चंद्रशेखर माधव
साधारण एक महिन्यापूर्वीची घटना. माझ्या कंपनीत सुदीप नावाचा एक तरुण इंजिनीअर सप्टेंबर महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन विभागात जॉइन झाला. पहिल्याच दिवशी आम्हा सर्वांशी त्याची ओळख करून देण्यात आली. आमचे ऑफिस पुण्यातील पिरंगुट येथे आहे आणि आम्हा बऱ्याच जणांची घरं तिथून लांब आहेत. त्यामुळे साहजिकच आम्हाला घरातून सकाळी बऱ्यापैकी लवकर निघावे लागते.
दोन तीन दिवसांतच दुपारी जेवायला एकत्र जाण्याच्यावेळी बऱ्यापैकी संवाद घडून आला. परिणामी, तो आमच्यामध्ये पटकन रुळला. तो जॉइन झाल्यानंतर साधारण सात-आठ दिवसांनी मी काही काम असल्याने तो बसतो त्या ठिकाणी पोहोचलो. सुदीप जागेवर नव्हता. इतरांना विचारलं तेव्हा समजलं की, तो सुट्टीवर आहे. नुकताच जॉइन झालेली व्यक्ती सुट्टीवर आहे, समजल्यावर साहजिकच मला जरा आश्चर्य वाटलं!
तो दिवस सरला. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सुदीप माझ्यासमोर हजर झाला. म्हणाला, “सर, काल सकाळी तुम्ही माझ्याकडे काही कामासाठी आला होतात असं समजलं म्हणून आलो.” थोडा वेळ कामाचं बोलणं झाल्यावर मी त्याला सहज विचारलं, “काल तू सुट्टीवर होतास ना?”
हेही वाचा – अनाहूत सल्ला
“हो” सुदीप म्हणाला, “काय सांगू सर, काल एक विचित्रच प्रकार घडला.”
“का ते, काय झालं?” मी विचारलं.
“येताना रस्त्यात नाश्ता करायचा म्हणून नेहमीच्या ठिकाणी गाडी पार्क केली अन् हॉटेलमध्ये गेलो. पाच-दहा मिनिटांत नाश्ता करून बाहेर आलो तर, गाडी जागेवर नव्हती…!” सुदीप सांगू लागला.
एव्हाना, त्याचे हे बोलणे ऐकून आमच्या डिपार्टमेंटमधील बाकीच्या सहकाऱ्यांच्या माना आमच्याकडेच वळल्या.
“विचार केला कुणीतरी गाडी आजूबाजूला हलवली असेल. म्हणून तिथे पार्किंगमध्ये सगळीकडे शोधलं. पण काही केल्या गाडी दिसेना! टेन्शन आलं… थोडा विचार केल्यावर मला आठवलं की, मी गाडी पार्क केल्यावर चावी काढून घेतली होती, पण लॉक न लावता तसाच हॉटेलमध्ये गेलो होतो. महत्त्वाचं म्हणजे ती गाडी माझ्या मित्राची होती. त्याला लांब जायचं होतं म्हणून त्याने माझी गाडी नेली अन् मी त्याची गाडी घेऊन ऑफिसला येत होतो.”
सुदीप पुढे सांगू लागला… “एव्हाना अर्धा तास तरी झालेला होता. लगेच मित्राला फोन करून झालेली घटना सांगितली. गाडीला GPS असल्यामुळे मित्राने त्याच्या मोबाइलवर गाडीचे लोकेशन तपासले. गाडी सहकारनगर परिसरातून जात असलेली दिसत होती. लगेच रिक्षा करून त्या परिसरातील पोलीस ठाणे गाठले.”
“या प्रकारात अजून तासभर निघून गेला. एक पोलीस कर्मचारी अन् मी त्या परिसरात गाडी शोधायला निघालो. तिथे सुमारे तीन तास GPS लोकेशनच्या आसपास सगळीकडे फिरून सुद्धा गाडी सापडली नाही. आता मोबाईलवर GPS लोकेशन एकच ठिकाणी स्थिरावलं होतं. बहुतेक चोराने GPS काढून तिथेच फेकून दिले होते. निराश होऊन घरी परतलो. माझ्या लक्षात आलं की, आता गाडी सापडणं अशक्य आहे. संध्याकाळचे एक-दोन तास अस्वस्थतेत कसेतरी घालवले. पण मन स्वस्थ बसू देईना. तडक उठलो आणि परत पोलीस ठाणे गाठले. पोलीस कर्मचाऱ्याला विनंती करून सोबत घेऊन तिथेच पोहोचलो.”
“एव्हाना रात्रीचे नऊ-साडेनऊ झालेले होते. यावेळी त्या परिसरात अजून थोडं पुढे जाऊन शोध घ्यायला सुरवात केली. हा सगळा शोध आम्हा दोघांच्या मोबाइल टॉर्चच्या उजेडात सुरू होता. रस्त्याच्या कडेला काही स्कूलबस उभ्या होत्या. अचानक टॉर्चच्या उजेडात बसच्या मागे काहीतरी चमकताना दिसले. मागे जाऊन बघितले तर माझी गाडी तिथेच लपवलेली सापडली. गाडीजवळ गेल्यावर अचानक अंधारातून वीस एकवीस वर्षांचा एक तरुण मुलगा पुढे आला. ‘माझी गाडी आहे? हात लावायचा नाही! कोण तुम्ही?’ वगैरे बडबड करू लागला. एकतर अंधार अन् त्यात पोलीस साध्या वेषात! त्यामुळे पुढे काय होणार आहे, याचा चोराला काहीच मागमूस लागला नाही. पोलिसाने तातडीने त्याला ताब्यात घेतलं. गाडीसोबत चोर सुद्धा जागेवरच पकडला जाणं हे माझ्यासाठी एक मोठं आश्चर्य होतं.”
हेही वाचा – आसामची सहल
“मी, हवालदार गाडी अन् चोर, असा आमचा सगळा लवाजमा दहा-पंधरा मिनिटांत पोलीस ठाण्यात हजर झाला. हे सर्व होईपर्यंत रात्रीचे बारा वाजले. अजून गाडी ताब्यात मिळाली नाहीये सर. पण कायदेशीर बाबी पूर्ण केल्या की 7 ते 8 दिवसांत मिळेल…” सुदीपने बोलणं थांबवलं.
हे सगळं ऐकल्यावर ऑफिसमधील इतर सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. “नशीबवान आहेस सुदीप. अरे, बघितलंस ना छोटासा हलगर्जीपणा किती महागात पडू शकतो ते. इथून पुढे काळजी घे…” मी त्याला म्हणालो. “आता जन्मात अशी चूक होणार नाही!” सुदीप देवाचे आभार मानत म्हणाला.


