माझी आजी फार सोवळ्याची नव्हती, परंतु तिचे घरात काही नियम होते. ते नियम तिला कोणी मोडलेले आवडत नसे. जसे उन्हाळ्यात आई आणि आजी जेव्हा घरात उडदा-मुगाचे पापड करायच्या तेव्हा त्या पापडाच्या पीठाचा एक गोळा गोमुत्र टाकुन वेगळा भिजवायचा म्हणजे ते पापड सणावारांना देवाच्या नैवेद्याकरता वापरायचे… दिवाळीत सगळे चिडीचूप झाल्यावर अनारसे शांततेत करायचे म्हणजे येणाऱ्या-जाणाऱ्यांचा, कोणाचा पायरव होऊन ते तळताना हसत नाहीत वगैरे असे तिचे त्या काळानुसार नियम होते. आमचे कुटुंब शाकाहारी असल्यामुळे नॅान-व्हेज आणि अंडे खाणाऱ्या माझ्या वडिलांच्या मित्रांशी ती थोडी फटकून वागे. त्या काळात शाकाहारी कुटुंबातील व्यक्तीने नॅान-व्हेज खाणे म्हणजे त्या घरात क्रांती घडवून आणण्यासारखे होते. चिकन, मटण खाणे त्याही वेळेस बऱ्याच लोकांना आवडायचे, परंतु घरामध्ये या वस्तू आणायला बंदी असायची.
ज्या घरातील माणसं नॅान-व्हेज किंवा अंडाकरी घरी करायचे, त्यांच्याकरिता त्या घरातील गृहिणी नॉन-व्हेजचे भांडे वेगळे अडगळीत ठेवायची. नॅान-व्हेज खायचे असल्यास त्या घरातील पुरुष मंडळींना त्यासाठी लसूण सोलण्यापासून मसाला तयार करण्यापर्यंतची सर्व तयारी स्वतःच करावी लागत असे. बायकोकडून जास्तीत जास्त पोळ्या आणि भात करण्याची मदत होत असे. पुष्कळ घरातील पुरुष मंडळी घरातील वडीलधारी व्यक्तींपासून लपूनछपून बाहेर हॉटेलमध्ये किंवा मित्रमंडळींपैकी एखाद्याच्या घरी जमून हे नॅान-व्हेज खाण्याचे दिव्य काम करायचे. कोणाची बायको माहेरी गेली असेल किंवा आई-वडील कुठे बाहेरगावी गेले असतील, तेव्हा चोरून सुमडीमध्ये हे लोक आपला हा कार्यभाग उरकायचे. घरामध्ये धाकच तितका असायचा! करणार तरी काय?
काळ बदलला तसे मुलंबाळं शिक्षणासाठी, नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडली. हॉस्टेलमध्ये रहात असताना त्यांचा विविध प्रकारच्या लोकांशी संपर्क यायला लागला. चार-चार पाच-पाच वर्षं बाहेर राहिल्यामुळे त्यांच्या खानपानातही बदल व्हायला लागले. कधीतरी कोणाच्या आग्रहाला बळी पडून आणि कोणी नाव ठेवायला नको म्हणून जे पदार्थ त्यांच्या घरात खाणे निषिद्ध मानले गेले होते, ते पदार्थ त्यांच्या आवडीचे व्हायला लागले… परंतु या सर्व गोष्टींचा घरच्या लोकांना थांगपत्ता नसायचा.
हेही वाचा – वर्ध्यातील गोरस पाक म्हणजे स्वर्गीय सुख!
आमच्याकडे पण एक असाच प्रसंग घडला. एकदा शेतीच्या कामानिमित्त माझे वडील गावी गेले होते, संध्याकाळी ते बसमधून उतरले आणि रिक्षात बसून घरी येताना त्यांना माझे तिन्ही भाऊ कोतवालीजवळ असलेल्या अंडा-पाव विकणाऱ्या गाडीवर अंडे खाताना दिसले. त्यांनी हे पाहिले, परंतु त्यावेळी त्यांनी त्या तिघांनाही हटकले नाही आणि त्यांना हे सगळं माहीत आहे, असं नंतरही कधी दर्शवलं नाही. उलट त्या दिवशी घरी येऊन त्यांनी माझ्या आईला शांतपणे मुलं कुठे गेली म्हणून विचारले असता तिने ‘ते भेळ, पाणीपुरी खायला गेले आहेत’ म्हणून त्यांना सांगितले. तेव्हा माझ्या वडिलांनी आईला सांगितले की, “ते भेळ खायला नव्हते गेले, आपली मुलं अंडी खाताना मला दिसले!” ते ऐकून आई अवाकच झाली! मग त्यांनीच आईला म्हटले की, मुलं घरी असं खोटं सांगून बाहेर जर नॅान-व्हेज किंवा अंडी वगैरे खाणार असतील तर, त्यापेक्षा तू घरातच अंडाकरी वगैरे करून त्यांना खाऊ घालत जा, म्हणजे ते बाहेर खाणार नाहीत… माझ्या आईला पण त्यांचे म्हणणे पटलं. त्यानंतर आईचे शेजारच्या काकूंकडे याचे प्रशिक्षण घेणे सुरू झाले. अंडाकरीचा मसाला कसा तयार करायचा, याची माहिती आमच्या शेजारी राहणाऱ्या टेकाडे काकूंनी तिला सांगितली आणि मग तेव्हापासून आमच्या घरी तीन-चार महिन्यांतून एकदा अंडाकरी व्हायला लागली. नंतर सरावाने माझी आईपण ते छानच करायला लागली होती.
एकदा असचं सुट्टीच्या दिवशी माझ्या आईने आणि शेजारच्या दोघी-तिघी काकूंनी मिळून पुरुषमंडळी आणि मुलांकरिता अंडाकरी तर, बायकांकरिता पिठलं भाकरी करून एकत्र जेवण करण्याचा बेत ठरवला. बायका त्या काळात अंडाकरी खायच्या नाहीत म्हणून असे ठरवलं गेले होते. नेमकी त्याच दिवशी संध्याकाळी माझी आजी घरी आली. तिला असं अचानक दारात पाहून आईची आणि त्या काकूमंडळींची तारांबळ उडली. आजीचं चहापाणी करेपर्यंत आमच्या घरात असलेली अंड्याची टोपली मागच्या दाराने शेजारी गेली. मसाल्याचे सामान लपवून ठेवण्यात आलं. त्याकाळी कोणाकडे फ्रीज वगैरे नव्हता. खूप वेळ आजीशी आईने हवापाण्याच्या गप्पा केल्या, ती तरी किती वेळ मारून नेणार होती? दिवे लागणीची वेळ झाली म्हणून आजी सांजवात करायला स्वयंपाकघरात गेली तर, तिथे टोपलीत ठेवलेले खूप सारे कांदे, कोथिंबीर, आलं, लसूण, लिंबं दिसताच तिच्या भुवया उंचावल्या आणि तिने आईला विचारले की, “कोणी येणार आहे का? काय विशेष बेत करायचा आहे का? आण ते मी मदत करते.” झालं ते ऐकून आईला तर सुचेनासचं झालं की, तिला आता काय सांगाव? बरं, आजी नुकतीच आल्यामुळे तिला काही कारणं सांगून कुठे पाठवायची पण सोय नव्हती. आईने कसनुकसं तोंड केलं आणि “काही नाही आज या मुलांनी अंगतपंगत करायची ठरवलं आहे.” असं सांगून वेळ मारून नेली.
आईचा जीव खालीवर होत होता, कारण अंडी शेजारी ठेवली होती आणि मसाल्याचे सर्व सामान आमच्या घरात होते. त्या काळात मिक्सर पण खूप कमी लोकांकडे असायचा. सगळे मसाले पाटा-वरवंट्यावरच वाटले जायचे. त्यामुळे आजीसमोर जर तो मसाला वाटला गेला असता किंवा कढईत भाजला असता तर, आजीने विचारणा करून आईला भंडावून सोडलं असतं. आजीसमोर तर अंडाकरी करणे शक्यच नव्हतं.
सात वाजायला आले तरी, आईची स्वयंपाकाची काही लगबग आजीला दिसेना, तिलाही वाटले की, जाऊ दे बायकांचे काहीतरी विशेष भाजी वगैरे करण्याचा बेत असेल… कारण अंगतपंगत म्हटलं की, प्रत्येकाने जेवणातील एकेक पदार्थ करून आणायचा असतो, हे आजीला माहीत होते. ते पाहून शांत मनाने आजीने आपली फतकल समोरच्या खोलीतील कॉटवर मांडली, तशी आईने मागच्या दाराने शेजारणीकडे धाव घेतली. अंडाकरीच्या मसाल्याचे सर्व सामान तिच्याकडे देऊन तिलाच अंडा करी करण्याची आणि तिच्याच घरी मुलांना जेवू घालण्याची विनंती केली. स्वतः सर्वांकरिता पोळ्या, भाकरी आणि भात करण्याची तयारी दाखवली. आईची अडचण ओळखून शेजारच्या काकूंनी ही जबाबदारी स्वीकारताचं आईने निश्वास सोडला!
संध्याकाळी पाय मोकळे करायला बाहेर गेलेले माझे वडील आणि शेजारचे दोघ-तिघं काका, ज्यांनी हा अंडाकरीचा घाट घातला होता, ते सर्वजण आजीला पाहून गांगरले. म्हातारी दारातच बसली आहे, आता काय करावं? त्यांनाही काही सुचेना! अंगणात खेळत असलेल्या पोरांना त्यांच्या आयांनी आजीजवळ अंडाकरीबद्दल काही बोलायचे नाही, असा आधीच दम दिला होता. आईने माझ्या वडिलांना हळूच त्यांच्या जेवणाची सोय शेजारी करण्यात आली आहे म्हणून सांगितले… त्त्यामुळे ते निश्चिंत झाले आणि आत आजीजवळ बसून इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागले. साडेसात-आठ वाजता शेजारच्या काकूंनी अंडाकरी करायला घेतली असेल आणि त्यांनी फोडणीत मसाले टाकले असतील, तेव्हा त्याचा घमघमाट सर्वत्र पसरला. तो सुवास नाकात जाताच आजीची भूक चाळवली गेली असणार, त्यामुळे “सूनबाई, काही विशेष मसाल्याची भाजी करतायत का गं टेकाडेबाई?” अशी आजीकडून विचारणा होताच आई तर काही बोलली नाहीच, पण माझे वडीलही पटकन तिथून उठले आणि अंगणात जाऊन बसले…
हेही वाचा – चाळ नावाचे एकत्र कुटुंब!
आईने पण पोळ्या करायला घेतल्या. थोड्याचं वेळात टेकाडे काकूंचा सांगावा आला त्यासरशी सर्व मुले आणि माणसे त्या काकूंच्या घरी जेवायला गेले. आई गरम गरम पोळ्यांचा डबा घेऊन त्यांच्याकडे निघाली होतीच, तितक्यात आजी तिला म्हणाली, ” सुनबाई! टेकाडेबाईंना म्हणावं की, तुम्ही जी आता भाजी केली आहे, त्यातील थोडी भाजी माझ्यासाठी पण ठेवून द्या! कसला सुंदर सुवास येतो आहे नाही भाजीचा?” आता तर आईला रडावं की हसावं, तेच कळेना! तिने आजीचे हे वाक्य टेकाडे काकूंच्या घरी सांगताच जेवायला बसलेल्या माणसांचे घास घशात अडकले. आता काय करावं? कोणालाच काही सुचेना. आजीला तर तो रस्सा हवा होता, पण अंडी होती ना त्यात? तिला त्या दिवशी नेहमीचं पिठलं भाकरी वगैरे नको होतं. टेकाडेकाकूंनी केलेली मसाल्याची भाजीच मला जेवताना हवी, असं तिने ठामपणे सांगितलं होतं.
आता आली का पंचाईत? खूप काथ्याकूट केल्यानंतर सरते शेवटी तिथेच देशमुख काकू होत्या, त्यांनी एक पर्याय शोधला. त्यांनी पटकन तोच मसाला वेगळा तयार केला आणि दुसऱ्या कढईत अंडाकरी सारखाचं मसाला तयार करून त्या रश्श्यात छोटे छोटे बटाटे सोडले. तीपण भाजी इतकी सुंदर झाली होती की, सर्वांनाच त्या भाजीचा मोह झालां. मग काय पिठलं भाकरी रद्द होऊन, ती ‘व्हेज अंडाकरीची’ भाजी सर्व बायकांनी खाल्ली. पण ती बटाट्याची अंडाकरीच्या स्पेशल मसाल्याची भाजी जी फक्त आजीकरिताच त्या दिवशी केली गेली होती, तिने सर्वच बायकांच्या जेवणात रंगत आणली. देशमुख काकूंनी केलेली बटाट्याची भाजी खाऊन आजीने तृप्तीची ढेकर दिली आणि त्या काकूंना तोंड भरून आशीर्वाद दिला, तेव्हा तिथे जमलेले सर्व बायका तसेच माणसं एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसले. लहान मुलांना मात्र बरेचं दिवसं ही गुप्तता पाळण्याकरिता सांभाळावे लागले. रोज सांगावं लागायचं की, ‘हे व्हेज अंडाकरीचे गुपित आजीला कळता कामा नये! तिला जर कळले तर ती थयथयाट करेल…’ त्या प्रसंगानंतर बरेचं दिवस या व्हेज अंडाकरीची चर्चा रंगली होती. मला आजही ही या मसाल्यातील बटाट्याची रस्साभाजी केली की, हा प्रसंग आठवून हसायला येतं!


