शोभा भडके
भाग – 8
रामला खूप राग येत होता… त्याउलट सखाराम तथा भाऊ खूश होते.
“हे बघा तुम्ही…” राम चिडून बोलतच होता की…
” माझं बोलून झालंय. हे माझं कार्ड… विचार करून निर्णय घ्या. ‘हो’ असेल तर कॉल करा… आकाश निघूया” व्हिजिटिंग कार्ड राम समोर धरत शिव म्हणाला… पण ते रामने घेतलं नाही, तसं सखारामने स्वतःकडे ते कार्ड घेतलं.
मग आकाश आणि शिव निघून गेले.
“हे बघा भाऊ काहीही झालं तरी मी माझ्या बहिणीचं लग्न असं घाईत होऊ देणार नाही… लोकांच्या भीतीने तर अजिबात नाही!” राम रागात म्हणाला आणि बाहेर निघून गेला. पवन पण त्याच्या मागे गेला.
“सखाराम, पोरगा मोठ्या घरचा वाटतोय! विचार कर, सुखात राहील पोरगी. शिवाय, हे प्रकरण पण त्याला माहिती… तेव्हा जास्त विचार न करता उरकून टाक लगीन. पोराचं ऐकत बसशील तर, हातातून जाईल पोरगी. येतो आम्ही, चला रे संपली बैठक,” पाटील म्हणाले आणि बाकी माणसांसोबत निघून गेले.
सखाराम त्यांच्या बोलण्याचा विचार करू लागले… आणि त्यांना पटलं सुद्धा! त्यांनी मनात ठरवूनही टाकलं, ‘कसबी करून रामला तयार करायचं. एवढं चांगलं आलेलं स्थळ हातचं नाही जाऊ द्यायचं!’
इकडे शिवने रस्त्यातच एका बाजूला गाडी पार्क केली आणि तो खाली उतरला. आकाश पण त्याच्यामागे बाहेर आला आणि त्याच्या शेजारी उभा राहिला.
“काय होतं हे शिव? काय बोलून आलास तू तिथे? वेड लागलं का तुला? मान्य की, तू सिया दिदीसाठी काहीही करू शकतो… पण हे असं! कोण कुठली ती मुलगी, जिला तू बघितली नाही… तिच्यासोबत लग्न करणार तू?” आकाशला खूप राग आला होता. त्याच्या चिडण्यात शिवसाठीची काळजी दिसत होती.
शिव मात्र एकदम शांत होता.
“बोल ना शिव! काय विचारतोय मी?” आकाश.
“रामचा नंबर आहे ना तुझ्याकडे? कॉल कर त्यांना एक इंपॉर्टन्ट गोष्ट सांगायची राहिली…” शिवने त्याच्या बोलण्याला इग्नोर करत रामला कॉल करायला सांगितलं.
“अरे पण…” आकाश.
“ओके…” म्हणत आकाशने कॉल लावला, पण नाही लागला.
“चल निघू. घरी जाऊन बाकीच्यांना पण सांगायचंय… तयारीला लागावं लागेल. मी माझ्या बहिणीचं लग्न एकदम थाटामाटात लावणार आहे.” असं म्हणून शिव गाडीत जाऊन बसला. आकाश पण त्याच्या मागून गाडीत बसला आणि गाडी चालू केली… शिव एकदम शांत होता, कसल्यातरी विचारात…
हेही वाचा – शिवने दिलेली फाइल पाहून आकाश गोंधळला…
इकडे राम शेतात आला होता. तो खूप रागात होता… आणि रागात त्याने लाकडे तोडायला घेतली. कुऱ्हाडीने त्या लाकडावर सपासप वार करत होता तो… अंगातून प्रचंड घाम निथळत होता. कुऱ्हाडीचे असे काही घाव त्या लाकडावर घालत होता, जणू सगळ्यांचा राग त्या लाकडावर काढतोय!
“दादा काय करतोयस तू? सोड ती कुऱ्हाड! बास कर फुटल ते लाकूड…” पवनने त्याच्या हातून कुऱ्हाड हिसकावून घेतली आणि बाजूला फेकली.
रामने तिथेच खाली बसून घेतलं आणि तोंडावर दोन्ही हात घेऊन रडू लागला… “या लाकडासारखंच माझ्या आरुचं स्वप्न पण तुटलं रे… आणि मी काहीच करू शकलो नाही. माझ्या बहिणीच्या विरोधात एवढं मोठं कांड रचलं गेलं आणि मला कल्पनाच नाही.. मी कमी पडलो रे तिचं रक्षण करण्यात… आता भाऊ माझं काहीच ऐकून घेणार नाहीत. त्यांच्यासाठी त्यांची इज्जत सगळयात महत्त्वाची! ते कसंही करून आता आरुचं लग्न लावून देतील. काय करू मी, मला काहीच सुचत नाही…” राम रडतच होता… हतबल झाला होता तो. कितीही नाही म्हटलं तरी, एका लिमिटपर्यंतच त्याचे वडील त्याचं ऐकायचे…
“दादा शांत हो बरं तू. काढू आपण काही तरी मार्ग. होईल सगळ नीट,” पवन त्याला समजावत होता. थोड्या वेळाने राम शांत झाला. आता त्याला शिवचं बोलणं आठवलं.
“पवन, तो शिवराज सरपोतदार. तू… तू ओळखातोस त्याला? तो असा लग्न करेन असं का म्हणाला? त्याच्या बहिणीसोबत मी लग्न करावं म्हणून का? पण तो तर खूप श्रीमंत वाटत होता, एकंदरीत त्याच्या पर्सनॅलिटीवरून. मग तो का माझ्यासारख्या शेतकऱ्यासोबत त्याच्या बहिणीचं लग्न करायचं म्हणतोय? काहीच कळत नाहीये. डोक जाम झालंय,” राम डोक्याला हात लावून म्हणाला.
“दादा, ते म्हणजे… ते… सियाचा भाऊ आहे तो!” पवन चाचरत म्हणाला.
शिवने जेव्हा स्वतःबद्दल सांगितलं तेव्हाच पवनने गूगलवरून त्याची सगळी माहिती काढली होती आणि तेव्हाच त्याला कळलं होतं की, तो सियाचा भाऊ आहे.
“क… काय? काय बोलतोयस तू? सिया… सियाचा भाऊ? पवन तुला कळतंय का, तू काय बोलतोयस ते! अरे पण कसं शक्य आहे ते? तिच्याशी लग्नाची अट का घालेल तो? तिचं तर लग्न… लग्न झालंय ना! मग कसं काय?” रामला कळत नव्हतं काय बोलावं ते. मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते.
“हो दादा… खरंय ते. पण हेही खरंय की, तिचा घटस्फोट झालाय. नेमकं काय झालं ते मलाही माहीत नाही… पण तिच्या एका मैत्रिणीकडून कळलं होतं मला हे.” पवन.
“मग तू हे मला का नाही सांगितलंस?” रामला पवनचाच राग आला. तिचा घटस्फोट वगैरे झाला असेल, असं त्याला वाटलंच नव्हतं.
तिच्या लग्नानंतर त्याने एकदा तिला मंदिरात तिच्या नवऱ्यासोबत पाहिलं होतं आणि ती खूश दिसत होती… तिला असं दुसऱ्यासोबत पाहून त्याला वाईट वाटलं होतं, पण त्यानेच तर तिला दूर केलं होतं! तिला खूश पाहून ती तिच्या आयुष्यात पुढे जातेय, यातच त्याने समाधान मानलं होतं… आणि परत कधीच तिच्या आयुष्यात डोकावयाचं नाही, असं ठरवून तो गावी परत गेला होता… आणि आता हे ऐकून त्याला काय रिॲक्ट करावं, तेच कळत नव्हतं.
“दादा, सॉरी पण… मला पुन्हा तुला त्या त्रासात नव्हतं पहायचं… मी बघितलंय किती प्रेम करत होतास तू तिच्यावर! आजही करतोस… दिसतं मला ते. त्या दिवशी पण त्या बागेत जाऊन बसला होतास तू… माहीत आहे मला. तुला जर कळलं असतं तर तू तिला भेटण्याचा प्रयत्न केला असता आणि परत तेच… नको वाटलं मला. म्हणून नाही सांगितलं,” पवन.
या दोघांचं बोलणं तिथेच झाडाआड दडून बसलेल्या आरुने ऐकलं. तिचा दादा रागात बाहेर निघून गेला होता आणि तिला माहीत होतं की, तो कुठे असेल… म्हणून सगळी माणसं गेल्यावर आईसोबत वाद घालून ती शेतात आली होती.
जवळ येत असतानाच राम आणि पवनचं हे बोलणं तिच्या कानावर पडलं. म्हणून ती समोर न जाता तिथेच झाडाआड उभी राहून एकू लागली. तिला धक्काच बसला, हे सगळ ऐकून! आणि ती तशीच आल्या पावली घरी निघून गेली, मनात काहीतरी ठरवून!!
“शिव काय चालू आहे तुझं? कुठे गेला होतास तू?” घरी आला तसं हॉलमध्ये बसलेले त्याचे बाबा त्याच्यावर ओरडले.
“बाबा, तुम्हाला चांगलंच माहीत आहे मी कुठे गेलो होतो आणि का ते!” त्याने थंडपणे उत्तर दिलं.
“तुला वेड लागलं आहे का शिव? तू फडतूस गावात सियाला पाठवणार आहेस! तो राम काय आहे, काय त्याच्याकडे? चार-पाच एकर शेती आणि त्याच शेतात एक छोटंस घर… चारपाच गाई-म्हशी… एवढंच! सिया तिथे जाऊन काय त्या गाई-म्हशींचं शेण काढत बसणार आहे का?” ते रागात मोठ्याने ओरडत होते. त्यांचा आवाज ऐकून घरातली बाकी लोक पण हॉलमध्ये जमा झाले होते.
“तिचं सुख त्यातच आहे… आणि तो गावाकडे राहात असला तरी सुशिक्षित आहे. मी पूर्ण माहिती काढली आहे त्याची… आणि काय म्हणालात गाई-म्हशी अँड ऑल… तुम्ही दिलं होतं ना बंगला, गाडी, प्रॉपर्टी पाहून, काय झालं? किती मिळालं तिला सुख? अजिबात नाही… फक्त त्रास मिळला तिला! तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही केलं. आता मी ठरवणार, काय करायचं ते,” शिवचा पण शब्दागणिक आवाज वाढत गेला. बाकीचे सगळे हतबल होऊन पाहात होते.
“काहीही झालं तरी मी सियाचं लग्न त्या रामसोबत होऊ देणार नाही,” दिनकर (बाबा).
“मी पण बघतो तुम्ही कसं अडवता ते!” शिव.
कोणीही आपला मुद्दा सोडायला तयार नव्हतं. दोघं जिद्दीला पेटले होते. शेवटी बाप-लेकच ते!.
“बास्सsss बास करा..” अचानक आवाज आला आणि सगळे शांत झाले. तो आवाज सियाचा होता. आवाज ऐकून सगळ्यांची नजर तिच्याकडे गेली. तिच्या डोळ्यांतून पाणी येत होतं. शिवने एक नजर तिच्याकडे पाहिलं आणि डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेत त्याने रागाला आवर घातला. दिनकर पण शांत झाले. ती थोडं पुढे आली आणि सगळ्यांकडे पाहून म्हणाली,
“खूप झालं… आजपर्यंत तुम्ही जे म्हणालात ते मी केलं. फक्त एकच गोष्ट माझ्या मर्जीने केली होती आणि ते म्हणजे प्रेम! पण, तुम्ही तेही माझ्यापासून दूर केलंत… आणि तू… (शिवकडे रागाने पाहून) आजपर्यंत ते त्यांची मर्जी चालवत आले आणि आता तू, तुझी मर्जी चालवणार का? अजिबात नाही. मी ठरवणार मला काय करायचंय ते! तू तिथे जाऊन काय बोलून आलास मला माहीत नाही… पण मी रामसोबत लग्न करणार नाही… कोणासोबतच नाही. मला लग्नच करायच नाही. कळलं तुला?” त्याला सुनावून ती रागातच रडत वर तिच्या रूममध्ये धावत गेली.
शिव हतबलतेने तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात राहिला. दिनकररावांना मात्र आतून आनंदच झाला, पण त्यांनी तसं चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. आजी आणि सुधा यांना वाईट वाटलं. सुधा तिच्यामागे रूममध्ये गेल्या.
“दिनकर, चुकीचं वागतोयस तू. जरा विचार कर आयुष्यभर काय तिला इथंच ठेवून घेणार आहेस का? आणि तिला असा कोरा नवरदेव नाही भेटायचा! शिवने जे ठरवलं ते करू दे त्याला, कळलं?” लीला आजी जरबयुक्त शब्दात म्हणाल्या.
शिवने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आकाशला ऑफिसला जायला सांगितलं आणि तो बेडरूममध्ये निघून गेला.
“करा काय करायचंय ते… एक चूक काय झाली माझ्याकडून, सगळे बोलणार आता. स्वतःचे निर्णय स्वतः घेणार, घ्या!” असं म्हणून दिनकररावही निघून गेले.
लीला आजी ‘नाही’ अशी मान हलवत, आपल्या रूममध्ये गेल्या. दुपारची वेळ त्यांची आरामाची होती ना!
लीला आजी गावाकडच्या आणि जुन्या वळणाच्या असल्यामुळे त्यांनी नेहमीच सून म्हणून त्यांना धाकात ठेवलं होतं बाईने नेहमी चूल आणि मूल यातच लक्ष घालायचं, बाकीच्या गोष्टी बघायला घरातले पुरुष असतात… असंच त्यांचं मत होतं. दिनकर यांचे वडील गेल्यानंतर लीला आजी घराची करताधरता झाली आणि त्यांचीच वट राहिली घरात! त्यात दोन्ही मूलं त्यांच्या धाकात होती, मग सुनांचं कसं चालणार!
हेही वाचा – शिवचे म्हणणे ऐकून सारेच अवाक् झाले!
गावाकडे शेती होती. पण दिनकर यांना शिकून स्वतःचा व्यवसाय करायचा होता, म्हणून मग ते शहरात आले आणि इथेच स्थायिक झाले. लीला आजीचं दोन्ही लेकासुंनाकडे लक्ष असायचं. काही दिवस इथे आणि काही दिवस गावाकडे त्या राहात आणि घरातले अंतिम निर्णय त्याच घेत.
रूममध्ये येऊन सिया बेडवर पालथी झोपून रडत होती. सुधा तिच्या मागेच रूममध्ये आल्या. तिला असं पाहून त्यांना पण रडायला येत होतं. एक आई म्हणून त्या कधीच तिच्यासाठी बोलू शकल्या नाहीत, याचं त्यांना वाईट वाटत होतं.
क्रमशः


