सायली कान्हेरे
सकाळच्या नाश्त्यासाठी कांदेपोहे, उपमा, साबुदाण्याची खिचडी असे पदार्थ बहुतांश ठिकाणी केले जातात. त्यातही, पोह्यांना विशेष पसंती असते. पोहे देखील अनेक पद्धतीने केले जातात. कोळाचे पोहे हा कोकणातला एक पारंपरिक पदार्थ आहे. कोकण म्हटल्यावर नारळ मुबलक प्रमाणात… त्यामुळे हे पोहे करताना नारळाच्या दुधाचा वापर केला जातो. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. अनेक घरांमध्ये सणासुदीला कांदा, लसूण खात नाहीत. त्यामुळे या काळात हा पदार्थ घरात नाश्त्यासाठी करता येऊ शकतो. हा पदार्थ जरा हटके आहे आणि खूप चविष्ट लागतो. आंबट, गोड, तिखट चवीचे कोळाचे पोहे नक्की करून बघा.
साहित्य
- जाडे पोहे – 3 वाट्या
- नारळ – 1
- हिरव्या मिरच्या – 2
- सुक्या मिरच्या – 2
- चिंचेचा कोळ – 1/2 वाटी
- गूळ – 3/4 वाटी
- कोथिंबीर – 1/2 वाटी
- तूप – 2 चमचे
- जिरं – 1 लहान चमचा
- हिंग – 1 लहान चमचा
- कढीपत्ता – 4 पाने
- मीठ चवीनुसार
पुरवठा संख्या – 4 जणांसाठी
हेही वाचा – Recipe : खमंग कोबी पोहे अन् पास्ता सलाड
तयारीसाठी लागणारा वेळ –
- नारळ खवण्यासाठी आणि नारळाचे दूध काढण्यासाठी 20 मिनिटे
- चिंच भिजत घालून कोळ काढण्यासाठी 20 मिनिटे. (चिंच गरम पाण्यात भिजवावी)
- एकूण 40 मिनिटे
कृती
- नारळ खवून त्याचे 6-7 वाट्या दूध काढून घ्यावे.
- या दुधात चिंचेचा कोळ, गूळ घालावा.
- मीठ आणि हिरव्या मिरच्या एकत्रित वाटून या दुधाला लावाव्यात.
- त्यात गूळ पूर्ण विरघळवून घ्यावा.
- बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
- आता पोहे भिजवून ठेवावे.
- तूप तापवून त्यात जिरं घालावं. ते तडतडलं की, हिंग आणि सुक्या मिर्चीचे तुकडे घालावेत, कढीपत्ता घालावा. ही फोडणी नारळाच्या दुधाला द्यावी.
- आता खोलगट ताटलीमध्ये प्रथम पोहे घ्यावेत, नंतर त्यावर हे दूध घालावं.
- हे व्यवस्थित मिक्स करून त्याचा आस्वाद घ्यावा.
हेही वाचा – Recipe : झटपट स्वादिष्ट कॉर्न पुलाव
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.