मी कितीतरी वेळ त्याचा निस्तेज हात हातात घेऊन बसलो होतो, तो डोळे उघडण्याची वाट बघत. एका उद्ध्वस्त गडकोट किल्ल्याप्रमाणे त्याचा देह हॉस्पिटलमधील त्या अवाढव्य बेडवर पसरला होता. कितीतरी नळ्यांच्या आधारे तो सध्या जगत होता. आजूबाजूला असलेल्या विविध यंत्रांचा जागता पहारा त्याच्या तब्येतीवर बारीक लक्ष ठेऊन होता.
हाच का तो संदीप? माझा एकेकाळचा घनिष्ठ मित्र. आमचे स्वभाव परस्पर विरोधी असून देखील एकमेकांशिवाय चैन पडायचे नाही आम्हाला! कॉलेजात असताना आमच्यात अगणित वेळा निकराची भांडणे झाली आणि तरी देखील दुसऱ्या दिवशी माफी मागून आमची मैत्री सुरूच राहिली. संबंध कॉलेजमध्ये आमची मैत्री हा कुतूहलाचा विषय बनून राहिली कायम .कॉलेजचे शेवटचे वर्ष, शेवटचा महिना… सेंडॉफचा कार्यक्रम जवळ आला होता. आयुष्याच्या एका टप्प्यावरून आम्ही पुढे सरकणार होतो आणि आपल्या स्वप्नांना बळ देऊन कर्तृत्वाच्या उंच आभाळात आम्ही अभिमानाने झेपावणार होतो.
ज्या प्रोफेसरने आम्हाला कॉलेजची सगळी वर्षे परीक्षेच्या वेळी रडवले होते, त्याला रडवण्याचा एक गुप्त कार्यक्रम संदीप आखत असल्याची बातमी मला कोणीतरी कळवली आणि मी हादरून गेलो. खरंतर, आम्हाला मार्क्स देताना त्या प्रोफेसरने खूप अन्याय केला होता, पण तरीही शेवटी कॉलेजच्या बाहेर पडताना आमच्या नावावर कोणताही धब्बा लागू नये, या दृष्टीने मी संदीपला त्याच्या डोक्यातून ही भन्नाट, पण तितकीच जोखिमीची कल्पना काढून टाकायला पदोपदी विनवत होतो. पण तो हट्टालाच पेटला होता आणि तिथेच आमच्या दोघात शत्रूत्वाची ठिणगी पडली. टोकाचे वाद झाले आणि त्या दिवसापासून आमची मैत्री कायमची तुटली, ती आजतागायत…
हेही वाचा – दुसऱ्यांना जगण्याची ताकद देणारा ‘अन्नसोहळा’
गेल्या आठवड्यात मला राहुलचा फोन आला होता, संदीप भीषण अपघातातून जेमतेम वाचल्याचा आणि त्याने मला भेटायची इच्छा व्यक्त केल्याची बातमी देणारा…
नियतीच्या मनात काय चालले आहे, ते खरंच कोणाला कळत नाही हेच खरे. आम्ही दोघेही आता पन्नाशीकडे झुकलो होतो. आपापल्या आयुष्यात व्यवस्थित स्थिरावलो होतो. पण आज त्याच नियतीने आम्हाला जवळ आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मी मनगटावरचे घड्याळ बघितले. मला संदीपच्या जवळ बसून चार ते पाच तास झाले होते. मी तो कधी डोळे उघडेल याबाबत विचारणा केली आणि तिने खुणेनेच मला आणखी थोडा वेळ थांबण्याची विनंती केली.
माझ्या हाताला काहीतरी हलल्याची जाणीव झाली. मी हाताकडे बघितले तर संदीपच्या बोटांची किंचित हालचाल होत असल्याचे मला जाणवले आणि माझ्या अंगावर काटा उभा राहिला. पुढच्या काही क्षणातच त्याचे निस्तेज फुलापरी झालेले डोळे उघडले… आमची नजरानजर झाली आणि मला हुंदका फुटला. त्याच्या चेहेऱ्यावर ओढूनताणून आणलेलं मंद हसू होते. मी माझ्या दुसऱ्या हाताने त्याच्या हाताला थोपटू लागलो. काही क्षण असेच गेले आणि संदीप बोलू लागला…
“चल आज परत पंजा लावूया! मीच जिंकणार शंभर टक्के.”
गेल्या पाच तासांत मी पहिल्यांदाच खळखळून हसलो आणि त्याच्याशी बोलायला लागलो. “संदीप, तू आधी पूर्ण बरा हो. ज्या दिवशी तुला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल,, त्या दिवशी आपण पंजा लावूया… मी तसे आज वचन देतो तुला. जवळपास तीस वर्षे उलटून गेली आपले कॉलेज संपून पण तुझ्यातील खुमखूमी काही जात नाही… आजही मला आव्हान देण्याच्या तुझ्या ईर्षेला खणखणीत सलाम. कॉलेजची सगळी वर्ष तू दादागिरी करण्यात घालवलीस. आज शहरातील एक प्रथितयश आणि नामांकित बिल्डर म्हणून तू प्रसिद्ध आहेस. पण आपल्या मैत्रीचा आगळावेगळा पूल मात्र तुला मजबूत ठेवता आला नाही. आपला शेवटचा वाद आठव… कॉलेजच्या शेवटच्या काही दिवसांतील… आपण दोघेही हट्टाला पेटलो होतो आणि आपापल्या भूमिकेवर ठाम राहिलो आणि तिथूनच आपल्या मैत्रीचा परतीचा प्रवास कधी सुरु झाला ते आपल्या दोघांनाही कळले नाही. तुझ्या बातम्या नंतर कानावर पडत होत्या, पण मीच त्या ऐकल्या न ऐकल्यासारख्या केल्या… आपापल्या विश्वात आपण गुरफटून गेलो… तुझा राजकीय आणि सामाजिक दबदबा मी ऐकून होतो. तुझं यश डोळे भरून पण लांबूनच पाहात होतो. कोणालाही विश्वास बसला नसता की, मी तुझा एकेकाळचा जिगरी दोस्त आहे, हे ऐकून!”
हेही वाचा – विचार, संस्कार अन् जीवनमूल्यांचं कुंपण…
“तुझ्या माझ्या मैत्रीच्या वाटा खरं तर खूप वर्षांपासूनच कायमच्या गोठलेल्या होत्या. पण आठवड्यापूर्वी राहुलचा फोन आला आणि त्या वाटा पूर्ववत करण्याची तुझी इच्छा असल्याचे राहुलने सांगितले आणि माझा माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता… संदीप आजपासून आपण दोघे मिळून त्या गोठलेल्या वाटांवरून परत एकदा नव्याने चालण्यासाठी पहिल्यासारख्या करण्याचा मनापासून प्रयत्न करूया! उद्यापासून मी रोज येत जाईन तुला भेटायला ऑफिसातून घरी जाताना. इथे कमावलेले इथेच सोडून जायचे असते प्रत्येकाला मग जाताना शत्रूत्वाचे ओझे कशाला घेऊन जायचे बरोबर, खरं की नाही? त्याप्रेक्षा आपल्या जिवलग मैत्रीचे सुंदर मंदिर बांधूया परत आपण. आता तुला या आजारातून ठणठणीत बरं करण्याची जबाबदारी माझी. चांगल्या कामाला उशीर नको. उद्यापासूनच मी माझ्या या नवीन कामाला सुरवात करणार आहे.”
जसजसा माझा आश्वासक आवाज त्याच्या कानी पडत गेला, तसतसा संदीप रडायला लागला. त्याला जवळ घेऊन मी त्याच्या डोक्यावर थोपटायला लागलो. एव्हाना गोठलेल्या वाटा वितळायला निश्चित सुरुवात झाली आहे, याची जाणीव मला झाली आणि त्याच आनंदात आणि समाधानात मी संदीपचा निरोप घेतला…


