विवेक वैद्य
सुशीलाला रात्री अचानक थंडी वाजू लागली. तिने एसी बंद केला तसा अमोल उठला आणि विचारले…
“का गं? काय झाले?”
“काही नाही रे, एसी नको वाटतो.”
“Ok”
कूस पालटून तोही झोपला आणि तिही.
सकाळी अमोल उठलेला तरी सुशीला झोपलेलीच! त्याने कपाळावर हात लावला तर, गरम वाटले. तो ताडकन उठला. भराभर स्वतःचे आवरून त्याने मस्त आले टाकून चहा केला. तिला उठवले आणि क्रोसिनची गोळी आणि चहा दिला… मग भराभरा कालची घासलेली भांडी आवरली. कामवाल्या बाईला फोन करून लवकर यायला सांगितले, त्याच वेळेस शेजारच्या काकूंकडे येणाऱ्या स्वयंपाकी बाईलाही आली की, पाठवायला सांगितले.
मग पुन्हा येऊन सुशीलाचा ताप बघितला… तिला बरे वाटले हे बघून. जमेल तसा केर काढला, झाडांना पाणी दिले. मग पुन्हा एकदा कॉफी ठेवली…. तिला कॉफी बिस्किटं दिली… स्वतःही खाल्ले. नंतर स्वतःची तयारी करून सगळे कपडे वॉशिंग मशीनला लावले. मग म्हणाला,
“आराम कर. कामवाली, स्वयंपाकवाली येतेय. तुझ्यासाठी मऊ खिचडी टाकायला लाव आणि संध्याकाळसाठी थोडया पोळ्या करून घे. मी येताना हॉटेलमधून भाजी घेऊन येतो… येतो मी. लंच मी ऑफिस कॅन्टिनमध्ये करेन.”
तिने संमतीदर्शक मान हलवली. त्याने पटापट घेतलेल्या ॲक्शनमुळे ती खरे तर सुखावली…! तिला बरे वाटत होते. तरीही ती पडून राहीली. कामवाली येऊन कामाला लागली. तिचा थोडा डोळा लागतो, तोच स्वयंपाक करणारी कमल आली. पूर्वीही ती हिच्याकडे येत असल्याने ओळख होतीच.
हेही वाचा – होप फॉर द बेस्ट!
“वैनीसाब, काय बनवू?”
“कमल, माझ्यासाठी अगदी पाव वाटीची खिचडी टाक. जरा आसटच ठेव… आणि संध्याकाळसाठी सात-आठ चपात्या कर.”
“काय झालं वैनीसाब?”
“काही नाही गं. रात्री थंडी वाजून आली आणि ताप चढला होता. आता थोडं बरं आहे…”
“बरं कसलं? चेहरा बघा कसा झालाय. ताप जास्त असेल बघा रात्री. आता आराम करा. मी करते सगळं व्यवस्थित… आणि साहेब कुठं गेले?”
“अगं ते ऑफिसला गेले.”
“पण साहेब तर बंद झाले होते ना हपिसातून? ते काय रिटायर का काय म्हणतात ते.”
“हो, पण दोन वर्षासाठी एक्स्टेंशन मिळालंय. म्हणजे दोन वर्षं ऑफिस वाढवून दिलं.”
“कशाला घेतले साहेबांनी. मस्त घरी बसून आराम करायचा ना?”
“तब्येत चांगली आहे. मग काय करतील बसून? तेवढंच जीव रमतो.”
“असू द्या. पण आजतरी सुट्टी घ्यायला पाहिजे होती साहेबांनी. तुमची तब्येत बरी नव्हती तर. आता उतारवयात तुम्हाला कोण बघणार? “
“अगं एवढं काही झालेलं नाही मला!”
“…आणि झाले म्हणजे. वैनीसाब मी तुमच्याकडे पूर्वीही काम केलंय. तरुणपणीही साहेब सतत हफिस आणि बाहेर राहायचे. आताही या वयात हाफिस. आता बायको आजारी तरीही कामाला… मला काही हे पटले नाही बघा… जाऊ द्या. मी स्वयंपाकाचे बघते, उगाच मला म्हणाल, लहान तोंडी मोठा घास घेते म्हणून.”
कमल काम करून गेली, पण सुशीलाला विचारात टाकून गेली…!
खरंच आज अमोलला ऑफिस जाणे जरूरी होतं का? एक गोळी देऊन आणि वरवर पाहून तो ऑफिसला निघून गेला… थांबला असता तर काय बिघडले असते? आयुष्यभर अगदी प्रामाणिकपणे नोकरी केली आता करण्याची खरोखरच जरूर आहे का?
तिचं तोंड कडू झालं… ते तापामुळे की अमोलच्या वागणुकीमुळे? हे तिला कळेना. मुलगा, सून बाहेरगावी नोकरीसाठी सेटल झालेत. घरात आपण दोघेच. अशावेळी तरी अमोलने आपल्याजवळ थांबणे जरूरी होते. तिला अचानक अशक्तपणा वाटू लागला… ती पांघरूण घेऊन पुन्हा झोपली. आपल्याला पुन्हा ताप चढतोय, असे तिला वाटू लागले. बऱ्याच वेळ ती पडून राहिली, पण झोप काही येईना. शेवटी ती उठली आणि टीव्हीसमोर बसली.
चॅनल बदलत असताना एका चॅनेलवर रामायणतला प्रसंग दिसला… मंथरा कैकेयीचे कान भरत होती… आणि हळूहळू कैकेयीलाही तिचे शब्द खरे वाटू लागले. सुशीला पाहता पाहता रंगून गेली! अचानक तिला मंथराच्या जागी कमल दिसायला लागली. तिला काही समजेना… तिने पुन्हा बघितले… पुन्हा तेच! कमल मंथरा आणि आपण कैकेयी. तिथे मुलाबद्दल मनात विष कालवले गेले, इथे नवऱ्याबद्दल… आपल्या मनात एवढाच फरक! छे, छे… आपण एवढ्या हलक्या कानाचे कधीपासून झालो… 30-32 वर्षे झाली आपल्या संसाराला, अगदी पडत्या काळातही आपण आनंदाने राहिलो… आणि इतक्या किरकोळ कारणावरून आपण अमोलबद्दल मनात अढी ठेवत होतो?
हेही वाचा – सासू, सून अन् लेक…
सुशीलाने टीव्ही बंद केला. तिला दरूदरून घाम फुटला. तिला एकदम बरे वाटू लागले… तिने आंघोळ केली. देवाला नमस्कार केला. एव्हाना तिला भूक लागली… तिने कुकरमधून गरम खिचडी ताटात घेतली… आणि सावकाशीने पाहिला घास तोंडात घेतला, त्या मऊ खिचडीची चव समाधानाची, सुखाची जाणीव बनून तिच्या शरीरात उतरली. तेवढ्यात फोन वाजला… अमोलचाच होता!
“उठली का? कशी आहे तब्येत?”
“छानच आहे. आता जेवायला बसतेय.”
“मी पण आताच कॅन्टिनला आलोय. आधीच करणार होतो फोन पण, तू झोपली असशील म्हणून केला नाही. अगदी इथेही सांगितले होते की, तिला बरे वाटले नाही तर, ऑफिस सोडून घरी जाईन. बरं, संध्याकाळची अपॉइंटमेंट घेऊ का डॉक्टरांची?”
“नाही रे. बरं आहे एकदम. परत ताप चढला तर बघू.”
“ठीक आहे. पण दगदग करू नको. झोपून राहा. कमलने पोळ्या केल्या का?”
“हो.”
“मग भाजी कोणती आणू हॉटेलमधून?”
“कोणतीच नको.”
“म्हणजे?”
“येताना डझनभर केळी घेऊन ये. मस्तपैकी शिकरण करते!”
“अरे… मला तर आवडते, पण तुला चालेल?”
“चालेल काय पळेल. ये तू. माझी काळजी करू नको.”
“ओके… भेटू संध्याकाळी.”
तिने समाधानाने फोन ठेवला.
तिचा संसारही शिकरणासारखा होता. केळी, दूधासारखा एकमेकांत मिसळून गोड झालेला…
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


