चंद्रकांत पाटील
तात्या पाटलाला दोन मुली आणि दोन मुलगे… दोन्ही मुलींची आणि थोरल्या मुलाचे लग्न झाले होते. शेवटचा पांडू त्याचे लग्न झाले की, तात्या मोकळा होणार होता.
पांडु शिकला नाही, त्यामुळे शेतीच करत होता. अर्थात, शिकायचीबी काही गरज नव्हती म्हणा, कारण तात्याकडे जमीन भरपूर होती. शिवाय… भलेमोठे घर, जनावराने भरलेला गोठा, गडीमाणसं… मोठा खटाला होता… तर अशा या पांडूच्या लग्नाचं बघायचं चाललं होतं.
गेली दोन-तीन वर्ष बघणं सुरू आहे, पण मनासारखं स्थळ मिळत नव्हतं. कधी मुलगी पसंत पडायची तर, तिला मुलगा पसंत नसायचा. मुलीला मुलगा पसंत असायचा तर, घरचं बरोबर नसायचं. हे सगळं जुळून यायचं तवा पत्रिका जुळायची नाय आणि सगळं जुळलं तर पदर लागायचा नाय… असा सगळा तिंगाडा आणि तिप्पाडा झाला होता.
या सगळ्या परिस्थितीला तात्या वैतागला होता… चिडला की म्हणायचा, “बायला! एवढी म्या पाच लग्न केली, दोन भणींची. दोन पोरींची आणि एक थोरल्या पोराचं. पण एवढा ताप कवाच झाला नाही, एवढं ह्या पांडानं दमीवलंया…”
पांडू पण पोरी बघून बघून वैतागला होता आणि पोहे खाऊन कंटाळला होता. त्याच्या बरोबरीच्या पोरांची लग्न होऊनशान त्यास्नी दोन-दोन पोरं झालेली होती, पण याचं अजून लगीन ठरत नव्हतं. पांडूचं नाव पंचक्रोशीतल्या सगळ्या वधू-वर सूचकांकडे होतं, ते काही स्थळं सुचवत होते… पण या ना त्या कारणामुळे कार्य सिद्धिस जात नव्हतं. संपूर्ण लग्नाचा सीझन संपत आला तरी, लग्नाचा प्रश्न सुटत नव्हता…
शेवटी खानापूरच्या वधू-वर सूचकाकडून फोन आला आणि त्यांनी कामेरीचे स्थळ सुचविले, पण सगळेजण या मुली बघायच्या कार्यक्रमाला कंटाळले होते. पांडूही ‘औंदा राहूदे’ म्हणत होता. शेवटी पांडूची आई म्हणाली… “आरं, कटाळा करू नगस! एवढं शेवटचं बघूया अन् पुन्हा बंद करूया!“
शेवटी नाही, होय करीत, दुसरे दिवशी जायचे ठरले…
त्याप्रमाणे पांडूने गाडीची, कपड्यांची तयारी करेपर्यंत सांयकाळचे सात वाजले. मग तो टीव्हीवर मॅच बघत बसला. तेवढ्यात फोन वाजला तर, पांडूचा मित्र रमेशचा फोन होता…
“मी सकाळीच आलोय पुण्याहून आणि गप्पा मारायला पारावर ये!”
पांडू म्हणाला, “आता गप्पा मारायला येत नाय. जरा लवकर जेवून झोपायचंय! उद्या एक पुरगी बघायला जायाचं हाय… ऐरवाळी आणि तुला उद्या सुटी हाय तर तू पण चल… मग वाटेत गप्पा मारू आणि पोरगी पण बघू!”
“बरं… बरं, ठीक हाय…” म्हणत फोन बंद झाला.
दुसर्या दिवशी पांडूने नवी कोरी बोलेरो भाईर काढली. त्यात खानापूरचा वधूवर सूचक, तात्या, पांडूची आई आणि रमेश बसले… वाटेत वाळव्यात थोरली बहीण रंजना आणि दाजीसनी घेतलं. जाता जाता रमेश म्हणाला, “तात्या, अशा कामाला वयस्कर माणूस पाहिजे. माझ्यासारख्याचा काय उपयोग?”
त्यावर तात्या म्हणाला, “तसं काय नाय… माणसाला सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत… याचा उपयोग तुला आता कळणार नाही, पुढच्या साली तुझं लगीन ठरविताना हुईल…”
रमेशने पिवळा टी-शर्ट आणि निळी जिन्स घातली होती. त्यामुळे तो पण नवरा मुलगाच वाटत होता. अशाच गप्पा चालल्या होत्या आणि दहा वाजायला गाडी कामेरीत पोहचली…
गावच्या वेशीत अशोक पाटलांचे घर कुठे आहे म्हणून वधू-वर सुचकाने चौकशी केली तर, ते गावाबाहेरच्या ओढ्यापलीकडे शेतात असल्याचे समजले. घर एकदम साधे पत्र्याचे होते. चहा, पोहे झाले आणि मुलगी पाटावर येऊन बसली मुलगी दिसायला एकदम छान, बांधेसुद, गव्हाळ वर्ण, मोठे डोळे आणि गौरीच्या मुखवट्यासारखी रेखीव, पण उंचीला थोडी कमी होती… पांडूने आतापर्यत बघितलेल्या सगळ्या मुलीत ती उजवी होती. तात्यांनी औपचारिकता म्हणून नाव गाव, भाऊ-बहीण वगैरे विचारले. तिने ‘सुरेखा अशोक पाटील, शिक्षण दहावी पास…’ ही माहिती दिली. मग सगळे उठून चर्चेसाठी बाहेर गेले. आत मुलीचे वडील आणि रमेश थांबले. कायतरी बोलायचे म्हणून वडील म्हणाले, “तुम्ही मुलाचे कोन?”
हेही वाचा – भाऊबंदकी… सरांच्या जीवावर आलेली!
मग रमेशने सांगितलं, “मी पांडूचा लहानपणापासूनचा मित्र आणि भावकीपण! मी सॉफ्टवेयर इंजिनीअर आहे आणि सध्या पुण्यात असतो.”
“मग लग्नाचं काय?”
रमेश म्हणाला, “नाही अजून! चाललंय बघायचं!”
तेवढ्यात बाहेरची माणसं आत आली आणि विषय कट झाला. वधू-वर सुचकाने मुलीकडच्या लोकांना मुलगी पसंत असल्याचे सांगितले आणि बैठक संपली.
मुलगी एवढी चांगली होती की, तात्याला जरा शंका येऊ लागली. ‘बायला, या पोरीला चांगल्या पगाराचा नोकरदार मुलगा भेटला असता! मग आमचं शेतकरी मुलाचं स्थळ कसं काय निवडलंय… हे काय कळत नाही!’ ही शंका तात्याच्या डोस्क्यात कामेरी सोडल्यापासून होती. शेवटी इस्लामपुरात गाडी चहा प्यायला थांबल्यावर त्याने वधू-वर सूचकाला त्याबद्दल विचारलेच. त्यावर वधू-वर सूचक म्हणाला, “तात्या, त्याचं काय हाय… मुलीकडची परिस्थिती तुम्ही आता बघितलीच! शिवाय, नोकरदार हुडकायला त्यांच्याजवळ मानुसबळ आणि आर्थिक बाजू नाही… म्हणून तर ते तुमच्या स्थळाकडे आले. आता तुम्ही जास्त विचार करीत बसला तर, हे पण स्थळ जाईल… तेव्हा लवकर घाई करा.”
इकडे मुलाकडचे सर्व लोक निघून गेल्यावर मुलीला तिच्या आईने विचारले, “तुला मुलगा हाय का पसंत?” तर, तिने ‘हो’ म्हणून मानेनेच सांगितले. त्यावर तिची चेष्टा करायच्या हेतूने तिच्या बहिणीने तिला विचारलं, “अगं सरे! तुला मुलगा कोणता हे तर माहीत आहे का?”
“हो, माहीत नसायला काय झालं? त्योच की, त्यो पिवळा टी-शर्ट घातलेला…”
मग सगळेच हसायला लागले आणि म्हणाले, “नाही गं… तो नाही! तो जरा काळा होता आणि त्यांनी पांढरा शर्ट घातलेला… तो मुलगा आहे!”
“मला बाई, तो पिवळा टी-शर्टवालाच आवडला!”
मग ती जरा नर्व्हस झाली… पण घरच्यांच्या पुढे ती काही बोलली नाही.
0000
तात्या आणि मंडळी घरी आली सर्वांना मुलगी पसंत पडली होती, पण सगळ्यांच्या मनात एक शंका होती. तीच शंका थोरल्या मुलीने आणि वाळवेकर जावयाने काढली, “एवढी चांगली मुलगी असून सुद्धा आपल्यासारख्या शेतकरी स्थळाला ते का देत असतील?”
खरंतर तात्यालाही आधी तोच प्रश्न पडला होता, पण आता तो म्हणाला, “तसं काय नाही, आपलं बी स्थळ काय वाईट नाहीय… पोराला चांगली पाच एकर पानस्थळ जमीन, बंगला आहे, गाडी आहे… नोकर चाकर सगळं आहे.. आनिक काय पाहिजे? नोकरदारांच्या घरात काय असतंय? पिशवीतनं आणून खात्यात त्येच्यापरीस आपलं नक्कीच उजवं हाय!”
लग्नाचा सीझन संपत आल्याने जास्तीवेळ न घालविता लवकरच लग्न ठरले आणि पंधरा दिवसांत लग्न झाले सुद्धा आणि मुलगी नांदायला आली! गोंधळ, पूजा यात दोन दिवस निघून गेले आणि प्रथेप्रमाणे पाचव्या दिवशी मुलगी माहेरला जायला निघाली. नेमके त्यादिवशी कपडे बदलताना थोरल्या सुनेने तिला पाहिले तर तिच्या कमरेखाली ‘पांढरा डाग’ दिसला. ते बघून तिचे डोळे विस्फारले! मनातल्या मनात तिला हायसे वाटले आणि हा ॲटम बॉम्ब वेळ आल्यावर फोडू, असे तिच्या मनाने ठरविले.
मग, सुरेखा घराबाहेर जाईपर्यत ती काही बोलली नाही. नंतर तिने ही गोष्ट आपल्या नवर्याला सांगितली… त्यानं आईला आणि तात्याला सांगितली… अशा तर्हेने मुलीला डाग असल्याचे सर्वाना समजले. अर्थात, तात्या पहिल्यापासूनच साशंक होताच आणि आता तर खात्रीच झाली… आपण पुरते फसलो आहोत, असे तात्यासह सर्व कुटुंबीयांना वाटू लागले. मुलगी आपल्या गळ्यात मारली आहे, असा त्यांचा समज झाला. खूप चर्चा झाली… दंगा झाला.
हेही वाचा – म्हातारपण… जे होतं ते चांगल्यासाठीच!
तात्याला खूप राग आला काही दिवसांनी तात्या चार माणसे घेऊन जाब विचारायला पावण्याच्या दारात पोहचला. पाहुणा म्हणाला, “अहो, चार आण्याएवढा डाग आहे आणि त्याची कल्पना आम्ही वधू-वर सुचकाला दिली होती. त्यांनी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं वगैरे वगैरे… त्यावर त्यांनी वधु-वर सुचकाला संपर्क केला… तो म्हणाला, “हो, हो, मला ते बोलले होते, पण मुलगी पाहता ही गोष्ट मला किरकोळ वाटली आणि तुम्ही इतके दिवस स्थळ हुडकताय म्हणून तुम्हाला दाखविले, त्याचं एवढं काय सीरीयसली घेऊ नका… बाजारात असली पुरगी भेटत नाय! पुढ बोला!”
त्याची ही गोष्ट खरी होती, पण तात्या कुटुंबीयांचा इगो दुखावला होता. मग त्यावर गावातल्या लोकांनी तात्यांची समजूत घातली. ‘झाले गेले विसरून जावा. मुलगी चांगली हाय आणि छोटा-मोठा डाग असला तर, त्याचा एवढा मोठा बाऊ कशाला करताय… आधीच पांडूच्या लग्नाला वेळ झालाय… तवा आल्याली लक्ष्मी लाथाडू नगा, पोरगीला नांदवा… जावा आणि संसार सुरू करा…,’ पण घरच्या बायका ऐकायच्या मूडमध्ये नव्हत्या…
“आम्ही काय फालतू माणसं हाय का? चांगलं 96 कुळी खानदानी भोसले पाटील आहोत, ही गेली तर जाऊ दे, असल्या छपन्न पोरी उभ्या करू…” अशा घमेंडीत सर्वजण बोलत होते. पांडूची अवस्था तर ‘न घर का, ना घाट का’ अशी झाली होती…
या सगळ्यात भांडण लावणारी म्हणजे तात्याची थोरली सून होती, तिला दीराचं चांगलं झालेलं बघवत नव्हतं… शिवाय नवीन आलेली सून सगळ्या बाजूने तिच्यापेक्षा जरा सरसच होती, मग तिचंच वर्चस्व घरात राहील म्हणून तिला कायमचं कटविण्याची नामी संधी येताच तिने हा बॉम्बगोळा टाकला होता. तात्या आणि सासुबाईंना ती म्हणाली…
“आमच्या मावस भावाला अशीच डाग असलेली बायको मिळाली. पुढं पोरंबी तसलीच झाली आणि शेवटाला ती पण पांढरी फटक पडली… आता पांढऱ्या पायाची म्हणून कोण घरात येऊ देत नाही… असली सोन्याची सुरी काय कामाची? याच्या परीस गरीबाची काळीसावळी पुरगी भाऊजींसनी कुठंबी मिळंल… तवा तिला आता आणायची नाय!”
हे सगळं ऐकून तात्याला खूप पश्चाताप झाला. आपल्याला कुठल्या मुहूर्तावर खानापूरकर वधू-वर सूचक भेटला आणि निष्कारण खर्चाला डुबलो… शिवाय, सगळा तमाशा झाला आणि पदरात काहीच पडलं नाही.
चर्चा करता करता पावसाळा आला सगळीकडे शेतीची कामे सुरू झाली… दसरा झाला, दिवाळी झाली आणि तुळशी पोर्णिमेनंतर पुन्हा पांडूच्या लग्नाची चर्चा घरात होऊ लागली… पांडूला मुली बघण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन होऊ लागले… पण बैठकीला लोक विचारू लागले की, “पाटील याचं लगीन करायला तुम्ही निघालाय खरं… पण पहिल्या लग्नाचा घटस्फोट झालाय का?” मग तात्याच्या लक्षात आलं की, ‘रीतसर घटस्पोट झाल्याशिवाय दुसरं लग्न करता येत नाही… आता आली का पंचाईत!’
मग एका सकाळी तात्या उठला आणि इस्लामपूरला गेला. तिथे एका ओळखीच्या वकिलाला गाठला आणि घटस्फोटाची कागदपत्रे तयार केली. चार माणसे घेऊन तो पाहुण्याकडे कामेरीला गेला आणि पाहुण्याला म्हणाला, “आम्हाला तुम्ही फसविलयसा तवा आजच्या आज घटस्फोट द्या!”
मग मुलीचे आई-वडील रडायला लागले… “अहो, तुम्ही असं काय करतासा, तुम्ही तुमच्या पोराचं हित बघताय, पण आमच्या पोरीनं कुठे जायचं? तिच्याबरोबर कोण लगीन करील? आमच्या पोरीचं कसं होणार?”
“याचा विचार तुम्ही आधी करायला पाहिजे हुता! आता तुमचं तुम्ही बघा… ” असं म्हणून शेवटी तात्याने बळजबरीने मुलीच्या सह्या घेतल्या आणि घटस्फोट झाला!
0000
पुढे काही दिवसांनी रमेश मुली बघण्यासाठी म्हणून पुण्याहून गावाकडे आला. तीन-चार मुली बघितल्या… पण एकही पसंत पडली नाही. काही मुली भरपूर शिकलेल्या होत्या… चांगल्या करिअर करणाऱ्या होत्या… पण त्यांना सासू-सासरे नको होते! रमेशला दोन्हीकडे गावात आणि शहरात राहणारी मुलगी हवी होती.
रमेश मॉडर्न विचाराचा होता. त्याला गावात आल्यावर पांडूचा घटस्फोट झालाय, हे समजलं म्हणून त्यानं पांडूची गाठ घेतली. सगळी स्टोरी समजून घेतली. त्यावर रमेश म्हणाला, “तू फार मोठी चूक केलीस. आजकाल मुली मिळणं किती कठीण झालंय… अतिशय अवघड परिस्थिती असताना हे तू काय करून बसलास? अरे, ती चांगली मुलगी होती. मला माहीत आहे…”
पण गोष्ट घडून गेली होती….
मग दुसऱ्या दिवशी तो उठला आणि कामेरीला गेला मुलीच्या वडिलांना भेटला आणि सरळ मुलीला मागणी घातली. मुलीला आवडलेला मुलगा असा अनपेक्षितपणे स्थळ म्हणून आलेला पाहून मुलीला आणि तिच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला. पण त्यांनी आर्थिक अडचण असल्याने लग्नाची असमर्थता दाखविली.
पण रमेश म्हणाला, “तुम्ही त्याची चिंता करू नका मला फक्त तुमची मुलगी हवी आहे आणि बाकी काही नको!” आणि अशा तऱ्हेने सुरेखाचा पुनर्विवाह झाला…
पुढे सुरेखा आणि रमेशचा संसार बहारला आणि कालांतराने त्याला मुलगा झाला. त्याचे पेढे द्यायला रमेश पांडूच्या घरी गेला तर…
तो मुलगी बघायला गेला होता!
(सामाजिक समस्येवर प्रकाश टाकणारी सत्यकथेवर आधारीत)
मोबाइल – 9881307856


