डॉ. अस्मिता हवालदार
पाऊस म्हटल्यावर मला सॉमरसेट मॉमची ‘Rain’ ही कथा आठवते आणि दुसरी शंकर पाटील यांची ‘वळीव’. गेले दोन-तीन दिवस पाऊस पडतोय. पावसाळी वातावरण झालंय… हलका गारवा आला आहे. रस्त्यावर पाणी साचल्यावर प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या चिंता आहेत. छत्री किती दिवस सोबत ठेवायची? कपड्यांवर चिखल उडेल… गाडी खराब होईल… घरात चिखलाचे पाय येतील… कपडे वाळणार नाहीत… आज ट्रॅफिक जॅम होईल… अशा अनेक. यातल्या सर्व किंवा बऱ्याचशा माझ्याही मनात आहेत. विचारचक्र सुरू झालंय. घरी खिडकीत पाऊस enjoy करत नुसते बसून रहाण्याचे आता दिवस नाहीत.
तर ‘रेन’ आणि ‘वळीव’ कथांबद्दल.
‘रेन’ कथा प्रशांत महासागरातल्या एक बेटावर घडते. लहानशा बेटावर भरपूर, सतत मुसळधार पाऊस पडत असतो. इतका की, अनेक दिवस पाऊस थांबत नाही. दररोज पावसाळी हवा, सर्द वातावरण, आर्द्रता… बेटाच्या विशिष्ट आकारामुळे पाऊस आकर्षित होतो, असे लेखक म्हणतो. एकदा या Pego Pego बेटावर बोटीने प्रवास करणारे प्रवासी हवामानामुळे पुढे Apia ला जाणे शक्य नसल्याने काही दिवसांसाठी राहू लागतात… न पेक्षा त्यांना राहावे लागते. बोटीवर इथले स्थायिक मिशनरी, एक डॉक्टर जोडपे, एक वेश्या आणि इतर असतात…
हेही वाचा – बोल माधवी… मनात चाललेले महाभारत!
मिशनरी इथल्या लोकांना सद्वर्तन करण्याचे धडे द्यायला लागतो. हवामानाला अनुसरून इतरांचे असलेले कपडे त्याला अश्लील वाटत असतात म्हणून अंगभर कपडे घालायला भाग पाडतो. त्याच्या विरुद्ध जायची कुणाची हिंमत नसल्याने लोक त्याचे वागणे सहन करत असतात. डॉक्टर जोडप्याला त्याचे वागणे आवडत नाही, पण तेही विरोध करत नाहीत. सगळे प्रवासी एका इमारतीच्या खोल्यांत राहू लागतात. वेश्येकडे खलाशी येऊन नाचगाणी करतात याचा मिशनऱ्याला राग येतो. तो तिला सांगून पाहतो पण ती मिशनऱ्याचे ऐकत नाही. तिला याच बेटावर राहायचे असते, कारण तिच्यावर गुन्ह्याचा आरोप असतो आणि पुढच्या बेटावरचे पोलीस तुरुंगात टाकण्यासाठी तिची वाट पाहत असतात.
तर, मिशनरी आपले राजकीय वजन वापरून तिला बेटावर राहू न देण्याची आणि पुढे पाठवून देण्याची व्यवस्था करू लागतो. ती विनवण्या करते, खलाशांना येऊ देत नाही, नाचगाणी बंद करते… पण तो ऐकत नाही. तिला Apia वर पाठवण्यापूर्वीच्या रात्री मिशनरी रात्री तिला भेटायला जातो, पापक्षालन करण्यासाठी काही वाचून दाखवतो… तिचे पापी मन आता शुद्ध झाले आहे… तिचा पुनर्जन्म झाला आहे, असे म्हणतो. सकाळी त्याचे प्रेत समुद्र किनारी सापडते. त्याने आत्महत्या केलेली असते. वेश्येकडे पुन्हा खलाशी येऊ लागतात, नाचगाणे सुरू होते. स्थानिक लोक पुन्हा पहिल्यासारखा पोशाख करू लागतात आणि डॉक्टर, सरकारी अधिकारी अचंबित होतात.
हेही वाचा – युगांत : इरावतीबाईंचा संशोधनात्मक निबंध
मुसळधार पाऊस असल्यामुळे एका बेटावर घडलेले कथानक माणसाच्या खऱ्या रूपावर आणि दिखाव्यावर भाष्य करते. ही दीर्घकथा आहे जिचे नायक-नायिका मिशनरी आणि वेश्या असले तरी एका अर्थाने पाऊस सुद्धा आहे. शेवट धक्कादायक आहे. कथा संपल्यावर सुन्न होतो. नैसर्गिक भावनांना कोणीही आवर घालू शकत नाही. केवळ स्वतःची फसवणूक करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असतो, हे लेखकाने मांडले आहे. कथेच्या शेवटी वेश्या म्हणते, “You men, you are all the same, all of you.”
दुसरी कथा ‘वळीव’. पावसाची चिन्हं दिसत असताना म्हातारा शेतकरी शेतात बसलेला असतो. खूप उकडत असते. आर्द्रता वाढलेली असल्याने चिकट घाम येत असतो. विजा चमकू लागल्यावर तो चिंतेत पडतो. पायाळू असल्याने त्याला विजेपासून धोका आहे, अशी त्याची समजूत असते. त्यावर उपाय म्हणून घातलेली तांब्याची अंगठी घरी राहाते. आता घरी कसे जायचे, या चिंतेत तो असतो… इतक्यात त्याची बायको अंगठी कोणाबरोबर तरी त्याच्याकडे पाठवते आणि वळवाचा पाऊस सुरू होतो. ‘वळवाचा पाऊस’ हे रूपक लेखकाने वापरले आहे. कथेचे शेवटचे वाक्य – ‘तो अंगठीकडे म्हऊ घातल्यागत बघतच बसला…’ किती सुंदर लिहिले आहे. त्याचे आणि पत्नीचे प्रेम तिच्या अंगठी पाठवण्यातून व्यक्त होते. त्याच्या मनात सुरू असलेली आंदोलनं थांबतात. पाऊस पडल्यावर धरती मोहरते तसा तो पत्नीच्या प्रेमामुळे मोहरुन जातो.
पावसावर कथा, कविता, ललित लेखनाचा साहित्यात अक्षरशः पाऊस पडलेला आहे. पण माझ्या लक्षात राहिलेल्या या दोन कथा…


