कामिनी व्यवहारे
पंचामृत म्हणजे पाच प्रकारच्या अमृताचे मिश्रण. आयुर्वेदात दूध, दही, तूप, मध आणि साखर यांच्या मिश्रणाला पंचामृत म्हणतात. आपल्याकडे सणासुदीला पूजेच्या निमित्ताने पंचामृत बनवले जाते. पूजेदरम्यान पंचामृत देवाला दाखवून मग ते तीर्थ म्हणून दिले जाते. पण आपण पंचामृत पण गोड नव्हे तर, तिखट कसे बनवले ते जाणून घेऊया.
साहित्य
- खोबरे काप – अर्धी वाटी
- तिळाचे कुट – छोटी अर्धी वाटी
- दाणे कुट (भरड) – छोटी अर्धी वाटी
- हिरव्या मिरच्या – 7 ते 8 (मिरच्यांचे थोडे मोठे तुकडे करून ठेवावेत)
- काजू – 8 ते 10
- किसलेला किंवा बारीक केलेला गुळ – अर्धी वाटी
- गोडा मसाला (काळा) – 2 चमचे
- भिजवलेले शेंगदाणे – अर्धी वाटी
- कढीपत्ता – 5 ते 6 पाने
- मोहरी – 1 लहान चमचा
- जिरे – 1 लहान चमचा
- हिंग – अर्धा लहान चमचा
- हळद – अर्धा लहान चमचा
- मीठ – चवीनुसार
- चिंचेचा कोळ – अर्धी वाटी
- तेल – फोडणीपुरते
पुरवठा संख्या : 5 ते 6 माणसांसाठी
हेही वाचा – Recipe : राजेळी केळ्यांचे उंबर अन् कढी गोळे
कृती
- गॅसवर एका पातेल्यात फोडणीसाठी तेल तापवून घेऊन त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कापलेल्या मिरच्या आणि कढीपत्त्याची पाने घालून फोडणी करून घ्यावी.
- नंतर त्यात सुक्या खोबऱ्याचे काप परतून घ्यावेत.
- मग त्यात गोडा मसाला, दाण्याचे कूट, भिजवलेले शेंगदाणे, काजू, मीठ आणि थोडे पाणी घालून 5 मिनिटे उकळू द्यावे.
- त्यानंतर तिळाचे कूट, गूळ आणि चिंचेचा कोळ घालून हवे तेवढे घट्ट होईपर्यंत आटवावे.
- अशा तऱ्हेने तयार झालेले गरम गरम पंचामृत सर्व्ह करावे.
तयारी करण्यासाठी लागणारा कालावधी : 20 मिनिटे
पंचामृत करण्यासाठी लागणारा कालावधी : 25 मिनिटे.
एकूण कालावधी : साधारण 45 मिनिटे
हेही वाचा – Recipe : झटपट स्वादिष्ट कॉर्न पुलाव
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.