सुनील शिरवाडकर
तरुण स्वामींचं प्रवचन संपलं. काही श्रोते जवळ येऊन पाया पडू लागले. थोड्या वेळाने तीही गर्दी कमी झाली. सुरुवातीला तरुण स्वामींना खूप संकोच वाटायचा. हे असं कोणी पाया पडायला लागलं तर… पण नंतर त्याचीही सवय झाली आणि आता तर असं झालंय की, कोणी पाया पडायला आलं नाही तर, त्यांनाच चुकचुकायला होतं.
तरुण स्वामींची पन्नाशी आता जवळ आली होती. बरीच वर्षे त्यांचं हे असं प्रवचन करत गावोगावी हिंडणं सुरू होतं. सध्या त्यांचा मुक्काम नाशकात होता. त्यांच्या गुरुंनी जेव्हा त्यांना नाशिकला जाण्याची आज्ञा दिली, तेव्हा त्यांचं मन जरा सैरभैर झालं.
बायको… मुलगा… संसार… या सगळ्यांचा त्याग करून आता बारा वर्षे झाली. या बारा वर्षांत ते नाशिकला गेलेच नाहीत. त्यामुळे प्रवचन देण्यासाठी नाशिकला जावं की, नाही असा त्यांना प्रश्न पडला. पण गुरुंची आज्ञाही ते डावलू शकत नव्हते. उद्या प्रवचनाचा शेवटचा दिवस. त्यांना वाटलं होतं, आठवड्यात एकदा तरी ‘ती’ येईल. रोज त्यांची नजर तिला शोधायची. ती अजून तिथेच रहाते… हेही त्यांना समजलं होतं. जावं का तिला भेटायला? बोलेल का ती आपल्याशी?…
0000000
बेल वाजली म्हणून तरंगिणीने दार उघडले…. तर समोर तरुण. बारा वर्षांनी तिनं तरुणला पाहिलं… पण तरीही एका नजरेत ओळखलं. बारा वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला आपला नवरा आज अचानक दारात येऊन उभा राहिला म्हटल्यावर तिला जरा धक्काच बसला!
हेही वाचा – गोलू आणि गोदाकाठची रथयात्रा
तरुण आता जरी ‘स्वामी’ होता तरी, तो साध्याच वेषात आला होता. पायजामा, शर्ट असा पेहराव. गुळगुळीत टक्कल केलेले डोके आणि मानेवर रुळणारी शेंडी… हीच काय त्यांची स्वामीपणाची ओळख! तरंगिणी आपल्याला घरात घेईल का, अशी त्याला शंका होती.
“तू…?”
“आत घेणारेस?”
“अं… ये… येना आत”
तरंगिणी पाठोपाठ तो आत आला. जरा वेळ तर दोघेही नि:शब्द होते. तोच सोफा, त्याच खुर्च्या, टी-पॉय, कपाट आणि… आणि तीच तरंगिणी! काही काही बदललं नव्हतं.
“तुझं असं हे अचानक येणं…”
“धक्का बसला ना… पण फक्त एक तास… मग मी जाईन…”
त्यांचं ते बोलणं ऐकून तरंगिणीला चीडच आली. ‘आलाच कशाला हा मग तासाभरासाठी? सगळं जुनं विसरायचा मी इथे अजून प्रयत्न करतेय… आणि हा आला!’
“दीपला भेटायला आलो गं… मोठा झाला असेल ना तो? मला तर अजून तो लहानगाच डोळ्यासमोर येतोय… त्याला बघावसं वाटतंय.”
“बाहेर गेलाय तो, क्लासला. पण येईलच इतक्यात…”
पुन्हा दोघे शांत. तरंगिणी जरी शांत होती… तरी तिच्या मनात खूप प्रश्न होते. बारा वर्षांत मनात साठलेले… पण कुठून सुरुवात करावी तिला कळत नव्हतं. खरंतर, तिला नवऱ्याशी एक शब्दानंही बोलावंसं वाटत नव्हतं; पण मनातलं विचारायला ही एकच संधी होती. ती चुकवावी असं पण वाटत नव्हतं.
“काहीच वाटलं नाही का रे तुला? दोन वर्षांच्या दीपला आणि मला सोडून तू अचानक गेला…”
“मला मन:शांती हवी होती, तिच्या शोधात…”
“मन:शांती? मिळाली का मग तुला ती? तू जेव्हा तुझ्या त्या मन:शांतीच्या शोधात होता ना, तेव्हा मी इकडे चिमुकल्या दीपला कुशीत घेऊन रडत होते…”
“सॉरी तरंगिणी…”
“सॉरी? फक्त सॉरी?… आपल्या मागे तरंगिणीनं काय केलं असेल? दीपला कसं सांभाळलं असेल? कसं वाढवलं असेल? बारा वर्षांत तुला एकदाही विचारावसं वाटलं नाही!…”
“वाटलं होतं… पुष्कळ वाटलं होतं… पण मोहपाशातून, संसारातील मुक्त होण्यासाठी तर मी बाहेर पडलो होतो ना? एकदा साधक बनल्यावर तशी परवानगी नसते गं”
हेही वाचा – ऋणानुबंध… विमान ते फायटर विमान
“अरे, परवानगी नसते, पण मन नावाची काही गोष्ट असते की नाही?”
तरुणने तो विषय टाळायचा प्रयत्न केला. आल्यापासून मनात खदखदत असलेला प्रश्न त्यानं अचानक विचारुन टाकला-
“लग्न केलंस पुन्हा?”
“लग्न?… तुझा काय अंदाज आहे?”
तरुण काहीच बोलला नाही. इतक्या वर्षांची आपली विरक्ती, साधना सगळं वाहून जातंय की, काय? विद्यानंदांकडून घेतलेली दीक्षा… त्यानंतर केलेली साधना… गावोगावी दिलेली प्रवचनं… इथं आल्यावर का सगळं विसरायला झालंय? का पुन्हा मन तरंगिणीत अडकतयं? दीपची आठवण का सारखी येतेय? की गेली बारा वर्षं हे सगळं मनात होतंच, पण जाणवत नव्हतं?… प्रश्नामागे प्रश्न…
तोच उघड्या दारातून दीप आला. त्यानं बघितलं, घरात कुणीतरी बसलंय.
“दीप… बस इथे या काकांशी गप्पा मारत .मी चहा ठेवते.”
तरुणकडे वळून तिनं विचारलं, “…आणि हो, तुमच्यात चहा घेतात ना? का तोही सोडून द्यायचा असतो?”
तरुण काहीच बोलला नाही. तरंगिणी आत गेली. तरुण दीपकडे पहात होता. ‘हा आपला मुलगा… आपल्या रक्तामासाचा… एवढासा होता… किती मोठा झाला ना! एकदा फक्त एकदाच मिठीत घ्यावंसं वाटतंय… द्यावी का ओळख त्याला? पण कशी देणार? आपण तर ‘काका’ आहोत.’
“कोण कोण असतं घरात?” अचानक तरुणनं दीपला विचारलं.
“मी आणि मम्मी… बाबा परदेशात असतात”
“परदेशात?”
“हो. मी लहान असतानाच गेले. हा पहा आमचा फोटो…”
दीपनं कपाटातून एक फोटो काढला, बारा वर्षापूर्वीचा…. तो, तरंगिणी आणि तरंगिणीच्या कडेवर दोन वर्षांचा दीप!
“मम्मी रोज एकदा तरी फोटो बघतेच हा… मग आम्ही दोघं फोटोतूनच आमच्या बाबांशी गप्पा मारतो…”
एखाद्या उंच कड्यावरून ढकलून दिल्यासारखं तरुणला झालं. एकदम मोठ्यानं रडावंस वाटलं त्याला… तोच आतून तरंगिणी आली. चहाचे कप घेऊन… टीपॉय वर तिनं ते ठेवले.
“दीप, जा आत, फ्रेश हो. मग तुला देतेच मी खायला…”
तो आत गेल्यावर तरंगिणी म्हणाली, “…आणि हो, लग्न केलं का विचारत होता ना तू? मिळालं तुला उत्तर? अजूनही नसेल समजलं तर सांगते… तुमच्यात असतं ना, आयुष्यात एकदाच संन्यास घ्यायचं! तसंच आमच्यात, आमच्या संसारी माणसातही असतं… आम्ही एकदाच लग्न करतो… एकाशी लग्नगाठ बांधली ना, का ती आयुष्यभर निभावतो. मी प्रेम एकदाच केलं… एकाशीच केलं. आजही मी मनानं त्याच्याच सोबत आहे! तो कुठे आहे… कसा आहे.. मला माहीत असो वा नसो, माझ्यासोबत तो असो वा नसो… तो त्याचा प्रश्न. मी मात्र अंतापर्यंत त्याच्याच सोबत असेन…!”
तरंगिणी बोलत होती. तरुण ऐकत होता…. बारा वर्षांत मिळालेलं, मिळवलेलं ज्ञान तरंगिणीच्या बोलण्यानं वाहून जात होतं. खरंच, संन्यास घेतला कुणी? संन्याशाचं जीवन खरंच कोण जगलं? आत्मज्ञान खरं कुणी मिळवलं? आपण की संसारात राहून संन्यस्ताचं जीवन जगणाऱ्या तरंगिणीनं?
तपभर साधना करूनही तरंगिणीचे बोल ऐकण्याचं सामर्थ्य तरुणमध्ये राहीलं नाही. भरुन आलेले डोळे पुसण्याचंही भान न राहता तरुण बाहेर पडला… आणि वळणावरुन नाहीसा झाला…
मोबाइल – 9423968308