हिमाली मुदखेडकर
नणंदेच्या मुलाचे लग्न ठरले आणि अनेक वर्षांनी पुन्हा एकदा जालन्याला जाण्याचा योग आला. लग्न तर एन्जॉय करायचेच आणि आरामही! असा सुटसुटीत कार्यक्रम ठरवून जालन्यात पाऊल ठेवले. नणंदेकडे पाहुण्यांचे उधाण आले होते… अगदी उत्सवाचे वातावरण… सनई चौघडे… सगळेच अगदी साग्रसंगीत!
या सगळ्यात हिची मधे मधे लुडबुड सुरू होतीच… पण तिला कुणी फारसे महत्त्व देत नव्हते, उलट हाडतुडच येत होती बिचारीच्या वाट्याला…
“सुले… काय तुझं इथे? हो बाजूला…” कुणीतरी वसकन ओरडले तिच्यावर… तशी ती तणतणत बाजूला झाली आणि रागात निघून गेली.
‘सुलू…’ हिला मी विसरलेच होते. तसं तिला लक्षात ठेवावं, असा तिचा माझा फारसा सहवासही नव्हताच. तिची माझी पहिली भेट साधारण 18 वर्षांपूर्वी झालेली… इथेच नणंदेकडील एका कार्यक्रमात झाली होती!
मी माझ्या दीड वर्षाच्या मुलाला घेऊन आली होते… नुकतंच चालायला सुरुवात केलेल्या माझ्या गोंडस बाळाला सगळेच उचलून घेऊन त्याचे लाड पुरवत होते… मीही नातेवाईकांच्या गराड्यात रमले होते… आणि अचानकच माझ्या लक्षात आले की, बाळ आसपास दिसत नाहिये!
मी अंगणात पाहिले… तिथेही नाही. घरभर शोधले… पण कुठेच नाही! चुकून बाहेर गेला असेल तर…? म्हणून बाहेरही जरा दूरवर जाऊन आले, पण कुठेच दिसेना… माझा जीव अगदीच घाबराघुबरा झाला… धड बोलताही न येणार्या माझ्या लेकाला कोण घेऊन गेलं असेल कुणास ठाऊक!
मी चटकन आत येऊन माझ्या नणंदेच्या कानावर ही गोष्ट घातली… तशी त्यांच्या घरातील सगळ्यांनी शोधाशोध सुरू केली… आजुबाजूची घरे धुंडाळली, ना जाणो चालत चालत गेला असेल शेजारील घरात… तीन घरे सोडून असलेल्या जोशी सरांच्या घरात सापडला!! सुली त्याला अंगणातून उचलून घेऊन आली होती… आणि त्याच्याशी खेळण्यात इतकी मग्न झाली होती की, आपण काय घोळ घालून ठेवलाय, हे तिच्या गावीही नव्हते…
जोशी काकू ओशाळून म्हणाल्या, “माफ करा हो, कळत नाही तिला… मुलांची आवड खूप आहे, म्हणून कुणाचीही लहान मुले दिसली की, उचलून आणते ती घरी… कितीही रागावले तरी ऐकत नाही हो!”
आत्तापर्यंत झालेल्या प्रकाराने एकंदरच संतापलेली मी त्यांच्या या बोलण्याने जरा शांत झाले पस्तिशी ओलांडलेल्या एका मतिमंद मुलीने माझ्या बाळाला उचलून घरी नेले, तेही कुणालाही न सांगता.. आणि सगळाच गोंधळ उडाला होता!
हेही वाचा – आयुष्याचं गणित बरोब्बर सोडविणारी… वनिता
आपल्या बरोबरीच्या इतर मुलींची लग्न झाली… त्यांना मुले झाली… आणि आपल्याला मात्र बाळ नाही, एवढेच तिला कळत होते… आणि त्या नैसर्गिक भावनेपोटी ती समोर दिसेल ते गोंडस बाळ उचलून घरी नेत असे… त्या बाळाशी खेळत असे… त्याच्या मऊ स्पर्शाने स्वतःचे समाधान करून घेत असे… पण प्रथमदर्शनी कुणालाही भीती वाटावी अशी ती दिसत होती!
बाळ समोर दिसल्यामुळे मी आता शांत झाले होते… तिची आई काय सांगतेय ते नीट लक्षात आले होते माझ्या! मग मीच म्हणाले, “काही हरकत नाही सुलभा तुला आवडतंय ना बाळाशी खेळायला! मग तू नेत जा याला तुझ्या घरी खेळायला… पण मला सांगून घेऊन जा हो…”
तशी ती एकदम खुशीत आली. पुढील दोन-तीन दिवस… जोवर मी तिथे होते, ती सारखी येऊन त्याच्याशी खेळत असे, त्याला आपल्या सोबत घरी नेत असे…
त्या नंतर अनेक वर्षे मी जालन्याला गेलेच नाही… हा प्रसंगही माझ्या विस्मृतीत गेला आणि सुलू देखील!
घरात पाहुणे मंडळी खूप असल्याने शेजारील घरांमधून सगळ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आमची व्यवस्था नेमकी सुलूच्या घरीच होती. तिथे जाऊन सामान नीट ठेवत असतानाच ती आली! वयाची पन्नाशी ओलांडलेली… चेहरा सुरकुतलेली सुलू माझ्यासमोर उभी होती… जरा थकलेली.. पाठीतून बाक आलेली, ती मला विचारत होती, “मामी, ओळखलं ना मला?… मी सुलू…”
“हो.. ओळखले की! कशी आहेस तू सुलू?” मी ओळखले म्हटल्यावर कोण आनंद झाला होता तिला…
“बाळ कसा आहे गं तुझा? मोठा झाला असेल ना आता?”
तशी मी दूर उभा असलेला शोभित तिला दाखवला…
“अगो बाई… किती उंच झालाय हा आणि कित्ती रुबाबदार दिसतोय! दृष्ट काढते हो त्याची…” असं म्हणत ती त्याच्याजवळ गेली आणि चेहर्यावरून हात फिरवून कानाशी बोटे मोडली… इतक्या वर्षांनंतरही मी आणि माझा मुलगा तिच्या लक्षात होतो!
हेही वाचा – …अन् एक वर्तुळ पूर्ण झाल्याचा आनंद!
मग बराच वेळ माझ्याजवळ बसून काहीबाही बोलत राहिली… तिची आई नुकतीच काही महिन्यांपूर्वी वारली, त्यानंतर ती खूप एकटी पडली होती… “सगळे येऊन घरातील इतर सर्वांना भेटून जातात… आई गेल्याचं दु:ख व्यक्त करतात… पण माझ्याशी बोलायला कुणीच येत नाही, का मला दुःख झालं नसेल का?” ही तिची खंत जीवघेणी होती.
माझ्या हाताला धरून आईच्या फोटोपर्यंत घेऊन गेली आणि म्हणाली, “आई बघ, मामी आलीय. हिचं बाळ मी घेऊन आले होते ना… तू रागावलीस, पण ती नव्हती रागावली… तिला कळलं होत आई, मला काय हवं होतं ते!”
दोन मायेचे शब्द बोलले होते मी तिला… तेही किती तरी वर्षांपूर्वी… पण तेवढीच मायेची शिदोरी तिने आजवर सांभाळली होती, इतकी वर्षं मला लक्षात ठेवले होते… रंग, रूप, बौद्धीक क्षमता… हे सगळं आपल्या हातात नसतंच, ते देवदत्त असतं! पण एकमेकांशी प्रेमाने वागणं… मायेने बोलणं.. हे असतंच ना आपल्या हातात, मग ही मायेची गुंतवणूक करताना आपण का कंजुषी करतो?
सुलूला आज भेटून ऊर भरून आला होता माझा… वयाने तिच्यापेक्षा लहान असूनही मी मायेने हात फिरवला तिच्या पाठीवर… मायेच्या स्पर्शाला आसुसलेल्या सुलूच्या डोळ्यातून नकळत दोन असवं टपकली… मीही माझ्या डोळ्यांच्या कडा तिच्या नकळत टिपल्या…


