भाग – 18
रेवतीचा कॉल दोन वेळा येऊन गेला… दोन मिसकॉल्स! बापरे! धिंगाणा करेल माझ्या नावाचा… म्हणत जुईलीने रेवतीला कॉल करायला घेतला…
“अगं, आहेस ना जिवंत? किती कॉल केले?”
“पुरे गं! दोनच मिसकॉल्स आहेत पडलेले. श्री सारखं वाढवून सांगू नकोस.”
“अय… पुरे तुझ्या श्रीचं. मी म्हणजे तो नव्हे! मला नको म्हणूस त्याच्यासारखं. बघ जरा व्हॉट्सॲप. त्यावर पण कॉल पडले असतील. व्हिडीओ कॉल पण करत होते, तुला मघापासून!”
“आयो… अगं मी बाहेर बसलेले. आई-बाबांसोबत. त्यांना सांगितलं आपलं पुण्याला जायचं. फोन सायलंटवरच असतोय गं हल्ली. नाहीतर माझं लक्ष सारखं आपलं फोनवरच राहतं.”
“हां बाई कळलं तुझं. बाय द वे काका, काकू काय म्हटले मग?”
“अगं विचारत होते, का चाललायत. मी सांगितलं तुझं विद्यापीठाचं काम आहे वगैरे. मग श्रीला भेटणार का म्हणून पण विचारत होते.”
“मग काय सांगितलंस?”
“बघू म्हटलं गं. त्यांना काय सांगणार, हे सगळं?”
“तसं नव्हे गं… त्याला कॉल वगैरे करणार नाहीत ना हे दोघं? तू येतेयस हे त्याला कळायला नको.”
“होय की गं, हा विचारच नाही केला मी. आता तर नाही करायचे ते कॉल. वाजले बघ किती. उद्या सकाळी चहाला सगळे एकत्र असू तेव्हा सांगते मी त्यांना. श्रीला सरप्राईज आहे, तुम्ही सांगू नका म्हणते.”
हेही वाचा – मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…
“होय बाई, आधी सांग तसं त्यांना. नाहीतर सकाळी विसरशील.”
“नाही गं बयो सांगते मी. बरं तू का एवढे कॉल करत होतीस?”
“अगं ट्रेनची तिकीट बुक करत होते म्हणून तुला कॉल केलेला. ओके ना आपण ठरवलेलं तसं? करायची ना कन्फर्म?”
“होय, चल! जाऊयात. होऊदे काय व्हायचंय ते. मी सगळ्या गोष्टींसाठी तयार राहते मनाने! माझ्या मना, बन दगड!”
“होईल सगळं ठीक गं… आणि लक्षात ठेव जुयू… जे होईल ते बऱ्यासाठीच होईल. त्यामुळे मन घट्टच ठेव. कुठल्याही सिच्युएशनला फेस केलं पाहिजे आता. जे होईल ते होईल. तयार रहा. मी तुला गुडी गुडी बोलून तुझी आशा वाढवून ठेवणार नाही… तुझ्या अपेक्षा वाढवून ठेवणार नाही. खरोखर मनाला दगड बनव.”
“हो, मीही मला काही खोट्या आशेवर ठेवत नाहीये गं. मलाही कळून चुकलंय हे सगळं.”
“हे बघ बोलता बोलता झालं बुकिंग गं इकडे… तुला मेसेज पाठवलाय बघ.”
“हां बघते, पाठवून ठेव. बाकी जेवलीस का?”
“होय मघाशीच. तू?”
“होय जेवले. चल मग, उद्या बोलू. मी बसते वाचत काहीतरी.”
” येस्स… चलो, गुड नाईट. ”
“हो गुड नाईट, टेक केअर.”
पलीकडून कॉल कट झाला.
जुईलीने घड्याळात बघितलं तर साडेदहा वाजलेले. तिने पुस्तक उघडलं. ‘हृदयस्थ’ डॉ. अलका मांडकेंचं. त्यांच्या पतीसोबतच्या म्हणजेच डॉ. नीतू मांडकेंसोबत अनुभवलेल्या आयुष्याची, सहजीवनाची एक सुंदर सफर. मांडके हे महाराष्ट्रातले सर्वपरिचित असे प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ. त्यांच्या कॉलेज लाइफमधल्या त्यांच्या हळूवार खुललेल्या प्रेमाची गोष्ट जुईली वाचत होती. अलका आणि नीतू यांच्या गुलाबी दिवसांची गोष्ट…
वाचता वाचता तिला श्री अजूनच आठवू लागला. तोही असाच आहे की, नीतूसारखा! किती प्रेम करतो माझ्यावर. करतो? जुईली, हे काही बरोबर नव्हे. सगळ्या प्रवासात गाडी येऊन नेमकी याच स्टेशनवर कशी थांबते तुझी? चकवा लागलाय का तुला? भयंकर चकवा! ज्यातून तू सुटत तर नाहीच आहेस, पण तू यातून सुटायला म्हणून कुठलीही दिशा निवडलीस तरी पुन्हा तिथेच एकाच जागेवर येऊन पोहोचतेयस. त्याच चकव्यात गोल गोल फिरत आहेस तू. आणि तुला आता हा चकवाच आवडायला लागलाय. हे चकव्याचे फेरे तू झिम्मा घातल्यासारखे आवडीने धरतेयस. यात अजून काही नाही, तुझी फरफट होतेय… कळतंय तुला! तुझी फरफट आहे ही…
हेही वाचा – …होई का असे तुलाच स्मरताना?
जुईलीने पुस्तक बंद केलं आणि टेबलवर ठेवलं.
‘मला नाही गुंतायचंय या फेऱ्यात!’
जुईलीने लगबगीने सर्व आवराआवर केली… बेडवर पाठ टेकवायच्या आधी तिने फॅन फास्ट केला, लाइट्स बंद केले आणि ती बेडवर पडली. बाजूला ठेवलेली उशी तिने घट्ट पकडली. डोळे मिटून तिने मनातल्या मनात एकदा म्हटलं, ‘श्री, मी येतेय. आपण भेटूच!’
स्पीकरवर मंद गाणं लागलं होतं…
दिवस असे की कोणी माझा नाही
अन मी कोणाचा नाही…


