आराधना जोशी
नवीन वर्ष सुरू झाले की, बहुतांश सर्वांच्याच नजरा गणेशोत्सवाकडे लागलेल्या असतात. तसं पाहिलं गेलं तर, पावसाळ्याला होणारी सुरुवात ही सण-उत्सवांची सुरुवात असते. आपला भारत देश कृषीप्रधान देश असल्याने पावसाचा शिडकावा उन्हाच्या काहिलीने त्रासलेल्या जीवाला जसा आल्हाददायक असतो, तसाच धरणीमातेसाठी देखील! या काळात सर्वत्र दिसणारी हिरवाई मन प्रफुल्लित करणारी असते. सणावारात हाच आनंद विविध उत्सव साजरा करताना दिसतो.
दहिहंडी, गणपती झाले की, तरुणाईला वेध लागतात ते नवरात्रीचे. रास गरबा, दांडिया खेळायला उत्सुक असणारी तरुणाई गणपती विसर्जनापासूनच याची तयारी सुरू करताना दिसते. नऊ रात्रींसाठी असणारे वेगवेगळे पोशाख, त्यावर मॅचिंग दागदागिने, मोजडी, अलीकडे वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू यांनी तरुणाईला आकर्षित केलं आहे. पण दुसरीकडे, याच काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भोंडला, हादगा किंवा भुलाबाईचा खेळ खेळला जातो आणि हल्ली मुंबईसारख्या शहरांमध्येही नव्या पिढीला याची ओळख व्हावी, यासाठी अनेक ठिकाणी याचे आयोजनही केलं जातं. माझ्या लहानपणी भोंडला खेळणं आणि त्यानंतर केलेली खिरापत ओळखणं खूप मजेदार असायचं.
सूर्याने हस्त नक्षत्रात प्रवेश केला की, गावागावांमध्ये लगबग सुरू होते ती हादग्याची किंवा भोंडल्याची! हा सण मुलींच्या विशेष आवडीचा मानला जातो. हा एक पर्जन्यविधी म्हणूनही ओळखला जातो. आश्विन महिन्यात हस्त नक्षत्र सुरू झाले म्हणजे हत्ती पाण्यात बुडेल इतकाच पाऊस पडावा, अशी अपेक्षा असते; कारण याच काळात परतीचा पाऊस सुरू झालेला असतो. हस्त नक्षत्राचा प्रारंभ झाला किंवा नवरात्रीचे घट बसले की, पुढचे सोळा दिवस या हदग्याची धूम असते.
हादग्याच्या खेळात जमिनीवर किंवा पाटावर रांगोळीने किंवा धान्याने हत्तीचे चित्र काढतात. रंगीबेरंगी फुलांच्या माळा घालून त्या चित्रातल्या हत्तीला सजवतात. कधी त्या हत्तीला रांगोळीच्या ठिपक्यांची झूलही घातलेली असते. नंतर त्या हत्तीच्या भोवती फेर धरून मुली काही विशिष्ट गाणी म्हणतात. त्यांना ‘हादग्याची गाणी’ असे म्हटले जाते. ‘ऐलमा पैलमा गणेशदेवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा’ हे हादग्याचे एक प्रसिद्ध गाणे. सोळा दिवसांच्या कालावधीत रोज एकेका गाण्याची भर पडते. म्हणजे, पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन, असे करत सोळाव्या दिवशी सोळा गाणी म्हटली जातात. पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो म्हणून याचे महत्त्व विशेष आहे. ‘बहु उंडल’ असा ‘भोंडला’चा अपभ्रंश आहे, असेही काही ठिकाणी मानले जाते. हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो.
हेही वाचा – आयुष्यातले सुगंध… सुगंधी आयुष्य
भोंडल्याच्या या सोळा दिवसांत मुली आळीपाळीने एकमेकींच्या घरी जमून हा गाणी गाण्याचा कार्यक्रम करतात. जिच्या घरी हादगा, तिच्या घरी खिरापत असते. गाणी जशी वाढतात, तशा खिरापतीही वाढतात. खिरापतीसाठी रोज वेगळा पदार्थ असल्यामुळे सोळाव्या दिवशी सोळा पदार्थांची खिरापत असते. खिरापत वाटण्यापूर्वी ती कोणती, हे ओळखण्याचा एक कार्यक्रम असतो. त्यावेळी मुलींची प्रश्नोत्तरे होतात आणि ती खूपच मनोरंजक असतात. खिरापतीसाठी केले जाणारे पदार्थही चटकन ओळखता न येणारे असे असतात. हे पदार्थ करताना घरातल्या सुगरणीचे पाककौशल्य आणि नवनवीन पाककृती करण्याचे कसब पणाला लागते. पण यातही पोषणमूल्य असलेल्या साध्या पण रुचकर पदार्थांची रेलचेल असते. जी मुलगी ही खिरापत अचूक ओळखेल तिला त्या दिवशी बक्षीस म्हणून दुप्पट खिरापत मिळते.
हा खेळ मुलींचा म्हणून ओळखला जात असला तरी बायकाही यात सहभागी होतात. माहेरच्या माणसांची स्तुती करतानाच सासरची माणसं कशी द्वाड आहेत हे गाण्यांमधून सांगताना काही काळ का होईना पण रोजच्या विवंचना, ताणतणाव विसरायला मदत होते.
महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी प्रसिद्ध असलेला भोंडला, विदर्भात भुलाबाईच्या उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जातो. तिथे भुलाबाई ही मुलींनी करावयाची पूजा आहे. पश्चिम महाराष्ट्रात भोंडला किंवा हादगा (हातगा) हा धार्मिक स्वरूपाचा खेळ म्हणून खेळला जातो, तर खानदेशात या पूजेला गुलाबाई असे म्हणतात. तिथे ‘गुलोबा’ देखील म्हटले जाते. काही बोलीभाषांमध्ये भुलाबाईला ‘भुलाई’ म्हणतात. भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी गुलाबाईची चित्रे आणि मातीच्या मूर्ती बाजारातून आणल्या जातात, त्याचबरोबर भोपळा, वांगी, काकडी, मक्याचे कणीस, मुळा, गाजर, कारले, मिरची, घेवडा, दोडके, पडवळ, सीताफळ अशा प्रकारची फळे, भाज्या एकत्र करून गुलाबाईची पूजा करण्याची पद्धत आहे. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी या उत्सवाची सांगता होते.
अशा प्रकारची देवीची पूजा आणि उत्सव हा महाराष्ट्राचा एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे आणि आजही तो ग्रामीण भागात पूजा आणि लोकगीतांच्या माध्यमातून जपला जात आहे, ही एक चांगली बाब आहे. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि डॉ. सरोजिनी बाबर यांनी भोंडला आणि हादग्याची गाणी याविषयी आपल्या साहित्यात लेखन केले आहे. हादगा म्हणजे निसर्गाच्या शक्तीची उपासना असल्याचे मत डॉ. सरोजिनी बाबर यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी हादग्याची अनेक सुंदर गाणी जमा केली आणि ती प्रकाशित करून लोकसाहित्यात मोलाची भर घातली आहे.
हेही वाचा – प्रसिद्धी मिळविण्याचा शॉर्टकट
हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन ओळखी करण्याचे प्रयत्न सुरू असतात. पण आपल्याकडचे अनेक सण हे याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. हादगा किंवा भोंडला खेळायला येणाऱ्या नव्या नवरीला आपल्या आजूबाजूच्या घरातल्या इतर बायका मुलींची ओळख या अशाच खेळांमधून तर होते. आज गरब्याच्या तालावर भान हरपून नाचणाऱ्या मुली आणि हदग्याच्या खेळात फेर धरणाऱ्या मुली यांच्यात काही काळाचा विरंगुळा हा घटक सामाईक आहे.
आड बाई आडवनी
आड बाई आडवनी
आडाच पाणी खारवणी
आडात होता गणोबा
गणोबा देव चांगला
गणोबा आमचा सत्याचा
पाऊस पडला मोत्याचा
आड बाई आडवणी
आडाच पाणी खारवणी
आडात पडला शिंपला
आमचा भोंडला संपला…
असं म्हणून भोंडला किंवा हादगा संपत असला तरी, या सोळा दिवसांत मिळालेली ऊर्जा पुढील वर्षीच्या हादग्यापर्यंत पुरणारी असते!


