अनिल बर्वेलिखित कादंबरी 1975 साली प्रसिद्ध झाली. त्यानंतर यावर नाटक आले. मी शाळेत असताना कधीतरी हे नाटक पाहिल्याचं आठवतं. विस्मृतीत गेलेलं हे पुस्तक माझ्या भावाने दिलेल्या ढीगभर पुस्तकांत दिसलं आणि न राहवून लगेच वाचून काढलं. लहानसं असल्याने लगेच वाचून झालं. कथावस्तू इतकी धरून ठेवणारी आहे की, पुस्तक खाली ठेववेना!
मुखपृष्ठावर एक मोठा काळा पंजा, त्यात अडकलेला दोर, पंज्याच्या मधोमध लाल रंगाचा डोळा आणि पंज्याला पेलून धरणारा हात… असे चित्र आहे. काळपुरुषाच्या हातातल्या कळसूत्री बाहुल्या असलेली मानव जात… त्यात एक कुणीतरी मरणाच्या डोळ्यांत डोळे रोखून त्याच्या विकराल पंजाचे आव्हान स्वीकारतो, मृत्यूला जिंकतो… मलपृष्ठावर लिहिले आहे की, ही कादंबरी माणुसकीचा जन्मोत्सव साजरा करते, मानवी कणवेच्या आणि करुणेच्या अंतिम विजयाची कुंकुमपताका फडकावते!
राजमहेंद्री तुरुंगाचा क्रूरकर्मा आयरिश जेलर मि. ग्लाड आणि फाशीचा नक्षलवादी कैदी वीरभूषण पटनाईक यांची ही कथा एक वर्षाच्या काळात घडते. मि. ग्लाड मूळचा आयरिश स्वातंत्र्यापूर्वीपासून याच जेलमध्ये जेलर होता. अठ्ठावीस वर्षे याच पदावर काम करून त्याने एकशे अठरा कैद्यांना फाशी दिली होती. त्याचा विलक्षण दरारा होता… इतका की, झाडे, पाने सुद्धा थरथर कापायची. वीरभूषण किंवा कैदी नंबर ‘आठ्सो बयालीस’ त्याच्या तुरुंगात येतो आणि त्याची फाशीची शिक्षा सुनिश्चित होते, याचा ग्लाडला आनंद होतो. एक नवे सावज मिळालेले असते. रोज एका कैद्याला मारून लाकडी दंड तोडायचा, त्याचा नियम होता. वीरभूषण साम्यवादी, दृढनिश्चयी स्वतःला क्रांतिकारक म्हणवणारा… शिक्षणाने सर्जन, कविता वाचणारा, लिहिणारा कैदी… तो ‘मि. ग्लाड’ असे पुकारतो तिथे संघर्षाला सुरुवात होते. मि. ग्लाडला तो नरपशू म्हणतो. नरपशू ते संवेदनशील माणूस हे रुपांतर या कादंबरीत आहे…
हेही वाचा – जापनीज वाइफ… अजब प्रेम की गजब कहानी!
वीरभूषणची पत्नी लहान मुलाला कडेवर घेऊन शंभर मैलांवरून अनवाणी चालत त्याला भेटायला जेलमध्ये येते, तेव्हा ग्लाड तिला दिवसभर तळपत्या उन्हात उभे ठेवतो, मग भेट करून देतो. त्याच्या समोरच वीरभूषण पत्नीला विचारतो, दयेचा अर्ज करायचा का? त्यावर ती ताडकन म्हणते, “कधीही नाही, जुलमी सत्तांधासमोर झुकायचं नाही.”
या वाक्याने ग्लाड बदलतो, भूतकाळात जातो. तो जर्मनीत असताना त्याची पत्नी मरियम, जर्मन ज्यू असल्याने गेस्टापो तिला घेऊन जायला येतात, तेव्हा तो गयावया करतो. त्यांच्या पायावर लोळण घेतो, तेव्हा ती त्याला मुस्कटात मारून म्हणते, “जुलमी लोकांसमोर गुडघे टेकतोस?” ग्लाडला सगळे आठवते. तो तिथून निघून जातो आणि ‘त्यांना कितीही वेळ भेटू दे,’ असे सांगतो.
ग्लाड कैद्यांना बेदम मारत असतो, ते गेस्टापोवरचा राग काढण्यासाठी. हा कैदी दयेचा अर्ज करत नाही, हे कळल्यावर तो किती कणखर आहे, ते त्याला समजते. वीरभूषण म्हणतो, ‘जी वेदना वांझ नसते, तिचे दु:ख करायचे नसते.’ कैदी त्याचे मृत्यूपत्र करतो. त्यात लिहितो की, ‘माझे शरीर माझी संपत्ती आहे. त्यामुळे एकेक अवयव गरजूंना देऊन मग शेवट मला मृत घोषित करावे.’ ग्लाड चक्रावतो, त्याला एकदा बेदम मारतो आणि दयेच्या अर्जावर सही करायला सांगतो. अर्जात तो स्वत: प्रथम इतक्या वर्षांत कैद्याची स्तुती करतो, पण कैदी बधत नाही, दयेचा अर्ज करत नाही…
ग्लाडची मुलगी जेनी जिच्यावर त्याचे अतिशय प्रेम आहे, बाळंतपणाला येते. ग्लाड त्याला विचारतो, “ती किती सुंदर असेल असं तुला वाटतं?” तो म्हणतो, “माझ्या मरणाइतकी!”
जेनी कैद्याला भेटायला येते, तेव्हा तिच्या कविता त्याला दाखवते. त्याच्या कवितांनी प्रभावित होते. शेवटच्या भेटीत त्याला सांगते की, “मला तुझ्यासारखा मुलगा हवा. तू माझ्यापोटी जन्म घे!”
नरपशू असलेला ग्लाड, त्याच्या पत्नीच्या मृत्यूचे दु:ख, जेनीवरचे प्रेम, प्रसुतीच्या वेळी तिच्या मृत्यूच्या भयाने गळपटून जाणारा अन् त्यानंतर बदललेला, कैद्यांना माणुसकीने वागवणारा, त्यांना न मारणारा ग्लाड…
त्याचवेळी दुसऱ्या दिवशी फाशी असतानाही शांत झोपणारा, कवितांची पुस्तके वाचणारा, कविता करणारा, ध्येयावर अपार श्रद्धा असलेला, शेवटी जेनीने आणून दिलेली धर्मावरची पुस्तके न वाचणारा… “तू मला काय देणार मरणाशिवाय? यू पेटी ब्युरोक्रॅट” असे ग्लाडला सुनावणारा वीरभूषण पटनाईक.
जेव्हा ग्लाड त्याला म्हणतो, “जीवन दुर्मीळ असतं.” तेव्हा तो म्हणतो, “जीवन दुर्मीळ असतं, पण हौतात्म्य दैवदुर्मीळ असतं.”
जेनी ग्लाडला सांगते की, “हा शूरवीर आहे. त्याला वीराला साजेल, असं मारण द्या.” त्यावर ग्लाडला असहाय्य वाटतं. सुरुवातीला त्याला या कैद्याला फाशी द्यायला मिळणार याचा आसुरी आनंद झाला होता… आता त्याला फाशी देण्याचे दडपण आलेले असते, हतबलता जाणवते.
हेही वाचा – माचीवरला बुधा : एकटेपण हाच कादंबरीचा गाभा
कादंबरीचा शेवट अनपेक्षित आहे. लेखकाने प्रत्येक पात्राला न्याय दिला आहे. जगण्याचा अर्थ सापडलेला वीरभूषण आणि अपराधी भावनेमुळे जगणे ओझे झालेला ग्लाड…
कादंबरी वाचताना मनाशी कवितेच्या ओळी दाटून आल्या, जणू या ओळी वीरभूषणसाठीच आहेत –
देऊन देऊ शकतोस तू काय
एक मरण
ते कारण मोलाचं दे
मृत्यू जरी अटळ असला
तरी त्यालाही कारण दे
जीवघेण्या प्रश्नांना
उत्तरे देणारी
आणि
आयुष्याला
अर्थ देणारी
एक मरण
ते कारण मोलाचं दे…


