अनिता बाळकृष्ण वैरागडे
मागील लेखात आपण उभे राहून केलेले सूर्यनमस्कार बघितले होते… आता आपण बसून सूर्यनमस्कार कसे करायचे ते बघूया. सूर्यनमस्कार साधारणपणे उभे राहूनच केले जातात. पण काही लोकांना, जसे की वृद्ध व्यक्ती किंवा गुडघेदुखी, पाठदुखी अथवा तत्सम कुठल्या आजार असेल तर ते उभे राहून सूर्यनमस्कार शक्य होत नाही. म्हणून अशा व्यक्तींना खुर्चीत बसून सूर्यनमस्कार करता येते.
- प्रथम स्थिर खुर्ची घ्यावी. त्यावर बसल्यावर पाय सरळ रेषेत जमिनीवर टेकलेले असावेत आणि गुडघे 90 अंशाच्या कोनात असावे.
- दोन्ही हात छातीपुढे नमस्कार मुद्रेत ठेवावेत. डोळे मिटून श्वास आत घ्या आणि हळूहळू सोडा.
- श्वास घेत जोडलेले हात वर करा. खांदे कानापासून दूर ठेवा. थोडे मागे झुका. पाठीचा कणा ताणून धरा.
- धरलेला श्वास हळूहळू सोडा आणि पुढे वाकून हात पावलांवर ठेवा. मान सैल ठेवावी.
- उजवा पाय वर घेऊन तो गुडघ्यात वाकवा. गुडघा छातीजवळ आणून दोन्ही हातांनी धरून ठेवा. डावा पाय खाली जमिनीवरच असावा.
- आधी ताठ बसून मान मागे वर उचलावी. नंतर मान पुढे आणून कपाळ उजव्या गुडघ्याला टेकवावे.
- दोन्ही पाय एकत्र आणून सरळ खाली ठेवा. पाठीचा कणा ताठ असावा.
- हात मांडीवर ठेवून दीर्घ श्वास घेत छाती पुढे काढा. खांदे मागे न्या. मान मागे वर उचलावी.
- दोन्ही हात खांद्याला समांतर ठेवून वर करा आणि शरीर ताणून धरा. श्वास सोडा आणि ताण सोडा.
- हात परत छातीसमोर प्रार्थना मुद्रेत धरा.
- असा हा एक राऊंड पूर्ण झाला. आता दुसऱ्या राऊंडमध्ये डावा पाय पुढे घेऊन पुन्हा याच पद्धतीने सूर्यनमस्कार करा.
हेही वाचा – Yoga is lifestyle : सूर्यनमस्कार… व्यायामाचा शास्त्रोक्त प्रकार
फायदे – गुडघे आणि सांधे यांना योग्य व्यायाम मिळतो. श्वासोच्छवासावर नियंत्रण राहते आणि मन शांत राहते. हात, पाय आणि पाठीच्या कण्याचा व्यायाम होतो. मांस-पेशी व्यवस्थित ताणल्या जातात. रक्तभिसरण वाढते.
योगासनाचे असंख्य फायदे आहे. म्हणून आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये योग करणे अत्यंत आवश्यक आहे.
हेही वाचा – Yoga is lifestyle : प्राणायाम हाच योग विद्येचा आत्मा