संजीव कुमार, शबाना आझमी, राकेश रोशन आणि सारीका यांच्या अभिनयाने नटलेला ‘देवता’ नावाचा सिनेमा आठवतोय? त्याच सिनेमातील किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या तलम आवाजातील नितांत सुंदर गाण ‘गुलमोहर गर तुम्हारा नाम होता, मौसम-ए-गुल को हँसाना भी हमारा काम होता…’ आहे न रेशमी वस्त्र ल्यायल्यासारखे गर्भरेशमी गाणे? हे गुलजार या मनस्वी संवेदनशील कवीचे पिवळ्या गुलमोहरासारखे सोनसळी शब्द आहेत आणि त्यावर आपल्या रेशमाच्या जरतारी तारांनी साज चढवला आहे, गुलजार इतक्याच हळव्या आणि नाजूक दिलाचे संगीतकार आर. डी. बर्मन यांनी. काय एकेक शब्द आहेत गुलजार यांचे! एखाद्या झाडाविषयी सुद्धा इतकं समरसून लिहावे? आणि त्यावर कोटीचा संगीताचा साज चढवावा तो आर.डी. यांनीच! तो जो मधे सॅक्सोफोन वाजतो ना, ते इतकं अप्रतिम वाटतं ऐकायला की, कितीही अरसिक माणूस असला तरी, ते सूर ऐकून दोन ओळीच मनातल्या मनात का होईना, पण नक्कीच गुणगुणल्याशिवाय राहणार नाही. इतकी शब्दांची ताकद आणावी ती गुलजार यांनीच… आणि त्याला तितक्याच ताकदीचं संगीत देऊन अजरामर करावं ते फक्त आणि फक्त आर. डी. यांनीच! मी या जोडगोळीला नेहमी संगीतामधले आर.डी. एक्स म्हणते कारण या जोडगोळीने आपल्या अनेक हरकतींनी आणि कारवायांनी विविध गाणी तयार करून हिंदी चित्रपटसृष्टी पदोपदी घायाळ केलेली आहे. या जोडगोळीची कैक गाणी थेट मनाला भिडणारी आहेत आणि अजूनही ती गाणी ऐकली की, आपण तितकेच आर्ततेने ती गाणी म्हणतो किंवा ऐकतो… असे या आ. डी. एक्सचे एकसे एक संगीतमय रेशमी आवाजांचे अन् जादुई शब्दांचे धमाके आहेत की, त्यामधून आपण कधीही सावरणार नाहीत.
हेही वाचा – Nostalgia : निगाहें मिलाने को जी चाहता हैं…
निसर्गातील कैक गोष्टी रोज आपणही पाहतो, परंतु गुलजार यांच्यासारखी सौंदर्य जोखण्याची दृष्टी आपल्याजवळ नाही. आपल्या शब्दांनी हा माणूस रसिकांना जखडून ठेवतो, खरंच!! आजच्या पिढीलाही या माणसाने भुरळ पाडली आहे. मला वाटत गुलमोहरवरचं हे गाणं त्यांना घरासमोर त्यावेळेस असलेल्या गुलमोहराच्या झाडावरून सुचलेले असावे. जे झाड त्याच्या शब्दांनी अजरामर होऊन गेले. त्यानंतर कैक कविता, लेख या गुलमोहरावर आले असतीलही, परंतु गुलजार ते गुलजारच! त्यांच्यासारखे तेच! नंतर बीएमसीवाल्यांनी गुलजार यांना मोहवणारे ते झाड पाडले म्हणे… ते पाहून त्यांच्यासारख्या संवेदनशील कवीला किती यातना झाल्या असतील नाही?
‘देवता’ या सिनेमातील गाणे ‘गुलमोहर गर तुम्हारा नाम होता…’ जे सारीका आणि राकेश रोशन यांच्यावर चित्रित झाले आहे. या गाण्यात पिवळ्या लॅान्ग फ्रॅाकमधील घाऱ्या डोळ्यांची सारीका आणि तितकाच रोमँटिक घाऱ्या डोळ्यांचा राकेश रोशन खूप छान वाटले आहेत. मी गुलमोहर आणि बहावा या झाडांच्या जोडीवर एक लेख लिहिला होता, याच गाण्याचे शीर्षक घेऊन “गुलमोहर गर तुम्हारा नाम होता’ ते याच गाण्यामधील या जोडगोळीला समोर ठेवून… पिवळ्या लॅान्ग फ्रॅाकमधील सारीका मला बहाव्याच्या सुंदर, नाजूक आणि सोनसळी रुपासारखी भासते या गाण्यामध्ये! आणि तिचे रूप पाहून राकेश रोशनला असं वाटत असावं की, या पिवळ्या बहाव्यापेक्षा तिचे रूप गुलमोहरासारखे आरक्त आणि लाजेने चूर झालेले असावे… काय तरी एकेक आपापल्या कल्पना! परंतु ते काहीही असो बहावा आणि गुलमोहर, ही दोन्ही झाडं सौंदर्याने नटलेली आणि कवीमनाला वेड लावणारी आहेत, हे मात्र निश्चित!
गुलमोहरावर आम्हाला मराठीमध्ये एक धडा होता.,, बहुतेक मी आठवीत असताना तो शिकवला गेला… मला निश्चित आठवत नाही आता, परंतु तो अभ्यासक्रमात जेव्हा शिकले तेव्हापासूनच मी या झाडाच्या मोहात पडले. त्या लेखकाने गुलमोहराच्या पानांची तुलना मोरपिसाच्या रेशमी स्पर्शाशी केली होती. तो धडा वाचनात आल्यानंतर, आमच्या शाळेच्या आवारात एक गुलमोहराचे झाड होते, त्याच्या खाली झुकलेल्या एखाद्या फांदीवरून हात फिरवून तो मऊसर स्पर्श मी अनुभवायची. खरचं, गुलमोहराची पान खूपचं नाजूक आणि तलम असतात.
माझ्या मनामध्ये स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या या वृक्षाने असे अढळपद मिळवलं आहे. लहानपणी एखादी गोष्ट मनाला भावते ती आपली नेहमी हृदयस्थ असते नाही का? माझ्या वाढत्या वयासोबत मनातील हा गुलमोहरही बहरला. मुळचे साऊथ आफ्रिकेतील मादागास्कर येथील हे झाड आपल्याकडे मुंबईत शिवडी येथे प्रथम निदर्शनास आले. त्यानंतर या झाडाच्या सौंदर्याने आपल्या येथील रस्त्यांना, बंगल्यांना, बगिच्यांना सुशोभित केले. महाराष्ट्रातील सातारा येथे तर दरवर्षी 1 मे रोजी खास ‘गुलमोहर’ उत्सव साजरा केला जातो. यावर मग तिथे निसर्गप्रेमी, कवी, चित्रकार, फोटोग्राफर सगळे भेट देऊन गुलमोहराचे गुणगान करण्यात रमलेले दिसतात.
हेही वाचा – तोडली बंधने अन् सुटले भोग…
मला गुलमोहराविषयी विशेष आकर्षण आहे, कारण लहानपणापासूनच हे झाड माझ्या मनात घर करून होते आणि माझे लग्न झाल्यावर माझ्या सासरी अंगणामध्ये माझ्या सासुबाईंनी, त्यांनी जेव्हा घर बांधले होते तेव्हा लावलेला गुलमोहर जणू माझी वाटच पाहात होता. दोन बाजूला दोन मोठ्ठी नारळाची झाडं आणि फाटकाला लागून समोरच हा रेशीमस्पर्शी गुलमोहर… त्यामुळे त्या घराला शोभा होती. कालांतराने सासू-सासरे गेले आणि त्या अंगणातल्या गुलमोहराची सावलीदेखील हरवली. अशा अनेक सुखदुःखाचा साथीदार असलेला हा गुलमोहर वृक्ष मला दिसला की, मी वेडावते. सहज शक्य असेल तर, त्याला स्पर्शदेखील करून पाहते. परंतु आताच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये निसर्गाप्रती सहजीवन हरवले आहे. आता मी हा गुलमोहर फक्त बाहेर जंगलात, अथवा एखाद्या रस्त्याच्या कडेला किंवा हॉटेलच्या बाहेर सुशोभीकरण करण्यासाठी लावलेला पाहाते. कुठेही गुलमोहर वृक्ष पाहिला की, त्याच्याबद्दल असलेल्या अनेक संमिश्र आठवणी माझ्या मनात रुंजी घालत असतात. अशा अनेक आठवणींनी माझ्या मनातील गुलमोहर बहरलेला असतो.


