Saturday, August 2, 2025

banner 468x60

Homeललितनिद्रा... देवी की राक्षस?

निद्रा… देवी की राक्षस?

मनोज जोशी

निद्रा ही देवी कधी कशी प्रसन्न होईल हे सांगता येणार नाही. कधी कधी ही देवी न राहता, दैत्य बनून संबंधित व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांना छळूही शकते. साधारणपणे 20 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट बहुतांश सर्वांनी पाहिला असेल. हा भ्रष्टाचार, दलाली आणि राजकारण्यांचा सहभाग… या सर्वांपासून अलिप्त असलेली नवी पिढी कशी यात ओढली जाते.. यावर भाष्य करण्यात आले आहे. त्यात एक सीन आहे. एका एफएम केंद्रावर काम करणाऱ्या मित्राची टर उडवतात. हा मित्र एफएम चॅनलचा आरजे अर्थात रेडिओ जॅकी असतो आणि कायम रात्रीच्या ड्युटीवर असतो. मग त्याची गाणी ऐकते कोण? ‘रात को बहुत लोग जागते रहते हैं, आशिक, बिमार, चौकीदार और उल्लू…’ पण काही जण नाइलाजाने जागतात आणि त्याचे किस्से होतात. यातील काही किस्से सांगणार आहे. हे अजिबात काल्पनिक नाहीत. वास्तवात घडलेले आहेत. ते सलग सांगणे कठीण आहे. त्यामुळे ते स्वतंत्रपणे सांगतो…

किस्सा 1

सकाळी साडेसहाच्या सुमारास ‘तो’ कामावरून घरी परतला आणि साधारणपणे दोन तासांनी त्याची पत्नी ऑफिससाठी घराबाहेर पडली. घरी आल्यावर चहापाणी झाले होते. पण रात्रीच्या ड्युटीची सवय असल्याने त्याला वारंवार चहा पिण्याची सवय त्याला होती. पत्नी कामावर गेल्यावर चहा पिण्याची तल्लफ आली; पण डोळ्यावर प्रचंड झोप होती. पापण्या जड झाल्या होत्या. तशा परिस्थितीतही त्यने गॅसवर आधण ठेवले. त्याचे डोळे मिटतच होते. त्याला राहावले नाही. तो बेडरुममध्ये जाऊन गादीवर पहुडला आणि पुढच्या क्षणीच तो निद्रादेवीला शरण गेला. मधेच जाग आली अन् त्याला आठवलं, गॅसवर आधण ठेवले आहे. तो धावतच किचनमध्ये गेला. भांड्यातील पाणी आटून गेले होते. साखरेचा कोळसा झाला होता. झोपेचा अंमल अजून काही प्रमाणात होता, म्हणूनच भांडे उचलण्यासाठी त्याने चटकन हात पुढे केला आणि त्याची त्या दिवसापुरती झोप उडूनच गेली. कारण भांड्याखाली गॅस सुरूच होता…

हेही वाचा – आत्मविश्वास… कधी कमी तर, कधी जास्त

किस्सा 2

नेहमीप्रमाणे ‘तो’ सकाळी कामावरून घरी परत आला. पत्नीची स्वयंपाकाची लगबग सुरू होती. तो ब्रश करून किचनमध्ये आला आणि पत्नीने सांगितले, ‘सिलिंडरमधील गॅस संपला आहे. मी गॅलेरीतून भरलेले सिलिंडर घेऊन येते. तू जोडून दे.’ तो ‘हो’ म्हणाला. तिने भरलेले सिलिंडर त्याला आणून दिले आणि रिकामे सिलिंडर ठेवण्यासाठी ती गॅलेरीत गेली. ते ठेवून आल्यावर ती त्याला म्हणाली, ‘तू जाऊन झोप. मी सिलिंडर जोडते…’ कारण, गॅलेरीतून परत आल्यानंतर तिने पाहिले की, तो सिलिंडरची रिंग धरून डुलक्या देत उभा होता!

किस्सा 3

‘त्याचे’ ऑफिस रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सुटायचे. पण प्रवास लांबचा होता. त्यात उशिराचा प्रवास… हे टाळण्यासाठी तो पहाटेची 4 वाजून 2 मिनिटांची गाडी पकडायचा. त्यासाठी तो रात्रभर जागायचा. ट्रेन चुकू नये, ही भीती. त्याने नेहमीप्रमाणे पहाटेची गाडी पकडली. तो शेवटच्या डब्यात बसला होता. पहाटेच्या गार वाऱ्यावर त्याला झोप लागली. तो खडबडून जागा झाला. त्याला वडाळ्याला उतरायचे होते. त्याने बाहेर पाहिले, रे रोड स्टेशन. त्याच्या लक्षात आले, आपण चुकलो. तो घाईघाईत उतरला. त्याने पटकन रेल्वेरूळ ओलांडले आणि समोरच्या प्लॅटफॉर्मवर तो गेला. लगेच त्याला गाडी मिळाली. तो गाडीत चढला. पुन्हा पंचाईत होऊ नये म्हणून तो दरवाजातच उभा राहिला. फक्त माहिती म्हणून त्याने दरवाजावरील स्टेशन्सची नावे पाहिली. वडाळ्याकडे जाताना रे रोडनंतर कॉटन ग्रीन येते. स्टेशन आल्यावर तो बाहेर डोकावला आणि स्वत:शीच हसला; कारण ते स्टेशन होते, डॉकयार्ड रोड! झोपेत तो सीएसएमटीला गेला आणि परत येताना त्याला रे रोडला जाग आली. त्यानंतर त्याने घाईघाईत रुळ ओलांडून पुन्हा सीएसएमटीला जाणारी गाडी पकडली होती…!

किस्सा 4

पुन्हा तेच. पहाटेची गाडी ‘त्याने’ पकडली. वडाळा स्टेशनला तो उतरला. दुसरी गाडी पकडून तो अंधेरीला गेला. तिथे त्याने विरार गाडी पकडली. तो राहणारा विरारचाच होता. त्याच्या दुर्दैवाने रविवार होता. एरवी वसईपासून रिटर्न जाणारे विरार गाडीत चढतात. त्यामुळे तो निवांत झोपायचा. डब्यातील सर्वांशी त्याची ओळख झाली होती. पण रविवार म्हणजे कोणी नसणार. म्हणून पायातील सँडल काढल्या आणि समोरच्या सीटवर पाय ठेवून तो झोपला. त्याला अचानक जाग आली. त्याने खिडकीतून बाहेर पाहिले. त्याला हार्बर लाइनचा ब्रिज दिसला. त्याच्या लक्षात आले, तो सीटवरून उठला आणि शांतपणे तो वांद्रे स्थानकावर उतरला. म्हणजेच, तो अंधेरीवरून विरारला गेला होता. (एक तासाचा प्रवास) विरारवरून झोपेतच वांद्र्याला परतला होता. (फास्ट ट्रेन असल्याने आणखी एक तास) त्यानंतर वांद्र्याहून तो पुन्हा विरारला गेला. झोपेत त्याने पाय खाली ठेवले होते, त्यामुळे विरारला विंडो सीटसाठी कोणीही त्याला उठवले नाही.

हेही वाचा – ‘पाकीजा’च्या अजरामर गीतांना वादाची किनार

या सर्व किश्शांमधील ‘तो’ म्हणजे मीच आहे. ‘लोकमत’मध्ये काम करत असताना 2006 ते 2009 असा चार वर्षं विरार ते सानपाडा प्रवास करत होतो. अडीच तासांच्या एक वेळच्या प्रवासात तीन गाड्या बदलत होतो. रात्रीच्या वेळी कोणता धोका नको, म्हणून चार वर्षं ऑफिसमध्ये मुक्काम केला. शाळेत जाणाऱ्या लेकीला भेटण्यासाठी पहाटेची पहिली गाडी पकडत असे. ती चुकू नये, म्हणून रात्री झोपलो नाही. म्हणून हे किस्से घडले.

पण सुदैवाने मला निद्रादेवीची कधीच आराधना करावी लागली नाही. ती कायमच प्रसन्न राहिली. पाठ टेकल्याक्षणी आजही गाढ झोपतो… अगदी कुंभकर्ण या दैत्यासारखा!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!