सुनील शिरवाडकर
आठ-दहा वर्षांचा गजू…. आमच्या शेजारीच रहायचा. एकदा तो त्याच्या बाबांच्या मागेच लागला, “मला पण तुमच्याबरोबर यायचंय… दुकानात! मी त्रास नाही देणार… नुसता बसून राहीन…”
गजूचे बाबा एका चहाच्या दुकानात काम करायचे. चहाच्या दुकानात म्हणजे चहा पावडर विकणाऱ्या दुकानात. तेथे ते सेल्समन होते. ते घरी आले तरी त्यांच्या शर्टला चहाचा वास यायचा… गजूला तो वास खूप आवडायचा. तो वासच आवडायचा असं नाही, तर गजूला बाबांचा तो शर्ट पण आवडायचा. जाड पिवळ्या कापडाचा तो शर्ट… खिशावर त्या दुकानाचा लोगो… एकदा तर गजूने घरात कुणी नसताना तो शर्ट घालूनही पाहिला होता.
खूपच मागे लागल्याने बाबांनी ठरवलं… आज गजूला दुकानात घेऊन जायचं… तसं दुकान जवळच होतं. दुपारी त्याचे बाबा जेवायला घरीच यायचे. बाबांनी खूप सगळ्या सूचना केल्या, “हे बघ, दुपारी दोन वाजेपर्यंत तुला दुकानात थांबावं लागेल.. माझ्या बाजूला शांतपणे बसायचं… इकडे तिकडे हात लावायचा नाही…”
गजूने मान डोलावली. बाबांसोबत तो दुकानात आला. दुकानाची साफसफाई झाली. बाबांनी काऊंटरवरून फडकं फिरवलं. उदबत्ती लावली. बाजूच्या खुर्चीत कॅशिअर बसला. काऊंटरच्या आत एक स्टुल होतं. गजू त्याच्यावर उभा राहिला… तेवढ्यात एक गिऱ्हाईक आलं. त्यांना अर्धा किलो चहा हवा होता. काऊंटरच्या खाली तीन चार ड्रॉवर्स होते. त्यात वेगवेगळे प्रकारची चहापावडर होती. दार्जिलिंग, ममरी अशी नावे त्यावर लिहिलेली होती. बाबांनी या ड्रॉवरमधून थोडी, त्या ड्रॉवरमधून थोडी अशी चहापावडर घेतली… स्टीलच्या डावाने हलवली. सगळं मिश्रण छान एकत्र झालं… दुकानचं नाव असलेली एक प्लास्टिकची पिशवी घेतली. त्यात ती चहाची पावडर ओतली… स्टेपलरने दोन पिना मारल्या अन् ते पॅकेट कस्टमरच्या हातात दिले. पैसै देऊन तो माणूस निघून गेला. गजू हे सगळं उत्सुकतेने बघत होता. त्याला हे सगळं खूपच आवडलं. दोन-तीन तास तो दुकानात बसला… अगदी शहाण्या मुलासारखा… चहाच्या त्या मंद सुगंधाने त्याचं मन वेडावलं…
हेही वाचा – तरंगिणी… संसारात राहून संन्यस्त जीवन
त्याचं चहाचं वेड अजूनच वाढलं. ‘मी मोठा झाल्यावर चहावाला होणार,’ असं तो आता सांगू लागला. त्याच्या वयाच्या मुलाने असं भविष्य रंगवणं चुकीचंच होतं. त्याचे आईबाबा पण त्याला ओरडायचे. चांगलं शिकून मोठ्या पगाराची नोकरी मिळवायची तर, हा असं काय बडबडतोय, म्हणून वेड्यात काढायचे.
अशीच काही वर्षं गेली…. आम्हीही ती जागा सोडली. कधीमधी ऐकू यायचं की, गजू कॉलेजमध्ये जाऊ लागला. त्याच्या डोक्यात असलेलं ते चहावाल्याचं वेड आता कदाचित निघुन गेलं असावं… मी ही त्याला, त्याच्या फॅमिलीला विसरून गेलो.
…आणि अचानक एक दिवस गजू दिसला. इतक्या वर्षांनंतर! पण मी त्याला ओळखलं!!
झालं काय, एका रविवारी मी मित्राच्या दुकानात बसलो होतो. अधूनमधून आम्ही मित्र जमायचो तिथे. मित्राने फोनवरून चहा सांगितला. थोड्या वेळाने चहावाला आला… हो, तो चहावाला म्हणजे गजूच होता! दोन्ही गुडघ्यावर फाटलेली विटकी जीन्स… पिवळा घट्ट टी शर्ट… केस तेल लावून चापून-चोपून बसवलेले… आणि तोंडांत गुटखा… त्याच्या एका हातात काळा थर्मास होता, दुसर्या हातात पेपर ग्लास…
दुकानाच्या पायरीवर त्याने थर्मास ठेवला. एक कागदी कप घेतला आणि तो थर्मासच्या कॉकखाली धरला. दुसऱ्या हाताने त्याने थर्मासचं झाकण दाबलं, चहाची बारीक धार कपमध्ये आली. कप भरला आणि तो त्याने माझ्यापुढे धरला… क्षणभर आमची नजरानजर झाली… त्याने ओळखलं की नाही, माहीत नाही. पण मी एका नजरेत ओळखलं… हा गजूच! आपल्या शेजारचा गजू… चहावाला गजू…
मग मी एकदा मुद्दाम गजूचा शोध घेतला. जवळच्याच एका चौकात त्याची चहाची गाडी आहे, असं समजलं. मी तिथं गेलो तेव्हा गजू नव्हता. थर्मास घेऊन तिथेच कुठे आजूबाजूला गेला होता. गाडीपाशी त्याचे वडील होते. इतक्या वर्षांनंतर सुद्धा मी त्यांना ओळखलं! ती अगदी टिपीकल चहाची गाडी होती. गॅसवर दोन पितळी पातेली होती… एकात दूध होतं, दुसऱ्या पातेल्यात चहा उकळत होता. गजूचे वडील एका डावानं तो ढवळत होते… गाडीवर चहा साखरेचे डबे होते, स्टीलच्या पिंपात पाणी होतं, प्लास्टिकचा जग होता, ॲल्युमिनियमची किटली होती… ओलं फडकं होतं… ट्रेमध्ये काचेचे पाच सहा ग्लास होते…
तेवढ्यात घाईघाईने गजू आला. त्याचे वडील बाजूला झाले. एक छोटा पितळी खलबत्ता होता… गजूने त्यात आल्याचे दोन तुकडे टाकले… बत्त्याने ठेचले… दोन बोटाच्या चिमटीत तो आल्याचा चोथा पातेल्यात टाकला. किटलीचं झाकण उघडलं… चहा गाळण्यासाठी एक पातळ फडकं होतं, ते किटलीवर ठेवलं… पातेल्यातला चहा किटलीत गाळला आणि झाकण लावलं.
हेही वाचा – गोलू आणि गोदाकाठची रथयात्रा
चहाच्या त्या नुसत्या सुगंधानेच मला तरतरी आली. मी यायच्या आधीपासून कुणीतरी गिऱ्हाईक चहाचं पार्सल घ्यायला आलं होतं. गजूनं विचारलं, ‘किती चहा हवेत.’ मग मागच्या खिशातून प्लास्टिकची छोटी पिशवी काढली. किटलीतुन त्यात अंदाजाने चहा ओतला… पिशवीला गाठ मारली. ती घेतल्यावर गिऱ्हाईक पैसे देऊन निघुन गेलं.
मी पण एक चहा सांगितला. त्यानं एका कागदी कपात तो मला दिला. मी मागच्या एका खुर्चीत जाऊन बसलो. त्याचे वडीलही तेथेच बसले होते. मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली… जुनी ओळख दिली. ते जरा संकोचले… पण मग मोकळे होऊन बोलायला लागले…
“गजु दहावी झाला… कॉलेजमध्येही पण गेला, पण त्याला अभ्यास झेपला नाही. दोन तीन वर्षं कशीबशी काढली. मग शिक्षणाला रामराम ठोकला. वर्ष-दोन वर्षं अशीच कुठे कुठे नोकरी केली…”
“मग ही गाडी कधी सुरू केली? डोक्यात कसं आलं… हा व्यवसाय करायचं?”
गजूचे वडील म्हणाले, “मी रिटायर्ड झालो. आमच्या मालकांनीच सुचवलं हे… थोडेफार पैसे मिळाले होते, मग सुरू केली चहाची गाडी… तसं गजूलाही वेड होतंच चहाचं!”
एकंदरीत मला ते समाधानी वाटले. गजूनं मेहनतीनं, गोड बोलण्यानं… आणि मुख्य म्हणजे चहाच्या उत्तम दर्जानं व्यवसाय चांगलाच वाढवला होता. त्याची व्यवसायाबद्दलची निष्ठा बघत होतो, त्याची धावपळ बघत होतो. नकळत माझ्या डोळ्यासमोर जुनं दृश्य आलं, त्याचे वडील वजन काट्यातील चहापावडर डावाने एकत्र करत आहेत… प्लास्टिकच्या पिशवीत ओतत आहेत… आज गजूही तेच करत होता… पितळी पातेल्यात उकळणारा चहा डावाने हलवत होता… किटलीतून कॅरी बॅगमध्ये ओतत होता…
पण तरीही एक मोठ्ठा फरक होता, त्याचे वडील नोकरी करत होते अन् गजू आज मालक होता! आपला स्वतःचा व्यवसाय असणं किती अभिमानाचीच गोष्ट असते ना… आणि तेच सुख, तेच समाधान दोघा बापलेकांच्या चेहऱ्यावर दिसत होतं…
मला ते पाहून व.पुं.चं वाक्य आठवलं, ‘पार्टनर’मध्ये व. पु. म्हणतात –
‘मालकी हक्काची भावना, हेच खरे सुख…’
मोबाइल – 9423968308