नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
- आँवारा नहीं, हमारा हैं…
- हर गली का सहारा हैं…
- अब हमने यह ठानी हैं, उनकी जान बचानी हैं…
- एक दो तीन चार, डॉगेश भाई की जय जयकार…
- जो कुत्तों को मारेगा, नरक में जाएगा…
- कुत्तों को मारना हैं पाप, कालभैरव देंगे श्राप…
सध्या सगळीकडे हेच ऐकू येतंय, ‘Protest for voiceless…’ दिल्ली प्रकरणाचे पडसाद सगळीकडे उमटत आहेत. अगदी कॅनडामध्ये सुद्धा लोकांनी रॅली काढल्या! मुंबईमध्ये कितीतरी डॉग लव्हर्स (Dog Lovers) आणि (Dog Haters) डॉग हेटर्स यांच्यात झकाझकी होतच असते. कितीतरी भांडणं आणि मारामारीच्या केसेस सुरूच आहेत. पण प्राणीमित्र (Animal lover) जे आहेत, ते काही स्वत:च प्राणीप्रेम कमी करायला तयार नाहीत. रस्त्यावरचे कुत्रे, मांजरं, गायी, गाढवं आणि अजून जे काही प्राणी असतील त्यांना अन्न खाऊ घालणं, हा काही गुन्हा नाही.
एसीपी सुधीर कुडाळकर हे या चळवळीचे प्रणेते आहेत. त्यांच्या जोडीला कितीतरी लोक मुक्या प्राण्यांवरच्या प्रेमामुळे जोडले गेले आहेत. विरारमध्ये सुनीता परमार खूप एक्टिव आहे. त्या माजी मंत्री मनेका गांधी यांचा उजवा हातच आहेत, म्हणा ना! माझ्या कॉम्प्लेक्समधल्या नीहाने मला विचारलं की, “तुम्ही डॉग लव्हर आहात ना? आम्ही निषेध रॅली काढणार आहोत, तर याल का?” मी “हो” म्हणाले.
मी चारकोपला राहात असताना डॉग फूड बनवायचे आणि माझा मुलगा गल्लीमधल्या सगळ्या बाळांना खाऊ घालायचा. त्यांची वैद्यकीय सेवाही तो बघायचा. गाडीमध्ये बसवून चारकोपमध्ये फिरवून आणायचा. ऑफिसमधून येताना बाइक थांबवून चक्क रस्त्यावर बसून त्यांच्याशी खेळायचा.
हेही वाचा – Suicide free society : आयुष्याच्या ‘ट्रॅक’वरून घसरू नका…
आता माझा विरारमधल्या रॅलीचा अनुभव सांगते…
साधारणपणे पंधरा एक माणसं होती. माझ्या मनात आलं, ‘ही कसली डोंबलाची रॅली!’
सगळे लाइन करून, हातात पोस्टर्स, बॅनर्स घेऊन चालायला लागले. चालताना घोषणा दिल्या जात होत्या. माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. जरासं विचित्र वाटत होतं. मीही त्यांच्यासोबत घोषणा देत होते, पण जरा दबक्या आवाजात… थोडं लाजत. पण त्या घोषणा देता देता मलाच कळलं नाही, माझा आवाज खूप वाढला होता… डोळे वाहात होते… जरा मागे वळून बघितलं तर, ते म्हणतात ना – ‘लोग जुडते गये और कारवाँ बनता गया…’ 200 ते 250 माणसं कधी रॅलीमध्ये जोडली गेली, हे कळलंच नाही!
प्रत्येकाच्या हातात छोटी पिशवी आणि त्यात मारी बिस्किटचे पुडे! रस्त्यात भेटणाऱ्या सगळ्या ‘बाळांना’ (ते लोक कुत्रा नाही म्हणत, आमची बाळं किंवा हमारे बच्चे) ती बिस्किटं खायला देत होते. रस्त्या-रस्त्याला पाण्याची दगडी भांडी होती. ती कोरडी असेल किंवा त्यात पाणी कमी असेल तर, पाणी ठेवत होते.
त्या रॅलीमधली प्रत्येक व्यक्ती ‘फीडर’ होती. रस्त्यावरच्या त्या बाळांना अन्न, वैद्यकीय सेवा आणि जमेल तशी सुरक्षा मिळवून देणं… ही असली कामं ते लोक स्वत:च्या खिशाला खार लावून करतात. त्यात त्यांना वाईट नाही वाटत, फालतूचा माज नाही वाटत… असतो फक्त आनंद आणि प्रेम, माया!
एक कुत्रा तर आमच्याबरोबर तासभर तरी चालत होता. रॅली संपल्यावर त्याला त्याच्या एरियात नेऊन सोडलं… उगाच दुसऱ्या एरियातील बाळांनी त्याच्यावर हल्ला नको करायला! फार कौतुक वाटलं मला त्या प्रत्येकाचं!!
माझी एक लहानपणीची शेजारी राहणारी मैत्रीण भेटली. ती दररोज 60 बाळांना दूधभात देते. तिच्या घरातच 10 कुत्रे आहेत! सगळे गुण्यागोविंदाने राहतात… या 10 बाळांसह घरात ती एकटीच राहते. Animal healing ची थेरपी देते. त्यातून तिला थोडीफार कमाई होते. त्यातूनच स्वत:ची आणि 60 बाळांची गुजराण करते. ‘वायफळ गरजा कमी केल्या की, पैसे पुरतात,’ असे ती म्हणाली. ‘जेव्हापासून मी फीडर झालेय, मी देवळात जात नाही. देवाला मानते, नास्तिक नाही. पण ही बाळंच माझे देव आहेत…’ ती सांगत होती. मला तिचे खूपच चांगले विचार वाटले.
इथे निघालेल्या रॅलीमधल्या कोणीही हॅण्ड सॅनिटायझर आणलं नव्हतं किंवा रस्त्यावरच्या बाळांना हात लावला म्हणून कोणी सारखे हात धुवत नव्हतं. त्यांना न्याय मिळावा आणि खूप सारं प्रेम त्यांच्याही वाट्याला यावं, ही फक्त एकच भावना होती.
डॉग हेटर्ससाठी एक महत्त्वाची गोष्ट – कुत्रे जिथे खातात तिथे कधीच शी-शू करून घाण करत नाहीत. त्यामुळे ‘कुत्र्यांना येथे खायला घालता आणि ते इथे घाण करून जातात,’ हे तुमचं म्हणणं चुकीचं आहे.
हेही वाचा – Suicide Free society… पुढे येण्याची सर्वांचीच जबाबदारी
मुक्या प्राण्यावर होणारे अत्याचार थांबवा. अन्न, पाणी, निवारा, औषधं, प्रेम यांची त्यांनाही गरज आहेच की! तुम्ही ते देऊ शकत नसाल तर, किमान ते देणाऱ्यावर अन्याय तरी करू नका!
जय डॉगेश भाई!