुमच्याकडे, यांची ओळख करून देतो, हे प्रवीण कागलकर…”
आनंदराव – “म्हणजे संपादक म्हणा की!”
हरीभाऊ – “होय, होय… आपले संपादक. त्यांचे काम आहे तुमच्याकडे. तुमच्या गावात सदू नावाचा एक मेकॅनिक होता बघा… निपाणीत गॅरेजमध्ये कामाला!”
आनंदराव – “व्हता की, पण चार वर्षांपूर्वी मेला तो. आता त्याची बायको आहे लक्षुमी. एक पोरगा होता गुंडू, तो दारू आणि बहुतेक एड्सने गेल्यावर्षी मेला. आता लक्षुमी हाय इकडं तिकडं फिरते… पर तिचं डोस्क जाग्यावर नाय. तिला गावातल्या लोकांनी मेंटल हॉस्पिटलमधी ठेवलं व्हतं, सा म्हहिने व्हती आत, पन काय उपेग नाय…”
“फार पूर्वी तिची मुलगी लहान असताना बेपत्ता झाली होती का?” मी विचारलं.
“व्हय की, तेस्नी गंगी नावाची लेक व्हती, लक्षुमी सारखी देखणी लेक तिची. पन लक्षुमी आणि सद्या या दोन पोरांना घेऊन उरूसमधी गेले व्हते. पन एक फुगेवाला की काय दिसला म्हणून गंगी हात सोडून धावली, आणि तेस्नी पळवील हो कोनी…”
हरीभाऊ – “तीच गंगी दुबईत गेली, म्हणजे तिला दुबईत नेलं गेलं आणि चौदा वर्षांची होताच एका शेखला विकलं गेलं…”
आनंदराव – “काय म्हणता! हे कोनी सांगितलं?”
मी – “तिचा काल दुबईवरून फोन आलेला…”
मी अमला शेखच्या फोनची माहिती दिली. आनंदराव म्हणाले, “…म्हणजे लक्षुमीची लेक दुबईत पोचली! काय आणि किती पोरींना असं पळवी त्यात कोण जाणे?”
“तिला आपल्या आई-वडिलांना भेटायचं आहे. म्हणून तिने आपल्या आई-वडिलांचा शोध घ्यायला मला पाठवलं. एका प्रदेशातल्या आपल्या बहिणीला मदत करावी म्हणून मी यात पडलो. ती या निपाणी भागात असावी, याचा अंदाज आल्याने मी हरीभाऊंना गाठलं…”
आनंदराव – “किती हाल झाले असणार गंगेचे? काय काय भोगाव लागलं असेल तिला! त्यावेळी सद्यानं पोलिसात तक्रार दिलेली, पन काय बी उपेग झाला न्हाई.”
“मला वाटते आपण लक्ष्मीचं घर पाहू. मला लक्ष्मीला पण लांबून तरी बघायचं आहे…”
आनंदराव – “चला हरीभाऊ… चला संपादक…”
सर्वजण माझ्या गाडीत बसले. आनंदराव सांगत होते त्याप्रमाणे गाडी नेली. शेवटी झोपडपट्टीसदृश्य वस्ती दिसू लागली. तसे आनंदरावांनी मला गाडी थांबवायला सांगितले. मग गाडीतून उतरून पुढे आनंदराव, मागून मी, हरीभाऊ आणि भगवान चालत होते. आनंदराव पुढे जाऊन एका झोपडीसमोर थांबले. ‘लक्षमे, ए लक्षमे…’ अशा हाक मारत राहिले. दारात अंदाजे 60 वर्षांची लक्ष्मी उभी राहिली. उभं पाचवारी विटलेलं लुगडं, विटलेली चोळी, कित्येक दिवसांत न विंचरलेले केस…
आनंदराव – “लक्षुमे, ह्ये बघ कोल्हापूरमधून पाव्हणं आलेत. तुझ्या लेकीला घेऊन येणार हायेत म्हणे…”
लक्ष्मी – “माझी कोन लेक न्हाई, व्हता एकच गुंडू, तो वर गेल्ला…”
आनंदराव – “लक्षुमे, तुला एक लेक व्हती, उरुसात नाहिशी झाली… तेस्नी पळवलं कोणीतरी…”
लक्ष्मी – “माझी कोन लेक न्हाई. माझा एकच गुंडू…”
‘गुंडू… गुंडू…’ म्हणत लक्ष्मी मोठमोठ्याने आक्रोश करू लागली.
आनंदरावांनी सर्वांना ‘चला’ अशी खूण केली आणि आम्ही गाडीत बसलो.
आनंदराव – “लक्षुमीची अशी परिस्थिती हाये. ती आपल्याला लेक व्हती, हे मानायलाच तयार नाही.”
“आता तिची लेकच प्रत्यक्ष समोर आली की, मग ती तिला ओळखते का पाहू! कदाचित तिला काही आठवेल सुद्धा.” मला आशा होती.
आनंदरावांना त्यांच्या घरी सोडून आणि हरीभाऊंना निपाणी सोडून मी आणि भगवान कोल्हापूरकडे निघालो.
क्रमश:
मोबाइल – 9307521152 / 9422381299



पुढे अमलाचे काय झाले ? लक्ष्मीने तिच्या लेकीला ओळखले का ? उत्सुकता पुढील भागाची …🥹